माझी जबाबदारी म्हटलं की, ती पूर्ण पडण्यासाठी आपण अतोनात कष्ट करतो. दुसरं कोणी ती जबाबदारी घेण्याचं ठरवलं, तर आपण त्यास साफ नकार देतो. मग देशाच्या स्वच्छतेच्या बाबतीतच तडजोड का? निःशब्द खळबळ माजली ना मनात? आठवा बरं, आपण काय-काय करतो ही जबाबदारी पार पडण्यासाठी? जर देश माझा आहे, तर मग त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी माझीच नाही का? रस्त्याने जाता-येता दिसणारे कचर्‍याचे ढीग म्हणजे, मी माझी जबाबदारी विसरल्याचेे पुरावे!
आपण काय करतो? बेरोक, बिनधास्तपणे बायका घरासमोरच्या विजेच्या खांबाखाली खरकटे टाकतात. कधीकधी तर इतकी दया येते, त्या विजेच्या खांबाची, कोणाचं काय घोडं मारलंय त्यानं कुणास ठाऊक? असो अनेक रिकामे प्लॉट तर सुशोभित करावे तसे, मुद्दाम कचर्‍याने भरवले जातात. लहान मुलं किती निरागस दिसतात! पण ती निरागसता चॉकलेट खाईपर्यंतच असते. जेव्हा त्याच चॉकलेटचा कागद रस्त्यावर पडलेला दिसतो, तेव्हा मात्र स्वतःचीच लाज वाटते.
जर स्वच्छतेची जबाबदारी सर्वांनी लक्षात घेतली असती, तर ‘येथे थुंकू नका’च्या खाली लाल डाग दिसले नसते. बस व रेल्वेस्थानकाच्या कोपर्‍यात तंबाखूचे पुडके दिसले नसते. रिकाम्या प्लॉटमध्ये प्लास्टिकचा खच दिसला नसता. सार्वजनिक शौचालये निदान वापरण्याइतकी स्वच्छ राहिली असती. काही उपयोग नाही प्रतिज्ञा म्हणण्याचा, प्रतिज्ञा म्हणायची नि सोडून द्यायची, अशी जणू प्रतिज्ञाच केली आहे लोकांनी. आता गरज आहे प्रतिज्ञांची नाही तर प्रकल्पांची. स्वच्छता प्रकल्प आता काळाची गरज आहे. समाजमाध्यामांवरून (ज्यांना शुद्ध मराठीत सोशल मिडिया म्हणतात) राजकारण, वादाच्या विषयांचे मेसेज पाठवण्यापेक्षा आमचे स्वच्छता अभियान अशा टॅगलाईनचे फोटो पाठवा. अभियानातले सेल्फी एफ.बी. वर पोस्ट करा. लाईक्स मिळतीलच.
स्वच्छतेचा कंदील हाती घ्या, जबाबदारीने सांभाळा, अस्वच्छतेचा अंधःकार कुठल्या-कुठे जाईल फक्त एकाच गोष्ट लक्षात ठेवा, कंदिलाची जबाबदारी माझी.
- गांधाली प्रसाद कुलकर्णी, इ.८वी
केशवराज मध्यामिक विद्यालय, लातूर