जाणीव पालकत्वाची

दिंनाक: 11 Mar 2019 12:57:45


 

पालकहो ऐका जरा…

माय-बाप व्हायचे स्वप्न खूप जणांना असते. त्यातच आपले जीवन सार्थकी लागले असे सर्वसामान्य सामाजिक व सांस्कृतिक मत आहे. पण मुलांचे जतन ही जितकी वाटते तितकी सहज, साधी गोष्ट नाही. त्यात जबाबदारी आहे. मुलांचे संगोपन हे खूप काळजीपूर्वक व विचारपूर्वक करावे लागते. एक सक्षम व परिणामकारक पालक होण्यासाठी संवेदनक्षम व प्रगल्भ असणे आवश्यक आहे. मुलांची जोपासना ज्या प्रकारे केली जाते, त्याचा जबरदस्त प्रभाव पुढे त्यांच्या भविष्यावर होतो. पालकत्वाच्या सकारात्मक वा नकारात्मक भूमिकेवर मुलांचे संपूर्ण आयुष्य घडते. अर्थात परिपूर्ण किंवा आदर्श मायबाप कुणीच असू शकत नाही. शेवटी आपण सगळी चुका करणारी माणसे आहोत. बऱ्याच सामाजिक रूढींना आपण गृहीत धरून चालतो. म्हणून मुलांना वाढवावे कसे याचा फारसा विचार न करता आपण मुलांना वाढवतो. पण एक चांगले संगोपन म्हणजे मुलांना सर्वार्थाने पोषक व सुरक्षित वातावरणात वाढविणे अभिप्रेत आहे. मुलांना आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा अर्थ समजावून देणे, जसे की मोठ्या माणसांचा सन्मान करणे, एकमेकांना मदत करणे, स्वतःबद्दल एक विधायक प्रतिमा घडविणे व  स्वतःचा आदर राखणे इत्यादी इत्यादी जीवनाची मुल्ये जोपासत स्वतःचा विकास करायला मुलांना शिकविणे हे त्यांच्यावर प्रेम करण्याइतकेच महत्वाचे आहे.

आजच्या धावत्या व ऐहिकच्या गर्तेत हरवलेल्या तांत्रिक जगात आपण मुलांना इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी, मोबाईल व कॉम्प्यूटर झटपट पुरवतो. पण त्याचबरोबर येणाऱ्या इतर संकटांना दुर्लक्षून चालेल का? फेसबुक, मोबाईल संदेशाच्या माध्यामातून मुले घरगुती संस्काराच्या पार पलीकडे जातात. कोवळ्या वयात नको त्या गोष्टींचा अनुभव त्यांना मिळतो. अशावेळी पालकांनी जागरूक राहणे खूप महत्वाचे आहे. आपण सगळे आपल्या मुलांसाठी भरमसाठ संपत्ती जमवतो, त्यासाठी नोकरी करतो, खस्ता काढतो. पण त्यांच्या मुलभूत भावनिक व शारीरिक गरजांकडे लक्ष पुरवतो का? त्याकडे लक्ष पुरवण्यासाठी हवा असलेला वेळ आपल्याकडे आहे का? त्याहीपेक्षा आपण त्याबाबतीत भावूक आहोत का? बालक-पालक नाते हे खरे तर अतिशय संवेदनशील असायला हवे. पण आज ते गृहीत धरले जाते. आपण सगळ्यांनी माणूस म्हणून एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपलं मूल हे आपलं मूल असण्याच्या आधी या जगातील एक स्वत्रंत जीव आहे आणि हे स्वतंत्र जीव जसे स्वतःचे शारीरिक अस्तित्व घेऊन जगतात तसेच त्यांचे स्वतःचे असे एक मानसिक अस्तित्व असते. त्या मानसिक अस्तित्वाला पालक म्हणून आपण खरेच न्याय देतो का? हा प्रश्न प्रत्येक पालकाने स्वतःला विचारायला हवा. मुले हे आपल्या हातात लगाम असलेले घोडे नाहीत की ज्यामुळे आपण त्यांचा लगाम आपल्या हातात ठेवू शकू. मुलांना पुढे जायची संधी आपण द्यायला पाहिजे यात दुमत नाहीच. पण आपण मुलांना त्यांच्या आयुष्यात विकसित होण्यासाठी जशी त्यांना मदत करायला हवी, तशीच त्यांनी गैरवर्तन करू नये वा चुकीच्या मार्गाने जाऊ नये याकडेही लक्ष पुरवायला हवे. आज मुलांना आधुनिक युगात जितके पुढे जायचे आहे तितकेच त्यांना वाहवत जाण्यापासून स्वतःला वाचवायचे आहे. त्यांना या धावत्या जगात स्वतःला सावरता आले नाही तर बऱ्याच मानसिक व वर्तणुकीच्या समस्या होऊ शकतात. यासाठीच मुलांना नात्यांचे महत्व कळायला हवे. शिक्षणाची महत्ता टिकवायला हवी. जबाबदारीची जाणीव यायला हवी. मुलांना जोपासायचे एखादे शास्त्रीय तत्व आपल्याला कदाचित सापडणार नाही. ती जादूची कांडी फिरवून साध्य होणारी गोष्ट नाही. पण संवेदनशील मातापित्यांना आपले मूल बरोबर मार्गाने चालले आहे की नाही याची चांगली जाणीव असायला हवी. बदलत्या काळाची गरज आणि काळाबरोबर बदलणाऱ्या मुलांच्या गरजांची जाणीव पालकांना असणे आज गरजेचे आहे.

- डॉ.शुभांगी पारकर

                                                   एम.डी, पी.एचडी.

मानसोपचार तज्ञ

                                                              रा.ए.स्मा.रुग्णालय

                                                                     परेल, मुंबई

[email protected]