पक्षीजगत

दिंनाक: 12 Mar 2019 12:09:21
 


कौलारू घराच्या वळचणीवर चिमण्यांनी बांधलेले घरटे कदाचित आपण सगळ्यांनी पहिले असेल. वृक्षांऐवजी कौलारू घरात घरटे बांधण्याचा  सोईस्कर पर्याय निवडून चिमणी मोकळी होते, पण इतर लहान मोठ्या आकाराच्या पक्ष्यांना असे करणे सहज शक्य नसते. त्यामुळे अशा पक्ष्यांसाठी झाडाचे मजबूत खोड किंवा फांदी हा उत्तम पर्याय असतो. एखाद्या डोंगरातली छोटीशी गुहा त्यांच्या पिल्लांचे ऊनवार्‍यापासून सहजपणे संरक्षण करू शकते. पक्ष्यांना अंडी घालण्यासाठॅ आणि पिल्लं मोठी होईपर्यंत घरट्याची गरज असली तरीही  ते घरटे पिल्लांचा भार पेलू शकेल इतके मजबूत असावेच लागते. 
पण आजकाल शहरीकरणाला वेग आल्याने सरसकट वृक्षतोड केली जाते. त्यामुळे जागोजागी फक्त इमारतींचे बांधकाम नजरेस येत आहे. आणि जे वृक्ष अजूनही शाबूत आहेत, अशा वृक्षांची अत्यंत शोचनीय अवस्था आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे योग्य आश्रयाच्या शोधार्थ पक्षी स्वत:चे मुक्काम दुसरीकडे हलवत असतात आणि याचमुळे काही पक्षी आपल्यालाही दिसेनासे होत आहेत. याचे ठळक उदाहरण म्हणजे चिमणी. 
पक्ष्यांना पिल्लांसाठी उबदार घरटे हवे असतेच, पण त्याबरोबर पिल्लांसाठी चारा-पाण्याची सोय करावी लागते. त्यामुळे नदी, तलाव अशाच ठिकाणी पक्षी आपले घरटे बांधतात. पण असे तलाव उन्हाळ्यात सुकून जातात. पक्ष्यांना पाणी मिळणे कठीण होते. म्हणूनच अशा पक्ष्यांसाठी घराजवळ, बिल्डिंगच्या भिंतीवर 'बर्ड शेल्टर' बांधणे हा चांगला पर्याय आहे. हा पर्याय पक्ष्यांनाही खूपच आवडतो. त्यामुळे पक्षी अशा बर्ड शेल्टरमध्ये अगदी छानपैकी घरटी थाटतात.
बर्ड शेल्टर लाकडाची असणे पक्ष्यांसाठी जास्त सोयीस्कर ठरते. कारण पिल्लांसाठी योग्य ती उब या लाकडाच्या घरट्यात मिळू शकते. अशी तयार घरटी बाजारात सहज उपलब्ध आहेत. ही घरटी योग्य त्या मापाचीही असतात आणि अशा घरट्यांना असणारे छिद्रसुद्धा योग्य आकाराचे असते. 
पक्ष्यांना मांजरे किंवा इतर प्राण्यांपासून त्यांच्या पिल्लांचे संरक्षण करावे लागते. त्यामुळे पक्ष्यांना घरट्यातून आत-बाहेर करण्याचे छिद्र जर गरजेपेक्षा मोठे असेल, तर पक्षी अशी घरटी नापसंत करतात.
त्यामुळे पक्ष्याच्या घरट्याच्या छिद्राचा आकार त्या त्या पक्ष्याच्या एकंदर आकारानुसार कमी जास्त असतो. प्लास्टिकच्या मोठ्या आकाराच्या डब्यांचा वापरही पक्ष्यांची घरटी बांधण्यासाठी कल्पकतेने केला जाऊ शकतो. अशी घरटी बांधताना डब्याला तळाशी अगदी लहानसे छिद्र पाडावे, म्हणजे पक्ष्यांच्या घरट्यातले पाणी वगैरे निघून जाण्यासाठी मदत होईल. घरट्यात गवत टाकल्यास पक्षी अशा घरट्याकडे आकर्षित होऊ शकतील. घरट्याच्या कडा धारदार नसाव्यात. शक्यतो  कोणतीही अशी गोष्ट घरट्यासाठी वापरू नये, जी पक्ष्यांना जखमी करेल. घरट्याला आतून रंग लावणेही टाळावे. 
पक्ष्यांच्या घरट्याबरोबरच त्यांच्या दाणापाण्याचीही सोय आवर्जून करावी. यासाठी घरातल्या प्लास्टिकच्या बाटल्या उपयोगी पडतात. प्लास्टिकच्या बाटल्यांना तळाच्या जरा वरती धान्य बाहेर पडेल इतके किंवा त्यापेक्षा जरा मोठे छिद्र पाडावे. त्यामध्ये एक प्लास्टिकचा चमचा आडवा खोचून ठेवावा. म्हणजे बाटलीतले धान्य त्या चमच्यावर थोडेथोडे पसरत राहील आणि पक्ष्यांनाही ते धान्य बसून खाता येऊ शकेल. पक्ष्यांची इतकी सोय केली तरी त्यांना पुरेसे असते. कारण काम इतर कामे पक्षी स्वत:च करून टाकतात. अशा प्रकारे आपण पक्ष्यांसाठी सुंदर असे घरकूल तयार करू शकता. तुम्हीही हे करून पाहा...
-सिद्धी घरत