कोरांटी

दिंनाक: 18 Mar 2019 12:48:38


अबोलीबरोबर कोरांटीची आठवण येतेच. काही काही फुलांच्या जोड्या अतूट असतात. जसं जाई-जुई, झेंडू, शेवंती. कोरांटीला कळसुंदा असेही म्हटले जाते. याचे शास्त्रीय नाव बार्लोरीया मिओनिटीस असे असून त्याचे कूळ अॅकँथेसी हे आहे. सुमारे ०.६-१.५ मीटर उंचीचे हे झुडूपवर्गीय झाड सिंध, श्रीलंका, आफ्रिकेचा उष्ण भाग, आशिया व भारत (कोकण दक्षिण पठार) येथे आढळते. खोड सामन्यात: काटेरी व फांद्या चौकोनी असून याची पाने लांबट गोल असतात. पानांच्या बगलेत एकटी फुले व वरच्या भागात कणीस रुपात त्यांचा फुलोरा असतो. ही नाजूक पिवळी फुले ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत येतात.

ही शक्तिदायक अशी औषधी वनस्पती आहे. याची पाने थोडी चमकदार असतात. सुवासिक अशी गुलाबी, जांभळट, निळी व पांढरी फुले असेही प्रकार यात आढळतात. फुले सौम्य रंगाची आणि नाजूक असतात. ही फुले पापुद्र्यासारख्या पाकळ्यांची असतात व ती काटे व पानांच्या दुबेळग्यातून येतात. त्यांना फुलदाणीत ठेवल्या जात नाही. पण निसर्गाने त्यांना रंगाच्या रूपाने देणगी दिली आहे. कोरांटी निळाईच्या विविध छटा दाखवते. उदा. डोंगर, सागर, आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा अशा रंगछटा ती दाखवते. हिच्या फुलात निळ्याबरोबर पांढरा, अबोली, भगवा रंगही असतो. निळ्या-जांभळ्या कोरांटीच्या कळ्या फार मोहक, टपोर, फुगीर आणि लांबट असतात. पठारावरील कोरांटी वांगी रंगाची असून ती २४-३६ उंचीपर्यंत वाढते. हिची फुले सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात फुलतात.

पावसाळ्यात काटे, रोपे अथवा धुमारे लावून कोरांटीची लागवड करतात. झाडे सावलीतसुद्धा येतात. पण भरपूर ऊन व उजेडात ती चांगली वाढतात. हिला चांगल्या निचऱ्याची, मध्यम प्रतीची, भरपूर खतमिश्रित जमीन लागते. पाणी जरुरीप्रमाणे. याची झाडे पुष्कळ वर्षे टिकतात, खूप वाढतात. म्हणून दरवर्षी उन्हाळ्यात छाटणी करून त्यांना योग्य आकार द्यावा.

कुंपणासाठी व शोभेसाठी ही झाडे बागेत लावतात. याची फुले वेण्या, तुरे-हार इत्यादींसाठी वापरतात. याच्या मुळांचा लेप त्वचेवरील फोड, पुळ्या यावर आणि वाळलेली साल डांग्या खोकल्यावर गुणकारी असते. पाने व फांद्या गोड्या तेलाबरोबर उकळवून ते तेल जखमेवर लावतात. पाने + मीठ यांचे दंतमंजन हिरड्यास लावल्याने त्यांना बळकटी येते. तसेच सर्दी, पित्त, इत्यादींवर पानांचा रस उपयुक्त असतो. मुत्र व अर्धांगवायूवरही त्यांचाचा उपयोग केला जातो.    

 - मीनल पटवर्धन