आपले पर्यावरण

दिंनाक: 19 Mar 2019 12:39:38


पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचा परिसर होय. पर्यावरणात भू-आवरण, वातावरण, जलावरण या अजैविक घटकांचा, तसेच जीवावरण या जैविक घटकाचा समावेश होतो. हे सर्व घटक निसर्गनिर्मित आहेत. याशिवाय पर्यावरणात घरे, रस्ते, कारखाने, धरणे, पूल, वाहने इत्यादी अनेक मनुष्यनिर्मित घटकांचाही समावेश होतो. या मनुष्यनिर्मित घटकांनी बनलेल्या पर्यावरणाला ‘सांस्कृतिक पर्यावरण’ म्हणतात.

एखाद्या प्रदेशातील निर्जीव घटकांनी (उदा. डोंगर, वाळवंट, नदी, हवामान, पाऊस इत्यादींनी) बनलेले पर्यावरण व त्या पर्यावरणातील सर्व सजीव घटक (उदा. वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक इत्यादी) यांच्या परस्परावलंबी अस्तित्वाबाबतची गुंतागुंतीची व्यवस्था म्हणजे ‘परिसंस्था’ होय. जीवसृष्टीचा उदय झाल्यावर सर्वत्र निरनिराळ्या परिसंस्था विकसित झाल्या.

निसर्गात सजीवांच्या असंख्य जाती व उपजाती आढळतात. त्यामुळे जीवसंस्था व जीवविविधता या दोन्ही अंगांनी जीवावरण समृद्ध बनले आहे. जीवावरणाची ही समृद्धी म्हणजे ‘जैवविविधता’ होय. निसर्गातील जैवविविधता, जीवांचे परस्परावलंबत्व हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. ही जैवविविधता मानवी जीवनाला उपयुक्त आहे. अन्नसाखळी व अन्नजाळे जैवविविधतेशी निगडीत आहेत.

या जैवविविधतेच्या ऱ्हासाची कारणे अनेक आहेत. जीवसृष्टीच्या उत्क्रांती प्रक्रियेत काही जीव कायमचे नष्ट झाले. उदा. डायनोसॉर हे महाकाय प्राणी. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे निसर्गातील मानवाच्या हस्तक्षेपाची वाढती तीव्रता यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. याखेरीज माणसाची सुखसमृद्धीची न शमणारी हाव व त्यातून निर्माण झालेला साधनसंपत्तीचा बेसुमार व अविवेकी वापर यामुळेही ऱ्हास होत आहे.

डायनोसॉर हा महाकाय प्राणी व डोडो हा मादागास्करमधील एक पक्षी पृथ्वीवरून नामशेष झाले आहेत. तर भारतीय सिंह, कस्तुरीमृग, वाघ, नागराज (किंग कोब्रा), सारस वा क्रौंच, पांढऱ्या चोचीचे गिधाड, गंगा नदीतील डॉल्फिन, इथिओपियातील तांबडा कोल्हा, रशियातील सायबेरीयन वाघ, उत्तर अमेरिकेतील रेनडीअर, सेशल्स बेटावरील फ्लाइंग फॉक्स हे जीव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत,

नव्या तंत्रज्ञानामुळे पृथ्वीवर अनेक दुष्परिणाम झालेले दिसतात. जंगले तोडल्यामुळे जमिनीची धूप झाली आहे. मोठी धरणे व कालवे यांच्यामुळे पाण्याचा बेसुमार वापर होतो व जमिनीची क्षारता वाढली. कृत्रिम खाते, कीटकनाशके यांच्या अविवेकी वापरामुळे जमिनीचे प्रदूषण वाढले. अविवेकी गुरे चराईमुळे कुरणांची हानी झाली. शहरातील कारखान्यातील घातक कचरा (रसायने इत्यादी) जमिनीत पुरण्यामुळे जमीन प्रदूषित होत आहे. खाणकामातून निर्माण झालेली अनुपयुक्त माती व इतर निरुपयोगी पदार्थ यांमुळेही जमीन प्रदूषित होत आहे. जुने टी.व्ही., फ्रीज इत्यादींमुळे ‘ई-वेस्ट’ (ई-कचरा) वाढत आहे.

अनेक कारणांमुळे पाण्याचे प्रदूषण होते. खते व जंतुनाशके यामुळे भूपृष्ठावरील पाण्याचे प्रदूषण होत आहे. पंप, बोअरवेल यामुळे पाण्याची पातळी खाली जात आहे. समुद्रातील बोटींमधून टाकली जाणारी प्रदूषके व अपघातग्रस्त तेलवाहू जहाजांतून बाहेर पडणारे लाखो टन तेल यामुळे सागरी प्रदूषण वाढते. आण्विक कचरा समुद्रतळाशी साठवला जात आहे. त्यातील किरणोत्सर्गामुळे पाणी प्रदूषित होण्याचा धोका आहे. आण्विक प्रदूषण वाढले आहे.

कारखाने, वाहने यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड व कार्बन मोनॉक्साईड यांचे प्रमाण वाढते. वातावरणातील ओझोन वायूच्या संरक्षक पट्ट्याची हानी झाली असून ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या सुमारे ४०० वर्षांत काही वनस्पती, प्राणी, जीव नामशेष झाले, तर अनेक नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शिकारीच्या हव्यासामुळे प्राण्यांची बेसुमार कत्तल होऊन काही प्राणी व पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

पर्यावरण रक्षण हा जगाच्या चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणाच्या निरनिराळ्या उपायांबरोबर मानवाच्या सांस्कृतिक परंपरांमधील पर्यावरणीय आशयातून होणाऱ्या पर्यावरणप्रेमी संस्कारांच्या महत्त्वाकडेही विचारवंतांचे लक्ष वेधले गेले आहे. या संदर्भातील काही महत्त्वाच्या परंपरा पुढीलप्रमाणे आहेत.

हिंदू परंपरेतील अनेक सण, चालीरीती या पर्यावरणस्नेही आहेत. उदा. सर्पपूजा (नागपंचमी), प्राणीपुजा (बैलपोळा), वृक्षपूजा (वटपौर्णिमा), वर्षप्रतिपदा (कडूनिंबाचे सेवन), होळी, रंगपंचमी, गायत्री मंत्रातील सूर्यभक्ती.

आयुर्वेद उपचारात अनेक वनस्पतींचा उपयोग करतात. यासाठी आवश्यक ती झाडे, रोपे यांची लागवड करतात.

- भावना प्रधान