हार्मोनिअम

दिंनाक: 21 Mar 2019 13:45:33


पाश्चात्य संगीतात मेलडी आणि हार्मनी अशा दोन संज्ञा आहेत. मेलडी म्हणजे स्वरांची धून किंवा स्वरवेल किंवा सुरावट. हार्मनी म्हणजे एक, दोन किंवा तीन अशा स्वरांच्या गुच्छांचा एकमेकांशी केलेला संवाद. मराठी भाषेमध्ये सुसंवाद किंवा ताळमेळ अशा अर्थासाठी हार्मनी हा शब्द वापरला जातो. हार्मनीमधूनच हार्मोनिअम हा शब्द निर्माण झाला. आज आपल्या संगीतात आपण जे हार्मोनिअम वापरतो ते परदेशात वापरल्या जाणाऱ्या मूळच्या हार्मोनिअम या वाद्याचे संस्कारित रूप आहे. हार्मोनिअम म्हणजे पाश्चात्यांमध्ये पायपेटी असाच अर्थ होतो. पायपेटी ते हातपेटी हा प्रवास पूर्ण होऊन जवळजवळ दोन शतके होतील. अलेक्झांडर फ्रांस्वा दबे या फ्रेंच संगीतकारावर या वाद्यांच्या जनकत्वाचा शिक्का जरी असला तरी कर्स्निक हेच या वाद्याचे खरे जन्मदाते आहेत. कारण एका हाताने भाता मारून स्वरपट्ट्या वाजतील असे यंत्र कर्स्निक यांनी प्रथम तयार केले. ‘शेंग’ नावाच्या चीनी वाद्यामधून प्रेरणा घेऊन या वाद्याचा जन्म झाला. हार्मोनिअम किंवा शेंग या दोन्ही वाद्यांचे मूळ तत्त्व एकच, ते म्हणजे त्यात असलेले रीड किंवा स्वर निर्माण करणारी पितळी धातूची पट्टी. या रीडलाचं फ्री रीड असे संबोधले जाते. आपल्याकडे जत्रेमध्ये वाजवली जाणारी पिपाणी म्हणजे एक रीडच आहे. फुगा फुगवून भोंग्यासारखे आवाज काढणाऱ्या वाद्यात अशीच पिपाणी किंवा ही रीड असते. अजूनही काही जण झाडांच्या पानांची विशिष्ट घडी घालून पुंगीसारखे वाजवतात. थोडक्यात, हे ‘सुषीर’ – म्हणजे हवेने वाजले जाणारे - वाद्य आहे.

शेंग, माउथऑर्गन, बँडोनियन, ऑर्गन ही सगळी आपल्या हार्मोनिअमचीच भावंडे. यामधली स्वरपट्टी किंवा फ्री रीड ही हार्मोनिअमच्या भात्यातील हवेमुळे वाजते. स्वरपट्टीला स्वरपत्ती म्हटल्यास अधिक योग्य म्हटले पाहिजे. कारण ही स्वरपत्ती एका बाजूला जोडली असून त्याची दुसरी बाजू जीभेप्रमाणे मोकळी असते, जी हवेमुळे कंप पावते व त्यातूनच नाद किंवा स्वर तयार होतो. या वाद्याला कोणी संवादिनी तर कोणी स्वरमंजूषा असे म्हणतात. सर्वसाधारणपणे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीमधून किंवा युरोपमधून आलेल्या या वाद्याने भारतात आपले स्थान निर्माण केले; इतकेच नाही, तर सर्व संगीत मैफलींचा प्राण अशी ख्यातीही या वाद्याने मिळवली, हे या वाद्याचे भाग्यच म्हटले पाहिजे.

पायपेटी, ऑर्गन व हातपेटी या वाद्यभावंडांनी आपापली संगीतक्षेत्रे निर्माण केली आहेत. ऑर्गन नाट्यसंगीतासाठी सुयोग्य ठरले, पायपेटी तमाशाच्या बारीवर किंवा थेट कीर्तन मंडपात! हातपेटीने, म्हणजेच हार्मोनिअमने शास्त्रीय व सुगम संगीत काबीज केले. गोविंदराव टेंबे यांच्यापासून ते अप्पासाहेब जळगावकर यांच्यापर्यंत, महिला वादक वासंती म्हापसेकरांपासून पं. अरविंद थत्ते यांच्यापर्यंत या वाद्याच्या वादकांची परंपरा पोहोचते. खासकरून महाराष्ट्रात आणि कर्नाटकात या वाद्याने रसिकजनांवर आपली मोहिनी घातली आहे.

हार्मोनिअम या वाद्याचे प्रकार मुख्यत्वे दोनच – एक म्हणजे उभ्या स्वरांची व दुसरी आडव्या स्वरांची. उभ्या स्वरांची हार्मोनिअम थोडी मऊ आणि गोड वाजते, तर आडव्या स्वरांची हार्मोनिअम कर्कश किंवा मोठ्याने वाजते. पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र व कर्नाटक येथे हे वाद्य बनवणारे कारागीर आढळतात.

आडवा भाता हे महाराष्ट्रातल्या हार्मोनिअमचे वैशिष्ट्य. त्यातही ‘स्केलचेंजर’ हा येथील सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. ज्यांना वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये वादन करता येत नाही अशा व्यावसायिकांमध्ये (विशेषतः गायन करता करता वाजवणाऱ्या कलाकारांमध्ये) ही हार्मोनिअम सर्वात लोकप्रिय आहे. यामध्ये गवयाच्या सोयीप्रमाणे पट्टीचा ‘सा’ मागे-पुढे करण्याची सोय असते. ट्यूनिंगच्या संदर्भात जनरल ट्यूनिंग व गंधार ट्यूनिंग हे दोनच मुख्य प्रकार सांगता येतात.

सिंथेसायझर व हार्मोनिअम ही दोन्ही वाद्ये आपापल्या ठायी श्रेष्ठ आहेत. आजही हार्मोनीअमची आवड व त्याचा प्रचार-प्रसार पूर्वीप्रमाणे अधिकच आहे. ‘लेके पहला पहला प्यार’, बाई मी विकत घेतला श्याम’, या व अशांसारख्या अनेक गीतांमधून ते अगदी आजच्या मोबाईल रिंगटोनपर्यंत हे वाद्य रसिकांच्या हृदयाचा ठाव घेऊन राहिले आहे.

गोविंदराव टेंबे हे हार्मोनिअम वाद्यातील महर्षी पितामह. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, “हार्मोनीअमच्या काळ्या कुळकुळीत आणि पांढऱ्या पट्ट्यांची शोभा सृष्टीतील कोणत्याही वस्तूला नाही. या वाद्याला एकदा प्रेमाने जवळ घ्यावे.”

-  पुष्कर मुंडले