मनासी संवाद

दिंनाक: 22 Mar 2019 13:37:13

 


वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे 

पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥ 
येणे सुखें रुचे एकांताचा वास 
नाही गुणदोष अंगा येत ॥२॥ 
आकाश मंडप पृथिवी आसन
रमे तेथे मन क्रीडा करी ॥३॥ 
कंथाकमंडलु देहउपचारा 
जाणवितो वारा अवसरू ॥४॥ 
हरिकथा भोजन परवडी विस्तार 
करोनि प्रकार सेवू रुची ॥५॥ 
तुका म्हणे होय मनासी संवाद 
आपुलाचि वाद आपणांसी ॥६॥

संत तुकारामाचा किती सुंदर अभंग! निसर्गाचा किती रम्य अनुभव यात चित्रित केला आहे! निसर्गाची आणि एकांताची ओढ कायमच संत तुकारामांच्या मनात होती. निसर्गावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या मनाला वृक्ष व वेली हे आपले नातेवाईकच वाटत. वनातील प्राणी आणि पक्षांचं सुमधुर संगीत त्यांच्या मनाला आनंद देत. एकांताच्या सुखाची ओढ, निसर्गाच्या सहवासात राहण्यात त्यांना गोडी वाटते. वर आकाश आणि पृथ्वीच्या आसनाव्यतिरिक्त दुसरं काही नको असं वाटतं. केवळ आवश्यक तेवढेच ‘कंथा’ (घोंगडी) आणि कमंडलू (भांडे) त्यांना पुरेसं वाटतं. तुकारामांचं असं विलक्षण विरक्त जीवन! निसर्गाच्या सानिध्यात परमेश्वराचंं चिंतन करणं हेच त्यांना भोजन वाटतं. अशा सुंदर, निसर्गरम्य  वातावरणात आपल्या मनाशी संवाद करीत आपण आपल्याच मनाशी वाद घालीत संत तुकाराम प्रहर न् प्रहर व्यतीत करताना या अभंगात दिसतात. 

सर्वांगांनी निसर्गाचा अनुभव घेणारे ‘कवी’ तुकाराम या अभंगातून आपल्यासमोर उभे राहतात. त्याचबरोबर एक 'चिंतनशील आध्यात्मिक संत'ही या अभंगातून आपल्याला भेटतात. तुकारामांमधील ‘संत’ आपल्या मनाच्या संवादांबद्दल बोलताना, स्वत:शीच वाद घालताना, आपल्या मनाच्या क्रीडांचा वेध घेताना आपल्याला दिसतात.

मित्रांनो, काय वाटलंं हे वाचून? आपल्यालाही कधी निसर्गाची अशी ओढ लागते? आपल्याच मनाशी कधी बोलत बसतो का आपण? आपल्या मनाशी कधी भांडतो तरी का?

मला माहीत आहे की, यातलं काहीच आपण करत नाही. आपण नेहमी दुसऱ्यांंशीच बोलत असतो. विशेष म्हणजे दुसऱ्यांबद्दल बोलत असतो. अगदी जोरजोरात बोलत असतो. दुसऱ्यांशी भांडण्यात, इतरांचे दोष शोधण्यात आपण फारच रस घेतो. दुसऱ्यांचे दोष काढले की, आपण केवढे हुशार, असं आपल्याला वाटतं. दुसऱ्यांचे दोष काढले की, ते दोष आपल्यात नाहीत, या गैरसमजाने आपण भलतेच खूश होतो. दुसऱ्यांशी संवाद साधताना आपले दोष कोणी दाखवले तर...? तर ते दोष आपण मान्यच करत नाही. उलट त्याबाद्दल आवेशाने बोलून आपण कसे दोषमुक्त आहोत, हे सिद्ध करण्यासाठी धडपडतो.

आपल्याला आपल्याशी बोलण्याचा आनंद घेता आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला आपल्या 'मनाशी सवांद' साधावा लागेल. काय करावे लागेल त्यासाठी? त्यासाठी बाहेरच्या कोलाहलापासून दूर एकांतात गेलं पाहिजे. डोळे मिटून स्वत:शी बोलायला सुरुवात करायला हवी. ‘माझ्यात कोणते दोष आहेत? ते कसे दूर करता येतील? माझ्यात कोणते गुण आहेत? ते कसे वाढवता येतील? मी कोणावर रागावलो का? आपण का रागावलो? माझ्यावर कोणी रागवलं का? आणि का रागावलं? मला कोणाचा राग येतो? मला कोणाचा द्वेष वाटतो? कोणाचा द्वेष वाटणे योग्य आहे का? इतरांसाठी मी काही वेळ देतो का? घरातली माणसं, सहवासात येणारी माणसं यांची दुःखं मी समजून घेतो का? माझ्या दुःखांबरोबरच मी इतरांची दु:ख दूर करण्यासाठी काय करतो? काय केलं?’

असे प्रश्न स्वत:ला विचारले की, आपणच आपल्याला समजून घेऊ लागतो. दुसऱ्यांचं मन नीट समजून घ्यायचं असेल ना तर आधी आपलं मन समजून घ्यायला हवं. या दिशेने विचार करायला लागल्यावर जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो हे आपल्या लक्षात येईल.

दुसऱ्यांशी बोलणं खूप सोपं असतं. स्वत:शी बोलणं, मनातल्या मनात बोलणं तसं सोपं नसतं. दुसऱ्यांचे दोष सहज दिसतात, ते दाखवण्याची तत्परताही असते. पण आपल्याला आपले दोष दिसणं, ते मान्य करणं, त्यावर विचार करणं आणि ते दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं सोपं नसतं, याचा अनुभवही आपल्याला येतो.

अशा वेळी स्वत:ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून आपण स्वत:वर प्रश्नांचा वर्षाव करतो. आपल्या चुका आपल्याला परखडपणे सांगतो, तेव्हा चुकांची कबुली देणं अवघड वाटतं, पण जेव्हा आपणच आपल्याला ‘आपण चुकलो’ अशी कबुली देतो, तेव्हा मन हलकं होतं. मनाला आनंद वाटतो. हा आनंद खूप वेगळ्या प्रकारचा आहे हे जाणवतं.

मात्र स्वत:शी केलेल्या या संवादातून काही निष्कर्ष काढले पाहिजेत. या विचारांना कृतीची जोड दिली पाहिजे. तरच या संवादाचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल. इतरांबद्द्लच्या गैरसमजामुळे, द्वेषामुळे मन मलिन होतं. स्वच्छ मनाने स्वत:कडे आणि इतरांकडे पाहणं वाटतं तेवढं सोप नसतं. त्यामुळे आपल्या सहवासात येणाऱ्या सगळ्या माणसांवर त्यांच्या गुणदोषांसकट प्रेम करता येईल. अगदी आपला निंदक, आपला विरोधक, आपले दोष काढणाराही ‘आपला‘ आहे; अशा उदारपणे त्याच्याशी वागणं अवघड असतं हे मान्य. पण जेव्हा हेही घडतं तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. एकदा अनुभव तर घ्या.

‘जेथे जातो, तेथे तू माझा सागांती|’ असं तुकारामांनी परमेश्वराला म्हटलं आहे. आपण संत तुकारामांना तसं म्हणू या! त्यांच्या अभंगाच्या प्रकाशात स्वत:मध्ये चांगले बदल घडवू या!

- श्री. वा. कुलकर्णी