‘ती तिची’

दिंनाक: 11 Mar 2019 10:54:10


 

शिक्षणविवेक मासिकामध्ये लेखन करण्याच्या निमित्ताने अनेक विद्यार्थी शिक्षणविवेक परिवाराशी जोडले गेले आहेत. या विद्यार्थ्यांशी गप्पा मारण्याच्या उद्देशाने शिक्षणविवेकने विद्यार्थ्यांच्या ‘मुलाखती’चा उपक्रम सुरू केला. यातील पहिली मुलाखत होती, अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स शाळेतील श्रुती कोकीळ हिची. ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ‘ती तिची’ या कार्यक्रमात श्रुती कोकीळ हिने उत्स्फूर्त मुलाखत दिली. श्रुतीचा हा पहिलाच अनुभव होता. श्रुतीचा परिचय ऐकताना बहुविध व्यक्तिमत्व असलेली श्रुती शालेय उपक्रमासोबत छंद, कलागुण आवडीने जोपासत आहे, हे लक्षात आले. मुलाखत सुरू झाल्यानंतर अत्यंत आत्मविश्वासाने श्रुती उत्तरे देत होती. आवडता खेळाडू, आवडता पदार्थ अशा अनेक आवडीच्या गोष्टी श्रुतीने या वेळी सांगितल्या. आवडीच्या खेळाविषयी तिने सांगितले की, क्रिकेट या खेळासोबत तिला रिंगटेनिस, अॅथलेटिक्स असेही खेळ आवडतात. महेंद्रसिंग धोनी हा आवडता खेळाडू सांगताना तिच्या चेहेऱ्यावर आनंद दिसत होता. शाळेतील खेळाच्या शिक्षिका दीपा अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनामुळे खेळाची आवड वाढत गेली, हे श्रुतीने आवर्जून सांगितले. इयत्ता ९वीमध्ये शिकणाऱ्या श्रुतीने खगोलशास्त्र हा अभ्यासाचा आणि करिअरचा विषय निवडल्याचे सांगताना तिचा आत्मविश्वास लक्षात येत होता. शालेय पाठ्यपुस्तकांबरोबर पु.ल. देशपांडे यांची पुस्तके आवडतात आणि त्यांच्याच ‘पेस्टनजी’ या व्यक्तिरेखेसाठी बक्षीस मिळाले, हे सांगताना तिचे अवांतर वाचन सर्वांनाच समजले. गप्पा गप्पांमधून तिच्या खोडकर स्वभावाविषयीचे किस्से तिने प्रामाणिकपणे सांगितले. खेळाच्या वेळी मोठी जखम झाल्याने कोलमडलेली मानसिकता, त्यावर आईच्या मदतीने केलेली मात, शाळेतील भातलावणी, बँडपथकात वादन करतानाचा अनुभव असे अनेक प्रसंग या वेळी तिने सांगितले. चित्रकलेविषयी बोलताना श्रुती म्हणाली, ‘इयत्ता सहावीपर्यंत मला नीट चित्रे काढताच येत नव्हती. मला माझ्याच चित्रांवर हसू येत असे आणि वाईटही वाटत असे. इतरांची चित्रे पाहताना त्यांना जमते ते मला का जमत नाही, अशी जिद्द बाळगून मी चित्रांचा सराव केला आणि इंटरमिजीएट परीक्षेत उत्तम श्रेणी मिळवली.’ शाळेतील अभ्यास सांभाळून इतर सर्व उपक्रमात सहभाग घेत असताना श्रुतीला तिच्या आईचे, बाबांचे आणि शाळेचे नेहमीच प्रोत्साहन असते आणि त्यामुळेच प्रत्येक गोष्ट श्रुती आवडीने करते. श्रुतीशी गप्पा मारून झाल्यानंतर श्रुतीच्या आई आणि बाबांनाही बोलण्याची संधी दिली. श्रुतीविषयी बोलताना आईच्या डोळ्यातील अभिमान आणि बाबांचे आनंदाश्रू यामुळे प्रत्येकाला या संपूर्ण कुटुंबाबद्दल आदर वाटू लागला. श्रुतीच्या मुलाखतीतून वेळेचे नियोजन, जिद्द आणि प्रत्येक गोष्ट समजून करण्याची तिची वृत्ती सर्वांनाच प्रेरणा देणारी होती. मुलाखतीच्या या कार्यक्रमानंतर शिक्षणविवेक परिवारातील सर्वांनी आपल्या आवडीची सादरीकरणे केली. कथा, कविता वाचन, पपेट शो, गीत, नक्कल अशा कार्यक्रमातून आनंद घेत जागतिक महिलादिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमात शिक्षणविवेक कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्याचा परिचय रुपाली निरगुडे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन अदिती दाते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित वाळिंबे आणि हर्षद तुळपुळे यांनी केले.