मध्यंतरी पुण्याच्या बिशप्स स्कूलमध्ये जाण्याचा योग आला. शाळेच्या परिसरात कुंड्यांमध्ये सुंदर रोपं होती. कौतुकाने झाडांना न्याहाळत असताना तिथल्या बाईंनी  सांगितलं, “ही झाडं आमच्या मुलांनी कमावलेली आहेत.”
“कमावलेली?” मी न कळून विचारलं.
“गेल्या वर्षाच्या अखेरीस मुलांनी त्यांच्या वह्या शाळेत गोळा केल्या, त्यातले कोरे कागद वेगळे केले  आणि उरलेल्या वह्या रद्दीवाल्याला विकल्या, त्यातून आलेल्या पैशातून रोपवाटिकेतून फुलझाडांच्या कुंड्या आणल्या. टवटवीत झाडं आणि त्यामुळे प्रसन्न झालेला परिसर आमच्या विद्यार्थ्यांना पुनर्वापराची महती कायम पटवून देत असतो. यामुळे विद्यार्थी घरात - परिसरात काही टाकून न देता पुनर्वापरासाठी कसं पाठवता येईल याचा विचार करत असतात."
खरं बघितलं तर आपल्याला वस्तूंचा पुनर्वापर शिकवण्याची तशी गरज नाही. आपण दर महिन्या दोन महिन्यातून आणि अगदी नियमितपणे रद्दीवाल्याला वर्तमानपत्राची रद्दी विकत असतो. कागदाचा पुनर्वापर करण्याचा हा उत्तम मार्ग आहे, पुढे यातून लगदा करून परत कागद तयार केला जातो. त्यामुळे नवीन कागद तयार करण्यासाठी लागणार्‍या साधनांची बचत होते, अनेक वृक्ष वाचतात. रद्दीप्रमाणेच घरातल्या काचेच्या बाटल्या, प्लास्टिकचे डबे, प्लास्टिकची वेष्टनं, काचेचं सामान अशा लहानसहान गोष्टीदेखील रद्दीवाल्याला देता येतात. बर्‍याच वेळा त्या देऊन किंवा विकून येणारी किंमत अगदी कमी असल्यामुळे (आपण त्यासाठी दिला गेलेला वेळ जास्त वाटत असल्यामुळे) आपण  “जाऊ दे, टाकून देते कचर्‍यात” असं म्हणतो. पुढे हा कचरा आपल्या परिसरात असलेल्या कचराकुंडीत जातो. कचरा वेचणारे लोक त्या ढिगातून पुनर्वापर करण्याजोगा कचरा वेचतात. पण अथक प्रयत्न करूनदेखील त्यांना तो पूर्णपणे वेचता येत नाही. आपला कचरा थेट घंटा-गाडीतून जात असेल, तर कचरा वेचणारे त्यातून वस्तू काढू शकत नाहीत. मग उरलेला कचरा डंपर भरभरून डंपिंग ग्राऊंडवर नेला जातो. तुम्हाला माहीत आहे का की मुंबई महानगरपालिकेला केवळ कचरा वाहून नेण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात? शहराच्या जवळ जागा उपलब्ध नसल्यामुळे इंधन जाळत असंख्य ट्रक लांबपर्यंत जातात. 
हल्लीचा जमाना ‘वापरा आणि फेकून द्या’चा असल्यामुळे कचर्‍याची समस्या वाढते आहे. आणि हा प्रश्‍न फक्त मुंबईचाच नाही तर लहान-मोठ्या सगळ्याच शहरांचा आहे. डंपिंग ग्राऊंडवर ओसंडून वाहणारा कचरा, त्याची दुर्गंधी, त्याला क्वचित लावली जाणारी आग, त्यातून निघणारा विषारी धूर अशा अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत पुण्यातला कचरा उरळीकांचजवळ टाकला जात असे. त्याचा त्रास तिथल्या नागरिकांना झाला आणि त्यांनी तिथे कचरा साठवण्याला मज्जाव केला. मग पुणे शहरातच कचर्‍याचे ढीग साचू लागले, शहरात घाण, दुर्गंधी पसरू लागली. ठाण्यातही तसेच घडले, हरी ओम नगरजवळच्या डंपिंग ग्राऊंडची हीच हकीकत. 
मग यावर उपाय काय? हा कचरा येतो कुठून?
तर आपल्या घरातून, परिसरातून! कधीतरी वेळ काढून आपल्या घरातून बाहेर जाणार्‍या कचराकुंडीत डोकावून बघा. त्यात पुनर्वापराला देता येण्यासारखं किती आहे? कोणकोणत्या वस्तू आहेत ते बघा. तुमच्या लक्षात येईल की, आपल्या कचर्‍यातला जवळजवळ ७० टक्के कचरा पुनर्वापर करण्याजोगा असतो. त्याचा पुनर्वापर नक्की करा आणि आम्हाला कळवा. आपल्या संकेतस्थळावर तुम्ही केलेला पुनर्वापर नक्कीच प्रकाशित करण्यात येईल.
- अंजना देवस्थळे