‘आजकालचे विद्यार्थी फार उर्मट झालेत, ते शिक्षकांचे ऐकत नाहीत. दुरुत्तरं करतात. शिक्षकांना पूर्वीसारखा मान देत नाहीत...’, अशी वक्तव्ये हल्ली सररास ऐकायला मिळतात आणि याला करणीभूत ठरणाऱ्या घटनाही आजूबाजूच्या शाळांमधून नेहमीच पाहायला मिळत आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांबद्दलचा आदर, भीती व दडपण आता अभावानेच पाहायला मिळते. त्याऐवजी हल्ली कधी मित्रत्व, तर बरेचदा बेफिकीरी, अरेरावी दिसू लागली आहे आणि याला विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांचे संस्कार, समाजातील प्रवाह, पैशाने आलेला उद्दामपणा, भ्रष्ट मार्गाने काहीही मिळवता येऊ शकते, हा समज दृढ करणारे दैनंदिन दाखले; अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्याचबरोबर शिक्षकांमध्येही विषयाचे सखोल ज्ञान, आत्मविश्‍वास, कामावरील निष्ठा, सुजाण पिढी घडवण्याबाबत जबाबदारीची जाणीव, राजसत्तेला न जुमानण्याची बाणेदार वृत्ती, स्वच्छ चारित्र्य आणि व्यासंग या गुणांचा अभाव दिसतो. अशा दोन्ही घटकांचे गांभीर्य व समतोल बिघडल्यामुळे आज सर्वत्र गढूळ व अकार्यक्षम पिढ्या समाजामध्ये मिसळत आहेत व एकंदरीतच समाजजीवनाचा पाया ठिसूळ करत आहेत, असे वाटते.
खरे तर विद्यार्थीजीवन ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची व फुलपाखरी अवस्था असते.
‘क्षणश: कणशश्‍चैव विद्यामर्थं च साधयेत्।
क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम्॥’
या उक्तीप्रमाणे उधळपट्टी करत राहून धन मिळवता येत नाही, तसेच वेळ वाया घालवून विद्या मिळवता येत नाही; असे पूर्वी अगदी ठासून सांगितले जाई आणि विद्यार्थीही त्याबरहुकूम आचरण करत.
आदर्श विद्यार्थी कसा असावा? तर, 
‘ज्ञानतृष्णा गुरौनिष्ठा सदाध्ययनदक्षता
एकाग्रता महत्त्वच्छा पंच विद्यार्थिनां गुणा:॥’
ज्ञानाची इच्छा, गुरूबद्दल निष्ठा, सतत अध्ययनाबद्दल दक्षता, एकाग्रता व महत्त्वाकांक्षा हे पंचगुण असणारा तोच खरा विद्यार्थी!!
याबद्दल कोणालाही शंका नसे आणि त्यामुळेच पालक आपल्या विद्यार्थ्यांना पूर्ण विश्‍वासाने गुरूकडे सोपवून आपल्या पाल्याच्या भावी आयुष्याबद्दल निश्‍चिंत होत. विद्यार्थीही जीव तोडून अभ्यास करत. त्याचबरोबर स्वावलंबन व सामाजिक वागण्या-बोलण्याचे नियम, हे सर्व मनोभावे शिकून गृहस्थाश्रमाची वाट धरत. 
आता मात्र सार्वत्रिकरणाच्या दडपणाखाली शिक्षणाचा मूळ उद्देशच हरवलेला दिसतो आहे आणि कागदी सर्टिफिकेट्सना महत्त्व आल्यामुळे कसेही करून, येनकेन प्रकारे केवळ ते मिळवण्यासाठी साम-दाम-दंड-भेद या मार्गांचा वापर राजरोसपणे होऊ लागलेला दिसतो आहे. मग यातून मार्ग कसा काढायचा?
तर, शिक्षकांनी स्वत:मधील कमतरता दूर करून, व्यासंग वाढवून, जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. कारण कोणत्याही देशाची उंची ही त्या देशातील शिक्षकांच्या बौद्धिक उंचीवर अवलंबून असते! त्यामुळे विद्यार्थी हे उद्याच्या समाजाचे आधारस्तंभ आहेत, याचे भान ठेवून त्यांना योग्य दिशा दाखवण्याचे व्रत अंगीकारून शिक्षकांनी प्रवास सुरू ठेवला, तर विद्यार्थीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देतील, यात शंकाच नाही!
तेव्हा उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थी व शिक्षक दोघांनीही सज्ज होऊ या!!!
- स्वाती गराडे 
सहअध्यापिका
म.ए.सो. रेणावीकर विद्यामंदिर