अनंत

दिंनाक: 02 Mar 2019 12:56:17


अनंताला गंधराजही म्हटले जाते. याचे शास्त्रीय नाव गार्डेनीया प्लोरीडा. त्याचे कुल रुबिएसि. बागेतील लोकप्रिय व अत्यंत सुमधुर वासाचे फूल. झुडूपवर्गीय असून ते मूळचे चीन, जपान येथील आहे. सदाहरित असे हे झाड. उष्णकटिबंधातील हे आहे. याची पाने समोरासमोर, साधी, लांबट, गर्द हिरवी मागच्या बाजूने समोरासमोर ठळकपणे दिसतात. उपपर्णे पातळ, जुळलेली असतात.

फुले एकाकी, पांढरी, मोठी, बहुधा फांद्यांच्या टोकास, सुवासिक व दुहेरी पाकळ्यांची, त्यांची टोके जोडलेली वाटतात. (चौफुल्यासारखा आकार वाटतो) वसंत ऋतूत व उन्हाळ्यात ही फुले जास्त येतात. याची उंची दोन मीटरपर्यंत असते, साल काळी, खरबरीत असते. बागेत लावण्यास हे योग्य झाड आहे. शोभेकरीताच म्हणता येईल. कुंडीत हे झाड लागल्यास त्याची वरचेवर छाटणी करावी लागते. याला जुलै-सप्टेंबरमध्ये फुले येतात.

लागवडीसाठी निरोगी झाडांच्या तीन-चार डोळ्यांच्या फांदीचा छाट रेताड जमिनीत हिवाळ्यात लावतात. मुळ्या फुटल्यावर कुंडीत ३ भाग माती + १ भाग कुजलेले शेणखत घालून मे-जूनमध्ये त्यात भोवती माती दाबून लावतात. कुंडीत चांगली वाढ झाल्यावर कायम ठिकाणी ते लावून त्यात हाडांचा चुरा + शेणखत, मग पाणी देतात. पुष्कळ वर्षे हे झाड जगात असले तरी १ वर्षभरच अशी झाडे ठेवणे फायदेशीर असते. कळ्या आल्यावर खत दिल्याने फुले मोठी येतात. याला उष्ण व दमट हवा मानवते. सूर्यप्रकाशाची जरुरी असतेच व याला निचरा होणारी जमीन लागते. याच्या कोवळ्या नारंगी कंगोरेवाल्या मगजात अनेक बिया असतात. फळ क्वचितच मिळत असल्याने नवीन लागवड छाट कलमाने करतात.

चिनी लोक चहाला फुलांचा वास व अन्नाला मगजाचा (नारंगी) रंग देतात. कोकणात मुळांचा लेप डोकेदुखीवर लावतात. मज्जातंतूविकार, अग्निमांध यावर मूळ गुणकारी आहे. विरेचक, कृमिनाशक, आकडी बंद करणारे, जंतू-नाशक इ. गुण या वनस्पतीत आहेत.

-मीनल पटवर्धन 

[email protected]