आज आपण ‘खंड्या’ पक्ष्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ या. खंड्या हा आकाराने लहान असणारा पक्षी. या पक्ष्याचे शास्रीय नाव Halcyon smymenis असे आहे. पण चपळाईने मासे पकडण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे त्याला ‘किंगफिशर’ हे नाव पडले असावे. खंड्या रूपाने रंगीबेरंगी, अतिशय आकर्षक आणि सुंदर असतो. त्यामुळे रंगाची उधळण करणारा पक्षी म्हणून त्याला ओळखले जाते. अगदी एकाग्रतेने पाण्यात सुर मारून शिकार करणे हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे. हवेत उडणारे किटकही खंड्या अगदी सहज पकडतो. छोटे मासे, बेडकांची पिल्ले, छोटे किडे हे या पक्ष्यांचे मुख्य आणि आवडते अन्न आहे. त्यामुळे नदी, ओढे, तळी यांच्या काठी रहाणे ते पसंत करतात. ते एक ते दीड फुट लांब, आडवे बीळ बनवतात. साधारण मार्च ते जून या महिन्यांच्या कालावधीत ते आपले घरटे बांधण्याचे काम करता. त्यातच आपली अंडी घालतात. मादी एका वेळेला ५ ते ७ अंडी घालते. अंडी उबविण्याचे काम मात्र नर आणि मादी हे दोघे मिळून करतात. खंड्या पक्षी हा उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात आढळून येतो. डोक्याचा वरचा भाग निळा, त्यावर काळ्या आडव्या रेषा, पंख निळे-हिरवे, लांब चोच, आखूड शेपूट आणि अंगावर काळे ठिपके ही सर्वसाधारण लक्षणे या पक्ष्यात दिसून येतात. मात्र हा देखणा पक्षी हवेत जास्त वेळ उडू शकत नाही. तो लगेचच दमतो. सहजच नजरेला न पडणारा हा पक्षी त्याच्या ‘किलकिल’ आवाजावरून ओळखता येतो.

आपल्या देशात लहान खंड्या (Small blue), कवडा खंड्या (Indian pied – या जातीचा पक्षी काळ्या–पांढऱ्या रंगाचा असतो), काळ्या डोक्याचा खंड्या (Black capped), तीबोटी खंड्या (Indian three toed), घोंगी (Brown headed stork billed), मलबारी खंड्या (Malbar white collared) अशा इतर अनेक जाती आपल्याला पाहायला मिळतात.

- ग्रीष्मा सबनीस