रानात वनात पाचोळ्या पानात

नाचत आल्या सरी

नाचऱ्या मोराच्या पायात बांधली

घुंगराची दोरी... IIधृII

ढगांच्या आभाळी आले गं गोंधळी

वाजती संभळ धारा

मांदळ्या जोंधळ्या पिकाच्या उरात

भरला उनाड वारा

लाटा गं लाटा पाण्याच्या वाटा

पायाला झाल्या भारी... II१II

गावाच्या शिवारी सांजच्या प्रहरी

डोळे आगाद रानी

सुखाचा शेला घालून आला

घरचा घरधनी

पोरी गं पोरी टपोऱ्या सरी

झेल गं वरच्या वरी... II२II

नाच गं पोरी आभाळदारी

भिजल येनीचा गोंडा

वरुण राजा राजीखुशीनं

पाडल सोन्याचा सडा

माय गं कुशी धनाच्या राशी

पोटाची शिदोरी... II३II

- बळवंत नायक

  नागपूर