वाचाल तर वाचाल

दिंनाक: 14 Mar 2019 12:00:14

परीक्षेत उत्तम यश मिळवायचे असेल, तर वाचनाच्या निरनिराळ्या पद्धती आवश्यकतेनुसार वापरणे जरुरीचे आहे. पाठ्यपुस्तकांवरून आणि वर्गातील व्याख्यानांवरून चांगल्या प्रकारे टिपणे घेता आली पाहिजेत; या दोन्ही कौशल्यांचा विचार महत्त्वाचा ठरतो. 
वाचनाचे महत्त्व : अभ्यासाच्या एकूण वेळेच्रा ७५% वेळ वाचताना खर्च होतो, असे लक्षात येते. म्हणजेच अभ्यासाचे प्रमुख साधन वाचन हे होय. अभ्यासात यशस्वी व्हायचे असेल; तर तुमचे वाचन उत्कृष्ट आणि अद्यावत असले पाहिजे. व्यवसायातील आणि पर्यायाने जीवनातील यशासाठी वाचनाची तंत्रे अवगत असणे फायद्याचे ठरते.
चांगले वाचन म्हणजे काय? वाचलेल्या मजकुराचा अर्थ समजला म्हणजे चांगले वाचता आले असे नाही, तर वाचनाच्या हेतुनुसार शक्य तितक्या वेगाने वाचणे आणि वाचलेला भाग उत्तम प्रकारे समजणे; म्हणजे चांगले वाचन होय.
वाचनाचे नियोजन : १) पूर्वतयारी, २) प्रत्यक्ष वाचन, ३) केलेल्या वाचनाचा उपयोग, अशा तीन भागांत वाचनाचे योग्य नियोजन करता येते.
वाचनाची पूर्वतयारी : पुस्तके, वही, पेन, पेन्सिल इ. सर्व जवळ असल्याची खात्री आधीच करून घेतल्यास वाचनात व्यत्यय येत नाही. शिवाय एकाग्रताही वाढते. वाचनासाठी शक्यतो निवांत, शांत अशी जागा निवडून, नेहमी त्याच जागी बसून वाचन करणे चांगले. मन जास्तीत जास्त प्रसन्न असेल व अभ्यासाच्या जागी जास्तीत जास्त शांतता असेल, अशा वेळेची निवड वाचनासाठी उपयुक्त ठरते.
काय वाचायचे आहे आणि कोणत्या हेतूने वाचायचे आहे हे ठरवल्यास, त्याप्रमाणे योजना करता येते. उदा. परीक्षेच्या तयारीसाठी करायचे वाचन व मनोरंजनासाठी करायचे वाचन, अशा दोन भागांत वाचनाची विभागणी करता येईल.
परीक्षेच्या दृष्टीने वाचन करायचे झाल्यास : १) वाचनाचा पाठ सोपा आहे की किचकट आहे, २) पाठ सविस्तर वाचणे आवश्यक आहे का, ३) त्यासाठी किती वेळ द्यावा लागणार आहे, अशा पद्धतीने विचार करून ठेवल्यास उपलब्ध वेळेनुसार वाचनाचे वेळापत्रक करणे सोयीचे होते.
किचकट व खूप वेळ लागणारे वाचन तसा वेळ असताना करणे, अभ्यासाच्या जागी शांतता असताना पाठांतर करणे, जो भाग लक्षात ठेवायचा आहे; तो रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा वाचणे, अशा प्रकारे नियोजन केल्यास वेळेची बचत होऊ शकते.
स्वत:च्या वाचनाचे परीक्षण : स्वत:च्या वाचनाचे परीक्षण केल्यास त्यातील गुणदोष लक्षात येतात. त्यासाठी पाठ्यपुस्तकातील काही भाग वाचून पुस्तक मिटून ठेवून पुढील प्रमाणे विचार करा- 
1) माझे वाचन भरभर होते की हळूहळू होते?
2) वाचताना ओठांची हालचाल होत होती का?
3) वाचले त्यातले किती समजले?
4) वाचन निष्क्रियपणे चालू होते का?
5) वाचलेल्या मजकुराने मनात प्रश्‍न निर्माण होत होते का?
6) डोळे पुस्तकात, पण मन मात्र इतरत्र भटकत होते, असे झाले का?
असे परीक्षण अनेकदा करा. त्यातूनच तुमच्या वाचनातील उणिवा लक्षात येतील. वाचन चालू असताना मित्र-मैत्रिणी किंवा घरातल्यांना तुमचे निरीक्षण करायला सांगा; म्हणजे पुटपुटणे, वाचताना डोळे हलवणे, यांसारख्रा सवयी लक्षात येतील. आत्मविश्‍वासाचा अभाव, वाचलेले न समजणे, वाचताना दुसरीकडे लक्ष जाणे; यांतील कोणती कारणे या सवयींना लागू पडतात, हे लक्षात घेऊन त्या सवयी दूर करता येतील.
पाठ्यपुस्तक कसे वाचाल : पुस्तक वाचायला सुरुवात करण्यापूर्वी त्याची पाहाणी करणे गरजेचे आहे. उदा. क्रिकेटचा सामना सुरू होण्यापूर्वी संघनायक मैदानाची पाहाणी करतो, त्याचप्रमाणे नवख्या प्रदेशात प्रवास करायचा झाल्यास प्रत्यक्ष प्रवासापूर्वी नकाशाचे वाचन महत्त्वाचे ठरते. 
प्रस्तावना : पुस्तक वाचायला सुरुवात करण्यापूर्वी प्रस्तावना वाचल्यास लेखकाची पुस्तक लेखनामागची भूमिका लक्षात येते. पुस्तक वाचनासाठी लागणारी पूर्वतयारी, वेळ याची कल्पना येते.
अनुक्रमणिका : अनुक्रमणिकेचे वाचन सावकाश व काळजीपूर्वक केले पाहिजे. पुस्तकात नेमके काय दिलेेले आहे, हे अनुक्रमणिकेवरून समजते.
अनुक्रमणिकेच्या वाचनानंतर धड्यांखाली त्यांचा सारांश दिला असल्यास तो वाचावा किंवा लेखकांचा परिचय दिला असल्यास तो वाचावा. पुस्तकाच्या प्रत्येक पानावरील शीर्षक व त्याखालील एखाद-दुसरे वाक्य वाचावे. पुस्तकाची पाहाणी करताना मनात जे प्रश्‍न येतील, त्यांची नोंद करून ठेवल्यास पाठांचे वाचन करताना ती नोंद उपयोगी पडते.
लक्षपूर्वक वाचन : पाठाचे वाचन करताना ते लक्षपूर्वक करणे महत्त्वाचे आहे. पुस्तकाची पाहाणी करताना मनात आलेल्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केल्यास लक्षपूर्वक वाचन करणे सोयीचे होईल. वाचत असताना महत्त्वाचा भाग पेन्सिलने अधोरेखित करत जावा; म्हणजे वाचनातील सहभाग वाढून ते निष्क्रिय होत जाणार नाही. वाचताना काही शंका आल्यास निरसन करून घेणे योग्य असते.
महत्त्वाच्या मजकुराकडे लक्ष पुरवा : ठळक अक्षरांत छापलेला, अधोरेखित केलेला मजकूर, महत्त्वाच्या संज्ञा, व्याख्या; यांकडे जास्त लक्ष देणे महत्त्वाचे आहे. ते समजून घेऊन नंतर पाठ करा.
सर्व काही वाचा : पाठामध्ये दिलेले तक्ते, आलेख, चित्रे यांसह सर्व मजकुराचे वाचन करावे. त्यांची योजना फक्त पुस्तक आकर्षक करण्यासाठी केलेली नसून, त्यांतून कल्पना चांगल्या प्रकारे स्पष्ट होतात आणि त्या लक्षात ठेवण्यास सोप्या वाटतात. पानभर मजकुरातूनही न समजणारी एखादी संकल्पना एखाद्या आलेखावर दृष्टीक्षेप टाकताच समजते.
वाचनवेग व आकलन : ही दोन्ही आपल्या वाचन क्षमतेची अविभाज्य अंगे आहेत. एखाद्या व्यक्तीने एका मिनिटात आकलनासहित वाचलेल्या शब्दांची संख्या म्हणजे तिचा वाचनवेग होय. वाचनवेग हा वाचनाचे साहित्य, वाचनाचा हेतू व वाचक यांवर अवलंबून असतो. जलद वाचू शकणाऱ्या व्यक्तीचे आकलन सावकाश वाचणाऱ्या व्यक्तीपेक्षा चांगले असते, असा याबाबतच्या संशोधनाचा निष्कर्ष आहे.
वाचन सुधारायचे कसे : डोके हलवणे, ओठ हलवणे, पुटपुटणे, वाचलेलेच पुन्हा पुन्हा वाचणे, मजकुरावर बोट फिरवत वाचणे; अशा सवयींमुळे वाचनाला अधिक वेळ लागतो. त्यासाठी निश्‍चयपूर्वक प्रयत्नांची गरज असते. त्यासाठी खालील उपाय करता येतील.
१) वाचताना डोके प्रयत्नपूर्वक स्थिर ठेवा. 
२) ओठांवर बोट ठेवल्यास ओठ हलवायचे नाहीत, हे लक्षात राहील.
३) पुटपुटण्याची सवय जाण्यासाठी मनात १, २, ३ असे अंक म्हणा; म्हणजे हळूहळू सवय जाईल.
४) पुन्हा पुन्हा तेच तेच वाचत असल्यास, वाचून झालेल्या मजकुरावर झाकण किंवा पट्टी ठेवत वाचल्याने, मजकुरावर बोट ठेवून वाचण्याची सवयही कमी होत जाईल.
वाचनवेग वाढवण्यासाठी वेळ लावून वाचन करण्याची सवय लावून घ्या. बेधडक वाचत जा. "वाचलेले लक्षात राहील का?" याची काळजी वाचताना करू नका.
जलद वाचनाचा सराव : वाचनवेग वाढवण्यासाठी नियमित सराव आवश्यक आहे. त्यासाठी दिवसाकाठी फक्त १५ मिनिटे पुरेशी आहेत.
प्रथम काहीतरी सोपे वाचनास घेणे योग्य होईल. उदा. दैनिकातील एखादा लेख वाचायला घेताना व वाचून झाल्यावर वेळेची नोंद करा. लेखातील शब्दसंख्या मोजा. यावरून एका मिनिटात किती तुमच्या लक्षात राहिले, ते पाहा. साधारणत: ५०% लक्षात राहिले पाहिजे. फारच थोडे लक्षात राहिले असल्यास वाचनवेग थोडा कमी करा.
या पद्धतीने सराव केल्यास तुमचा वाचनवेग आणि आकलन दोन्हींत भरीव प्रगती झाल्याचे तुमच्या लक्षात येईल.
- प्राजक्ता गुळूमकर
  ग्रंथपाल
    म.ए.सो. मुलांचे विद्यालय