कमावलेला रुपया

दिंनाक: 29 Mar 2019 15:52:00


खूप दिवसांपूर्वी ऐकलेली एक गोष्ट मला आठवतेय. एका गावात एका छानशा टुमदार घरात राहणारा बलदेव नावाचा एक मुलगा. हा बलदेव नावाप्रमाणेच बळकट, धष्टपुष्ट. घरात सगळ्यांचा लाडका, कोडकौतुकात वाढलेला. शाळेला सुट्टी असली की, हा दिवसभर खेळायचा, मजा-मस्ती करायचा, पोटभर जेवायचा आणि झोपायचा. एकदा बलदेवच्या बाबांनी त्याला बोलावलं. बलदेवच्या शाळेला सुट्ट्या लागल्या होत्या. बाबांनी त्याला सांगितलं, “हे बघ, तुला रोज मिळतं तसंच घरात जेवायला मिळेल. पण आजपासून रोज तू मला संध्याकाळच्या जेवणापूर्वी एक रुपया आणून दिला पाहिजेस. ज्या दिवशी तू मला एक रुपया देणार नाहीस, त्या दिवशी तुला जेवण मिळणार नाही.”

बलदेवनं विचार केला, बाबांच्या डोक्यात काहीतरी खूळ शिरलेलं दिसतंय. बरं, वरण-भात, भाजी-पोळी, चटणी, कोशिंबीर, कधीतरी गोडधोड – एवढ्या जेवणाच्या बदल्यात बाबा फक्त एक रुपयाच मागताहेत? मग त्यात एवढं अवघड काय आहे? त्या दिवशी बलदेव सरळ त्याच्या आईकडे गेला. आईकडून एक रुपया घेतला आणि बाबांना दिला. बाबांनी तो एक रुपया बलदेवकडून घेतला आणि त्याच्यासमोरच घरामागच्या विहिरीत फेकून दिला. बलदेवला आश्चर्य वाटलं. पण तो मनात म्हणाला, 'रुपया फेकला तर फेकला. मी एक रुपया आणून देण्याचं काम केलं. आता मला पोटभर जेवण मिळेल.' आणि खांदे उडवून बलदेव तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी बलदेवने आईकडून पुन्हा एक रुपया घेतला, बाबांना दिला. बाबांनी रुपया पुन्हा विहिरीत टाकला आणि नेहमीप्रमाणे बलदेव खांदे उडवून जेवायला निघून गेला. असं बरेच दिवस चाललं. एक दिवस आईकडचे पैसे संपले. बलदेवला एक रुपया देणारी घरातली एकमेव व्यक्ती म्हणजे आई, आणि आता तर तिच्याकडचेही पैसे संपले. म्हणजे आज एक रुपया नाही तर जेवणही नाही. बलदेव काळजीत पडला आणि विचार करता करता त्या दिवशी एक रुपया मिळवण्यासाठी पहिल्यांदा घराबाहेर पडला. आजूबाजूला बघितलं. आपल्याला एक रुपया कोण देऊ शकेल याचा विचार केला. मित्रांकडे, शेजाऱ्यांकडे, ओळखीच्या लोकांकडे एक रुपया मागायची त्याला लाज वाटली. काय कारण सांगून त्यांच्याकडे रुपया मागावा असंही वाटून गेलं. विचार करता करता तो बस स्टँडवर आला. तिथे एक म्हातारे आजी-आजोबा बसले होते. त्यांच्याकडे बरंचसं जड सामान होतं. त्यांच्याकडच्या दोन मोठमोठ्या बॅगा बलदेवने पाहिल्या. तो त्या आजी-आजोबांकडे जाऊन त्यांना म्हणाला, “मी तुमचं हे सामान गाडीत नेऊन ठेवतो, तुम्ही मला एक रुपया द्याल?” आजोबा त्याला कौतुकाने म्हणाले, “का नाही? हे सामान उचलणारं कुणीतरी आम्हालाही हवंच आहे. आणि तू जर तयार असशील तर तुला आम्ही नक्की एक रुपया देऊ.”

बलदेव खुश झाला. त्यानं ते सामान उचलून गाडीत ठेवलं. सामान उचलताना त्याचा हात थोडासा दुखला, त्याला घामही आला. पण एक रुपया मिळवण्याची त्याची काळजी मिटली होती. हाताच्या घामेजल्या मुठीत त्याने तो एक रुपया घट्ट पकडला आणि धावत-धावत घरी आला. घरी यायला त्याला बराच उशीर झाला होता. भूकही खूप लागली होती. त्याने बाबांना तो एक रुपया दिला आणि तो जेवण्यासाठी स्वयंपाकघरात धावणार, तेवढ्यात तो एक रुपया घेऊन बाबा विहिरीकडे जाताना त्याला दिसले. तो धावतच त्यांच्या मागे गेला आणि त्यांना म्हणाला, “हा एक रुपया मी तुम्हाला दिलाय, पण तो नुसताच कुणाकडून घेऊन दिला नाही. तो एक रुपया मिळवण्यासाठी मला बराच विचार करावा लागला; काम शोधावं लागलं. ते काम नीट जबाबदारीने पार पाडावं लागलं आणि मग बराच घाम निघाल्यावर हा एक रुपया मला मिळालाय. मिळालाय म्हणजे मी काम करून कमावलाय. आणि हा एक रुपया मी तुम्हांला विहिरीत टाकू देणार नाही.” बाबांनी बलदेवकडे हसऱ्या डोळ्यांनी पाहिलं आणि त्याच्या घामेजल्या मुठीत तो ‘कमावलेला’ रुपया दिला.

मित्रहो, अनेकदा आपल्याला शाळेतले शिक्षक, मोठी माणसं गोष्टी सांगतात आणि विचारतात, यातून तुम्ही काय शिकलात? पण या गोष्टीनंतर मात्र आपण काय शिकलो हे मीच तुम्हाला सांगणार आहे, काही भन्नाट मित्रांना भेटवून. तुम्हांलाही या मित्रांना भेटायला नक्कीच आवडेल.

परभणीतला गिरीश आता जवळजवळ ३७ वर्षांचा आहे. तो एका संस्थेत प्रशासकीय अधिकारी आहे. पण गिरीश १०-१२ वर्षांचा होता तेव्हा तो दिवाळीच्या सुट्टीमध्ये ‘उटणे’ विकायचा आणि घर चालवायला आईला मदत करायचा. आजही गिरीशला त्याच्या उटणेवाल्या गिरीश रूपाचा प्रचंड अभिमान आहे. तो म्हणतो, “मला माझ्या अशाच छोट्या छोट्या व्यवसायांनी आधार दिला. त्यामुळे मला आर्थिक मदत तर झालीच, त्याहीपेक्षा मला अडचणींशी दोन हात करण्याचा आत्मविश्वास मिळाला. या आत्मविश्वासाच्या वळकट्या त्या वेळी घातल्या गेल्या आणि त्या आजही आधारभूत वाटतात.” मित्रहो, गिरीश असंही म्हणतो, “कष्ट करून पैसे मिळवावे लागतात हे लहान असतानाच कळल्याने मोठं झाल्यावर पैसे खर्च करण्याचा दृष्टीकोन सुधारतो.” असं त्याच्या लक्षात आलं.   

सेलू तालुक्यात राहून रांगोळी विकणारा मोहन तोटे याने तर कमालच केली. आपल्या रांगोळीच्या गाड्याच्या मदतीने त्याने खूप कमी वयातच एक लाख पंधरा हजाराचं घर बांधलं. आज एखाद्या राजमहालात राहावे एवढ्या सुखाने आणि अभिमानाने तो आणि त्याच्या घरची मंडळी त्याच्या त्या पत्र्याच्या घरात राहतात.

आज सी.ए.चा अभ्यास करणारा भैया (याच टोपण नावाने त्याची ओळख आहे), अकरावीपासून ‘अगरबत्त्या’ विकण्याचा व्यवसाय करायचा. खूप पैसे खर्च करून तो शिक्षण घेऊ शकेल अशी घरची परिस्थिती नव्हती. पण तो आपल्या शिक्षकांना भेटला आणि त्यांना सांगितलं की शिकण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. शिक्षक त्याला पैसेसुद्धा देऊ करत होते. पण त्याने ते नाकारले आणि सांगितले, “या महिन्यापासून तुम्ही घरात जे वाणसामान आणाल, त्यात अगरबत्तीचा पुडा आणू नका. तो मी तुम्हाला पुरवीन.”

डी.एड.ची परीक्षा पास होऊन आता शिक्षक म्हणून रुजू झालेला परमेश्वर धुमाळ. हा रोज सकाळी पेपर टाकतो. हो! अगदी शिक्षक झाला तरी पेपरवाला म्हणून आजही त्याची ओळख कायम आहे. त्याला याबद्दल विचारलं तर तो म्हणतो, “मला महिना संपेपर्यंत तरी पेपर टाकावेच लागतील. कारण माझी त्या कामावर निष्ठा आहे आणि शाळेत जाऊन शिकवणं आणि पेपरलाईन टाकणं ही दोन्ही कामं मी एकाच दर्जाची मानतो.”

मित्रहो, पैसे नसणं, कमी असणं ही काही वाईट गोष्ट नसते. पण पैसे असतांना त्यांची किंमत न कळणं ही नक्कीच वाईट गोष्ट आहे. परिस्थितीने ज्यांना लहान वयातच पैसे कमवायला भाग पाडलं, त्यांना त्याच परिस्थितीने पैशाची किंमतही दाखवली. म्हणूनच बलरामचा एक रुपया त्याच्यासाठी लाखो रुपयांइतकाच महत्त्वाचा होता. पैशाला मोल असतं. हाच आजचा मोलाचा संदेश.

- मनश्री पाठक