हाय! तुम्हाला एक भारी गोष्ट सांगायचीय. एका भन्नाट मित्राला भेटवायचंय. आपला हा नवा गडी पिक्चर काढतो म्हणतात. शप्पथ! मी जेव्हा या पिक्चर काढणाऱ्या मित्राला भेटायला गेले तेव्हा मला वाटलं होतं, हा बुवा असेल आपला पन्नाशीचा, दाढीवाला, केस चित्रविचित्र कापलेला, झब्बा-कुर्त्यातला एखादा पोक्त पुरुष. पण आपला हा मित्र त्याहूनही जबरदस्त निघाला. प्रचंड साधा आणि बोलका. तुम्ही देऊळ आणि वळू हे चित्रपट पाहिले आहेत का? हा त्यांचा डायरेक्टर.

येस, ‘उमेश कुलकर्णी’. त्याला भेटल्यानंतर अगदी सहजपणे आपण त्याला ‘उमेश’च म्हणायला लागतो. त्याच्या नावापुढे सर-बिर लावायची काही गरजच पडत नाही. हा आपल्या पुण्यातल्या भावे हायस्कूलमध्ये शिकला. तसा हुशार; चांगले गुण वगैरे मिळवायचा. पुढे कॉलेजला गेल्यावरही सी. ए. आणि लॉ करण्याच्या विचारात होता. आता तुम्ही म्हणाल, सिनेमाच्या या बेभरवशाच्या लाईनीत कशाला आला? पण इथेच तर आपला मित्र भन्नाट ठरतो.

उमेशला शाळा-कॉलेजपासूनच वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट होता. मग नाटक असो, चित्रकला असो, आर्किटेक्चर असो; प्रत्येक विषयात नाक खुपसून बघायची याची सवय आणि हीच सवय त्याला चित्रपटात/या लाईनीत घेऊन आली. सुमित्रा भावे आणि सुनील सुखटणकर या दोन दिग्दर्शकांनी उमेशला या क्षेत्राचा रस्ता दाखवला. पुण्यातल्या ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टीटयूट’ (FTII) मध्ये उमेशने प्रवेश घेतला आणि त्याने चित्रपटांचा अभ्यास करायला सुरुवात केली. तिथे उमेशला जगभरातले दिग्दर्शक कळले. त्यांच्या फिल्म्स पाहता आल्या.  चित्रपट या माध्यमाचा उपयोग करून लोकांपर्यंत बरंच काही पोहोचवता येतं, हे त्याला कळलं. सुरुवातीला त्याने काही डॉक्युमेंटरीजचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. ‘दोघी’ या चित्रपटासाठीही त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. FTII मध्ये असतांना ‘गिरणी’ नावाच्या त्याच्या शॉर्टफिल्मला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. आणि नंतर त्याच्यासारख्याच वेड्या दोस्तांसोबत त्याने काम करायला सुरुवात केली. त्याच्या फिल्म कंपनीचं नाव सुद्धा भन्नाटच – ‘अरभाट फिल्म कंपनी’. पुण्यातल्या ‘अरभाट’च्या त्याच्या ऑफिसमध्ये, अगदी जमिनीवर मांडी घालून त्याने माझ्याशी मस्त गप्पा मारल्या. उमेश चित्रपटांच्या, डॉक्युमेंटरीजच्या निमित्ताने प्रचंड फिरलाय. त्यामुळे त्याला जगभरातले अनुभव साठवून ठेवता येताहेत. FTIIमध्ये पहिल्या वर्षाला असतानाच फ्रान्सच्या दूतावासाकडून साडेतीन महिन्यांच्या चित्रपटविषयक कोर्ससाठी त्याची भारतभरातून निवड झाली आणि त्याला वेगवेगळ्या देशांतल्या विद्यार्थ्यांसोबत शिकण्याची, काम करण्याची संधी मिळाली. तो म्हणतो की, सगळ्याच कलांची जागतिक राजधानी असलेल्या पॅरीसला तो गेला तेव्हा त्याला तिथे मॉडर्न डान्स, मॉडर्न थियेटर, तिथला ऑपेरा, वेगवेगळ्या कलाकारांची चित्रं, शिल्पं असं भलंमोठं कलाविश्व अनुभवता आलं. वेगवेगळ्या ठिकाणी गेल्याने, तिथल्या माणसांशी संवाद साधल्याने आपल्या अनुभवविश्वाचा विस्तार होतो. आणि आपण आपल्याभोवती आखलेल्या सीमा सोडून विचार करायला शिकतो. आणि म्हणूनच, मी उमेशला जेव्हा विचारलं की तुला चित्रपटांसाठी विषय कसे सुचतात, तेव्हा त्याने अगदी सहज उत्तर दिलं की आपण जे जे ऐकतो, पाहतो, जे आपल्या मनात रुतून बसतं, त्याचीच कल्पना चित्रपटांच्या रूपाने मी पडद्यावर साकार करतो.

मित्रहो, चित्रपटात दिग्दर्शक हा वेगवेगळ्या घटकांना जोडणारा, त्यांना एकत्रित बांधणारा एक दुवा असतो. अभिनेते, लेखक, सिनेमॅटोग्राफर यांच्याबरोबर काम करताना  आपल्या प्रत्येक सहकाऱ्याशी चांगली मैत्री असणं हे चांगला चित्रपट तयार होण्यासाठी खूप महत्वाचं असतं असं तो म्हणतो. मोहन आगाशे, ज्योती सुभाष, चंद्रकांत गोखले, दिलीप प्रभावळकर, नाना पाटेकर अशा ज्येष्ठ कलाकारांनी उमेशच्या चित्रपटांमध्ये काम केलं. उमेश सांगतो की, या मोठ्या मंडळींसोबत काम करताना कामावरची निष्ठा काय असते हे कळतं. अनेक नवीन गोष्टी शिकता येतात. 

‘वळू’ या चित्रपटाविषयी बोलताना उमेशने एक मस्त किस्सा सांगितला. ‘वळू’ या चित्रपटातला हिरो म्हणजे एक बैल. उमेशची ही पहिली निर्मिती. ४००-५०० वळू पाहिल्यावर त्यांनी एक वळू निवडला. हा सांगलीचा पांजरपोळातला वळू. त्याला सांभाळण्यासाठी दोन ट्रेनरही होते. पण शूटिंगच्या पहिल्याच दिवशी दोन की. मी. लांब उभी असलेली एक गाय त्याला दिसली आणि कुंपण तोडून हा वळू धावत सुटला. त्याला आवरताना सगळ्यांचीच दमछाक झाली. चित्रपटात दिसणार ते भलं मोठं धूड प्रत्यक्षातही तेव्हढाच गोंधळ माजवणार होतं. उमेश म्हणतो की चित्रपट पूर्ण होईपर्यंत त्याला शांत राहण्याची बुद्धी मिळावी, एवढीच प्रार्थना करणं आमच्या हातात होतं.

त्याच्या ‘वळू’वरूनच लक्षात येतं की, वेगळ्या धाटणीचे चित्रपट करणे हेच उमेशचे वैशिष्ट्य आहे. एका बैलाला केंद्रस्थानी ठेऊन त्याने ‘वळू’सारखी अप्रतिम निर्मिती केली. उमेशच्या यांसारख्या प्रयोगांकडे पाहून वाटतं की जोखीम घेणं आणि ती निभावून नेणं, किमान तेव्हढा आत्मविश्वास दाखवणं हेच उमेशच्या आजपर्यंतच्या यशाचं गमक असावं. देऊळ, विहीर यांसारख्या त्याच्या चित्रपटांनी मराठी चित्रपटांना खरोखर एका वेगळ्या वाटेने जायला, विचार करायला भाग पाडलं आहे. त्याच्या ‘पुणे ५२’ मधून लवकरच तो पुन्हा नव्या कथेसह आपल्याला भेटणार आहेच.

कमी वयातच प्रचंड कौतुक आणि प्रसिद्धी मिळवलेल्या उमेशला आजही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये डोकवावंसं वाटतं. त्यांचा अभ्यास करावासा वाटतो. तो म्हणतो की, आपण खूप लोकांना जाऊन भेटलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे, वेगवेगळ्या गोष्टी वेचून घेतल्या पाहिजेत. आपल्याला कोणकोणत्या गोष्टींमध्ये रस आहे हे आपण सतत शोधत राहिलं पाहिजे. त्यामुळे ‘करिअर’ वगैरे सारखे भयंकर शब्द मनातही ठेवू नका. जे मनापासून करावंसं वाटेल ते करा. करिअर आपल्याही नकळत आपोआप घडत जाईल.

उमेशच्या बाबतीत तर शब्दशः ते घडलंय. चित्रकला, नाटक, संगीत, चित्रपट अशा कित्येक कलांच्या काठांवरून भटकंती करणारा हा भटक्या काही अवीट गोडीचे कण उचलतो आणि त्याच्या चित्रपटांच्या रूपाने आपल्यासमोर ठेवतो.

-  मनश्री पाठक