नादनटी बासरी

दिंनाक: 16 Mar 2019 12:17:12


जगातल्या अत्यंत लोकप्रिय आणि सर्वपरिचित वाद्यांपैकी एक म्हणजे बासरी. बासरी ही वेळूपासून बनलेले एक फुंकून वाजवण्याचे वाद्य. रोज ऐकत असलेल्या असंख्य शब्दांमधून भावनांची किती रुपं धारण करून बासरी आपल्याला सामोरी येत असते! आणि म्हणूनच मोरोपंतांसारख्या पंडित कवीने तिच्यासाठी नादनटी असा अत्यंत समर्पक शब्द वापरला. भारतीय संगीतातील वाद्यांपैकी हे आद्य वाद्य मानले जाते.

दिसायला किती साधं वाद्य! एक बांबूची पोकळ नळी आणि तिला पाडलेली काही भोकं अशी सुटसुटीत रचना. बांबूला संस्कृतमध्ये ‘वंश’ असे म्हणतात. त्यावरूनच वंश, बन्सी, बान्सरी, बासरी, बाशी, बसिया असे असंख्य शब्द निर्माण झाले. खऱ्या अर्थाने निसर्गाने निर्माण केलेले आदिम वाद्य. कळकाच्या बेटात भुंग्यांनी पाडलेल्या भोकावरून वारा वाहू लागला की बांबू शीळ घालू लागतात हे मानवाने पाहिलं आणि त्यापासून प्रेरणा घेऊन अधिक परिष्कृत स्वरुपात या वाद्याची निर्मिती केली. स्थानिक परिस्थितीनुसार वेत, देवनळ, पोकळ वेळी, लाकीद, धातूच्या नळ्या, काच, दगड... फार काय, हाडांचा उपयोग करून बनविलेल्या बासऱ्याही उत्खननामध्ये सापडल्या आहेत, जगाच्या सर्व भागांत सर्व संस्कृतींमध्ये!

बासरीच्या स्वरनिर्मितीचा आधार म्हणजे अशा पोकळ नळ्यांमध्ये अस्तित्वात असलेला हवेचा स्तंभ. या नळीच्या एका टोकाला फुंकर मारण्यासाठी एक भोक असतं. त्या भोकाच्या धारेवर फुंकर मारली की पोकळीतला हवेचा स्तंभ कंप पावू लागतो आणि काही एका कंपन संख्येचा ‘सूर’ निर्माण होतो. या स्तंभाची लांबी जेवढी जास्त, तेवढी कंपनसंख्या वाढायला लागते आणि स्वर चढायला लागतात. बासरीच्या रचनेत या तत्त्वाचा फार सुंदर उपयोग केला आहे. बासरीला साधारणपणे सहा भोकं असतात. त्यावर हाताची बोटं ठेवून ती बंद केली जातात. तळापासून ओठाच्या दिशेने क्रमाक्रमानं एक एक बोट उचलत गेलं की नळीतल्या हवेच्या स्तंभाची लांबी क्रमाक्रमाने कमी होत जाते आणि वरचे स्वर मिळायला लागतात. अर्थात त्यासाठी या भोकांमधली अंतरं निश्चित करावी लागतात. तरच संगीतातले ‘सारेगमपधनी’हे आधार स्वर सुरेल वाजतील. बासरी बनवणारे कारागीर त्यात अनुभवी व कुशल असतात.

गाण्यात जसा भाव असेल तसा बासरीचा स्वरही गंभीर किवा चंचल झालेला दिसतो. भारतात या गोष्टींचा विचार फार आधीपासून झालेला आहे. बाराव्या शतकाच्या सुमारास शारंगदेव नावाचा संगीततज्ञ होऊन गेला. त्याच्या ‘संगीत रत्नाकर’ नावाच्या ग्रंथात विविध पद्धतीच्या लहानमोठ्या बासऱ्यांचा उल्लेख आहे. भरताने त्याच्या ‘नाट्यशास्र’ ग्रंथात ’कुतप’ नावाच्या वाद्यवृन्दाचा उल्लेख केलेला आहे. शास्रीय संगीताच्या क्षेत्रात या वाद्याला मानाचं स्थान देण्याचं श्रेय जातं पं. पन्नालाल घोष यांना. त्यांनी विविध   बासऱ्यांवर प्रयोग करून आलाप, मींड, गमक, ताना, तत्कार असे सांगितिक अलंकार वाजवण्याचं तंत्र विकसित केलं आणि शास्रीय संगीतात या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून दिली.

नादांचे अनेक पोत (टेक्श्चर्स) निर्माण करण्यासाठी आधुनिक ध्वनीमुद्रण आणि ध्वनीप्रक्षेपण तंत्राचा वापर केला आहे. लोकसंगीतापासून जागतिक संगीतापर्यंतच्या सर्व क्षेत्रात बासरी आज अधिकाराने संचार करीत आहे. सीडी, इंटरनेट अशा माध्यमातून या वाद्याशी परिचय करून घेणं अतिशय सुलभ झालेलं आहे. ज्यांना इच्छा असेल त्यांनी हे वाद्य अवश्य वाजवून पहावे. एक तर हे वाद्य अतिशय सुटसुटीत आहे. त्याची किमंतही सर्वसामान्यांच्या आवाक्यातली आहे. (व्यावसायिक कलाकार वाजवतात त्या बासऱ्यांची किंमत इथे विचारात घेतलेली नाही.) बासरी शिकण्यासाठी उपयुक्त अशी पुस्तकंही बाजारात उपलब्ध आहेत.

- पुष्कर मुंडले

९९६९४६३६१०