मुलांनो, लय हा मानवी जीवनाचा प्राण आहे. लय म्हटलं की वेग, गती हे शब्द आठवतात, निसर्गातील प्रत्येक गोष्टीला लय असते. त्याप्रमाणे एखादी कविता लयीत म्हटली तर ती आपल्याला लगेच पाठ होते. तसेच मुलांनो, काही शब्द आपण लयीत म्हणू या, वाचू या. त्या लयीत ते शब्द, समान अर्थाचे असतील तर शब्दसंग्रह पण होईल आणि गंमतही येईल. कोणतेही कार्य करायला आपल्यात जोर हवा, बळ हवे. त्यासाठी 'बळ' या शब्दाच्या अर्थाचे गाणे म्हणू या.
 
बळ, रग, ताकद, जोर.
खुमखुमी, आवेश, वीरश्री, जोम.
 
तडफ, चैतन्य, धमक, टवटवी.
धाडस, साहस, प्राबल्य, तरतरी.
 
दहशत, टाप, बिशाद, ठसका.
उत्साह, झेप, तग, दबदबा.
 
आव, बलाढ्य, महाबल, ताव.
आवाका, कुवत, धिटाई, टाप.
 
सामर्थ्य, कस, हिम्मत, शक्ती.
अशी करा शब्दांशी मस्ती.
 
- वरदा विद्याधर पटवर्धन
  मा. स. गोळवलकर गुरूजी विद्यालय