रांगोळी ही चौसष्ट कलांपैकी एक कला आहे. रांगोळीचे नाते प्राचीन भारतीय संस्कृतीशी आहे. रांगोळीचे अस्तित्व प्रागैतिहासिक काळापासून असल्याचे दाखवता येते आणि संस्कृतीच्या विकासाचे प्रतिबिंबही रांगोळीत पडल्याचे प्रत्ययास येते. ज्याप्रमाणे रांगोळी प्राचीन भारतीय परंपरेचा वारसा सांगते, त्याचप्रमाणे ती प्राचीन भारतीय तत्त्व, चिंतन आणि लोकधारणा यांचाही वारसा सांगते. रांगोळीद्वारे मूर्त रूपे निर्माण केली जातात आणि अमूर्त अशा संकल्पनांचा बोधही रांगोळीतून होतो. या कलेचा उगम धर्माच्या अनुबंधातच झाला आहे.
प्राचीन भारतीय लोककला असलेल्या या रांगोळीचा उगम कसा झाला असेल, हे सांगणाऱ्या काही कथाही आहेत. असे म्हटले जाते की, लक्ष्मी आणि विष्णू यांचे लग्न झाले; तेव्हा रांगोळी काढली गेली आणि त्याच वेळी रांगोळीचा उगम झाला. दुसरी कथा अशी की, खूप तपश्‍चर्या करणारे नारायण नावाचे ऋषी होते. त्यांची तपश्‍चर्या भंग करण्यासाठी इंद्राने स्वर्गातून अप्सरा पाठवल्या. त्या अप्सरांना पाहून नारायण ऋषींनी एका ओलसर जागेत स्त्रीचे रेखाटन केले आणि आपल्या तपश्‍चर्येच्या जोरावर त्या रेखाटन केलेल्या स्त्रीला जीवंत केले. त्या स्त्रीचा जन्म धरतीतून झाला; म्हणून तिचे नाव उर्वशी ठेवण्यात आले. तिचे सौंदर्य पाहून इतर अप्सरा शरमल्या आणि अदृश्य झाल्या. पुढे ऋषींनी आपली तपश्‍चर्या सुरू ठेवली. याप्रकारे रांगोळीचा उगम झाला, असे मानले जाते.
रांगोळी विविध प्रकारे तयार करतात. भाताची फोलपटे जाळून त्याची पांढरी राख रांगोळी म्हणून वापरतात. शंख, जिरे यांची भाजून केलेली पांढरी पूड, तांदळाची पिठी, शिरगोळ्याची वा संगमरवराची चुणी, चुण्याची भुकटी इत्यादींचा वापर रांगोळी म्हणून केला जातो. महाराष्ट्रात रांगोळी, तामिळनाडूमध्रे कोेलम, बंगालमध्ये अलिपना, केरळमध्ये पुविडल, आंध्र प्रदेशमध्ये मग्गू, उत्तर भारतात रंगोली, गुजरातमध्ये साथिया, मध्य प्रदेशमध्ये चौकपुरना आणि राजस्थानामध्रे मांडणा; अशा प्रकारे विविध प्रातांत रांगोळीला वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. देवघर, भोजनाची पंगत, दारावरील उंबरा, अंगण, शुभकार्यस्थळ, सण, श्री सत्यानारायणाची पूजा ते जत्रा-महोत्सवांपर्यंत सर्वच ठिकाणी रांगोळीला महत्त्व आहे. रांगोळीमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हांचा  आपल्या जीवनाशी संबंध आहे. म्हणूनच रांगोळीतील स्वस्तिक, सूर्य, चंद्र, लक्ष्मीची पाऊले, गोपद्म, महिरप, शंख, चक्र, गदा, कमळ, गोल, अर्धगोल, वक्ररेषा, बिंदू इत्यादी शुभचिन्हांना, त्यांच्या अस्तित्वाला काही अर्थ प्राप्त होतो.
रांगोळीतील शुभचिन्हे व त्यांचा अर्थ -
ॐ - ओमकार हे ईश्‍वराचे प्रतीक, ओमकाराचे दर्शन ध्यान धारणेत होते.
॥श्री ॥ -  ब्रह्माचे अक्षररूप प्रकटीकरण म्हणजे ‘श्री’ होय.
 गतिमानतेचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक होय. त्याच्या चार बाजू धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांच्या निदर्शक आहेत.
शंखनाद करणार्‍या व्यक्तीच्या शरीरातील इंद्रिये कार्यक्षम होतात. युद्ध प्रारंभ व युद्ध समाप्ती शंखनादाने केली जाई.
कमळ हे मातृत्वाचे प्रतीक. सौैंदर्य, शीतलता, त्याग, शांतता, सामर्थ्य, सहनशीलता.  कमळ हे मांगल्यरूप आहे.
(वर्तमान, भूत, भविष्य) काळाचे प्रतीक म्हणजेच कालचक्र.
बिंदू म्हणजे बिजाचे प्रतीक.
सरळ रेषा ही संशोधक वृत्ती, शुद्ध स्वभाव दर्शवते.
गोपद्म म्हणजेच गायीची पाऊले. गायीच्या पोटात छत्तीस कोटी देव निवास करतात, असे मानले जाते.
केंद्रवर्धिनी हे चिन्ह आत्मनिर्भरतेचे प्रतीक समजले जाते. अंगभूत गुणांचा योग्य उपयोग करून स्वत:चा विकास साधणे म्हणजेच आत्मनिर्भरता.
सर्पपट्टा म्हणजे वहनाचे प्रतीक, इच्छांचे प्रतीक.
वर्तुळ हे पूर्णत्वाचे प्रतीक होय. उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याची शक्ती.
अर्धवर्तुळ म्हणजे ज्ञान, विज्ञान, धर्म, संस्कृती धारण करणारी शक्ती होय.
एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे होत जाणारे मूल्रांचे संक्रमण, त्यांची जोपासना आणि त्याचबरोबर दोन पिढ्यांमध्रे साधला जाणारा समन्वय शृंखला या चिन्हातून प्रतीत होतो.
अशा या रांगोळीच्या प्रकटीकरणाला काळानुरूप वेगवेगळे धुमारे फुटले आणि तिच्या रूपाला विविध आयाम प्राप्त झाले.  पूर्वी रांगोळी फक्त बायकांनीच काढायची असते किंवा ते त्यांचे काम आहे, असा समज होता. शुभशकून म्हणून दारापुढे काढण्यात येणार्‍या रांगोळ्यांमधील वेगवेगळ्या चिन्हांतून खर्‍या अर्थाने सुशोभिकरणाचा हेतू साध्य होत असे. आजकाल शिबिरे, रांगोळी वर्ग, छोटी-मोठी प्रदर्शने यांच्यामुळे स्त्रियांबरोबरच पुरुष कलाकार देखील रांगोळीकडे वळलेले दिसतात. अशा या प्रवाहात अभिव्यक्तीमध्रे कलात्मकता आली आणि बिंदू बिंदू जोडून रांगोळ्या काढल्या जाऊ लागल्या.
ठिपक्यांच्या रांगोळ्यांना व्यावसायिक स्वरूप येत नाही. त्यांचे तंत्र आईकडून मुलीकडे, म्हणजे एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे आपोआप संक्रमित होते. तर फ्री-हँड रांगोळ्यांचे कौशल्य मात्र सर्वांनाच जमेल असे नाही. ते मेहनतीने आत्मसात करावे लागते. व्यक्तीचा चित्रकलेकडेही कल असावा लागतो. त्यामुळे यांची परंपरा टिकवून ठेवायची असेल, तर विशेष प्रयत्न करावे लागतील. फ्रीहँड रांगोळ्या व्यापक प्रमाणात काढल्या जाऊ शकतात व त्या अधिक आर्कषक दिसतात. तसेच पोट्रेट रांगोळीसाठी चित्रकलेचे किमान जुजबी ज्ञान आवश्यक असते. वेगवेगळ्या रंगछटा कशा दिसतील, त्या कशा तयार करायच्या याचा अंदाज येऊ शकतो. 
आजकालचे तरुणही या कलेकडे मोठ्या अस्थेने पाहताना दिसतात. रांगोळीची वाहवा प्रत्येक जण करतो. रांगोळी केवळ दिवाळीपुरती न राहता ती वर्षभर काढली जावी. ठिकठिकाणी प्रदर्शने व्हावीत, शासन ज्या वेगवेगळ्या स्पर्धा घेते, त्यात  रांगोळी स्पर्धेचाही समावेश व्हावा. रांगोळी कलाकारांना व्यावसायिकदृष्ट्या साहाय्य मिळावेे, पैसा मिळावा. जेणेकरून तरुण वर्ग या कलेकडे आकर्षित हाईल. आपली संस्कृती अबाधित राहील व तिला अधिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. भारत हा परंपरांनी नटलेला देश आहे. त्यात अनेक कलाप्रकार गुण्यागोविंदाने नांदत आहेत. त्यातल्या प्रत्येक कलेचा भारताबाहेर बराच प्रसार झालेला आहे. हल्ली रांगोळीचासुद्धा प्रसार होत आहे.
रांगोळी या कलाप्रकाराला जनसामान्यांपासून जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे काम काही संस्था, व्यक्तींनी केलेेले आहे. त्यांपैकी ‘संस्कार भारती’, ‘रंग परिवार’, ‘सप्तरंग’, ‘रंगावली ग्रुप’, ‘रंग साधना’ अशा अनेक संस्थातून कलाकार घडले; शिवाय काही व्यक्तींनी स्वतंत्रपणे या कलेची साधना सुरू ठेवली. ठिपक्यांची रांगोळी, फ्री-हँड रांगोळी (गालीचा), पोट्रेट, मिठाची रांगोळी, फुलांची, पाण्यावरील रांगोळी, पाण्याखालील रांगोळी, दिव्यांची रांगोळी अशा अनेक स्वरूपांत रांगोळी काढली जाते.
रांगोळी क्षणभंगूर असते, ती चिरकाल टिकावी यासाठी काही उपाययोजना करता येतील का, यावर संशोधन करण्याची गरज आहे.
रांगोळीला शालेय स्तरावर जास्तीत जास्त महत्त्व देण्यात यावे; त्यातून नवनिर्मिती घडावी. रांगोळी स्वत:लाही आणि इतरांनाही आनंद देणारी कला आहे. प्रत्येक शाळेच्या कलाशिक्षकाने तरी या रांगोळीविषयी जाणून घेऊन, तिच्या प्रसाराला प्रोत्साहन द्यावे.
रांगोळी निर्माण करणाऱ्यांपासून ते ही कला सातासमुद्रापलीकडे नेऊन तिथे तिचे अस्तित्व निर्माण करणाऱ्यांपर्यंत सर्वांना माझा मानाचा मुजरा!
- श्रीहरी पवळे
कलाशिक्षक नूतन विद्यालय, कर्णिक रोड, कल्याण