ज्या समाजात शिक्षण-विचाराला सुयोग्य असे स्थान आहे, त्या समाजाचे भविष्य निश्चितच उज्ज्वल असते. त्यामुळे प्रगत अशा देशांमध्ये शिक्षणाला प्रतिष्ठा आहे. शिक्षणाचे सामर्थ्य प्रगत समजाने ओळखलेले असते. म्हणूनच आपल्या समाजातील ‘किशोर’, ‘युवक’ अशा काळातील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी विशेष लक्ष दिले जाते. असा समाज शिक्षणासाठी योग्य अशी तरतूद – आर्थिक तरतूद, मनुष्यबळाची तरतूद करतो.

औपचारिक शिक्षण हे शाळांमध्ये दिले जाते, तर अनौपचारिक शिक्षण घरी दिले जाते. शाळेतील अध्ययन, अध्यापन हे विशेष प्रशिक्षित अध्यापकांकडून होते, तर घरी दिले जाणारे शिक्षण अनौपचारिक संस्कारांतून आई, वडील, आजी, आजोबा यांच्याकडून दिले जाते. घर असो वा शाळा, प्रत्येक ठिकाणी विचार असतो तो मुलांचा, विद्यार्थ्यांचा! शिक्षणविषयक विचारांच्या परिघात ‘घर’, ‘शाळा’, ‘पालक’, ‘अध्यापक’ व ‘विद्यार्थी’ यांना अत्यंत मोलाचे स्थान असते.

विद्यार्थी घरी असो वा शाळेत, त्याच्या विकासाचा सातत्यपूर्ण विचार जो समाज करतो, तो समाज आपल्या भविष्याचा विचार करीत असतो. आपली भविष्यकालीन स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील असतो. ‘उद्याची’ स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ‘आज’ काय करायला हवे, याची डोळस कृतीप्रणाली म्हणजे शिक्षण. मात्र ही कृतीप्रणाली, त्यामागील तत्त्वप्रणाली व ती प्रत्यक्षात आणणारा अध्यापकवर्ग यांची जडणघडण करावी लागते. पालकत्वाचा विचारही व्हावा लागतो. अध्यापक व पालक यांच्यातील शिक्षणविषयक जबाबदारीची जाणीव विकसित कशी होईल, याचा सातत्यपूर्ण विचार करणे आवश्यक ठरते. त्यातून आजच्या विद्यार्थ्यांची परिणती उद्याच्या सुजाण नागरिकांत होऊ शकते. या सर्व शिक्षणविषयक तत्त्वांचा व स्वप्नांचा केंद्रबिंदू ‘बालक’ किंवा ‘विद्यार्थी’ असायला हवा.

आपल्या विद्यार्थ्याची जडणघडण केवळ शाळेत होते का? आपल्या विद्यार्थ्याची जडणघडण घरी होण्यासाठी पालकांनी काय करायला हवे? विद्यार्थ्याला अभ्यास करण्याची गोडी लागावी यासाठी ‘शाळे’ने (म्हणजे अध्यापकांनी) काय करायला हवे? ‘घरा’ने (म्हणजे पालकांनी) काय करायला हवे? आपला नागरिक मनाने व शरीराने सुदृढ व्हावा, तसेच त्याचे नैतिक आचरणही उत्तम असायला हवे, यासाठी काय काय करावे लागेल? ‘मला केवळ माझाच विचार करावयाचा नाही, तर माझे आई-बाबा, माझा समाज व माझा देश यांचाही विचार करावयाचा आहे.’ याचे भान विद्यार्थ्यांमध्ये कसे निर्माण करता येईल? असे प्रश्न म्हणजे खरोखरच आपल्यापुढील आव्हाने आहेत. ही आव्हाने पेलण्याची क्षमता आपल्यात निर्माण व्हायला हवी. ‘शाळा’ व ‘घर’ यांचा शैक्षणिक दृष्टीकोनातून विचार करण्यासाठी एक स्वतंत्र, सक्षम व्यासपीठ निर्माण होण्याची गरज आहे.

शालेय कालखंड हा मुलांच्या जीवनातील अत्यंत संवेदनशील कालखंड असतो. जिज्ञासा आणि कुतूहल यांनी भरलेल्या व भारलेल्या नजरेने ती निसर्गाकडे व साऱ्या विश्वाकडे पाहत असतात. ‘मला शिकायचे आहे.’ असे म्हणत मुले शिकत असतात. त्यांचे हे शिकणे आनंददायक व्हायला हवे. मुख्य म्हणजे ‘शिकायचे कसे?’ हेही त्यांना शिकवायला हवे. ‘मुलांचे शिकणे’ हा पालकांच्या आणि अध्यापकांच्या अभ्यासाचा विषय व्हायला हवा. अनेक शैक्षणिक उपक्रम, प्रयोग यांच्या माध्यमांतून हे शिकणे घडायला हवे. खरे तर ‘शिकणे हा मनाचा उत्सव आहे.’ ही मुलांची अनुभूती व्हायला हवी. त्यासाठी अध्यापकांनी आपल्या वर्गातील प्रत्येक क्षणाचा विचार करायला हवा. क्षण क्षण शिक्षण व्हायला हवे. त्यासाठी अध्यापक व पालक यांच्यात संवाद व्हायला हवा.

प्रत्येक शाळेतील अध्यापकांमध्ये ’नोकर’ या भूमिकेपेक्षा ‘अधिक’ काहीतरी उमलायला हवे. अध्यापकांच्या प्रतिभेतून नवनवे उपक्रम फुलायला हवेत. तसेच आपल्याला शिक्षणविश्वात पडलेल्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी त्यांनी शोध घ्यायला हवा. प्रत्येक अध्यापकाच्या मनात जसा सेवाभाव जागायला हवा, तसा वात्सल्यभावही जागायला हवा. त्यामुळे शाळा गुरुकुल होईल व गुरुकुल मुलांसाठी घरकूल होईल. काहीतरी नवे शिकण्यासाठी पुस्तकांचा खजिना मुलांपुढे उघडायला हवा. वाढत्या वयाबरोबर वाचण्यातील आनंद वाढायला हवा. मुले, त्यांचे मित्र व शिक्षक यांचे परस्परसंवादाचे क्षण फुलायला हवेत.

मुलाला जन्म दिल्यावर ‘आई-बाबा’ ही पदवी मिळते, पण ‘उत्तम आई-बाबा, पालक होणे ही एक साधना असते.’, हे कोठेतरी आई-बाबांनी मनावर कोरून ठेवायला हवे. ‘मूल समजून घेणे’ ही जशी आनंदाची गोष्ट आहे, तसेच ते एक आव्हानही आहे. आपल्या मुलांना सांगण्यासाठी ‘गोष्टी’ वाचल्या पाहिजेत, हेही पालकांना समजायला हवे. मुलांशी संवाद साधताना, ‘मुलांचे सारे काही ऐकण्यासाठी’ (ऐकून घेण्यासाठी) आई-बाबांनी अधीर व्हायला हवे. मार्कांच्या मागे लागणे म्हणजे शिक्षण नसून ‘शिकण्यातील आनंद घेणे, शिकण्यासाठी प्रेरणा देणे आणि ज्ञानाची नवी नवी प्रवेशद्वारे त्यांच्यासाठी खुली करायला मदत करणे, म्हणजे शिक्षण’ हे समजून घ्यायला हवे. मुख्य म्हणजे, शिकताना व खेळताना आपल्या मुलांबरोबर आपण असायला हवे. त्यासाठी आई-बाबांनी मुलांसाठी आवर्जून वेळ काढायला हवा. घर म्हणजे चार भिंती आणि छप्पर नव्हे; घर म्हणजे आई-बाबा, आजी- आजोबा, मूल-नातू, दादा-ताई अशी रेशमी धाग्यांची वीण मुलांनी अनुभवणे – त्याला म्हणायचे ‘घर बांधणे’. मुलांना स्वातंत्र्य देऊन त्यांना फुलवणे म्हणजे ‘आई-बाबांनी फुलणे’. असे घरकूल मुलांना हवे आहे. मुलांना अशा घरकुलाची तहानभूक आहे, अशा घरकुलातील ज्ञानसाधना म्हणजे घरकुल गुरुकुल होणे!

आई-बाबांनी शिक्षक होणे, शिक्षकांनी आई-बाबा होणे, घरकूल गुरुकुल होणे आणि गुरुकुल घरकूल होणे म्हणजे मुलांच्या मूलपणाचा गौरव होय! त्याचेच दुसरे नाव शिक्षण!

-  श्री. वा. कुलकर्णी