पावसाचे कोडे

दिंनाक: 01 Mar 2019 14:55:00


पिंटू शाळेतून घरी आला. जरा वेळाने आईने त्याला विचारले, “पिंटू, आज शाळेत बाईंनी काय शिकवलं?” पिंटू म्हणाला, “पाऊस कसा पडतो ते शिकवलं.” आई म्हणाली, “मग सांग बरं मला.” पिंटू म्हणाला, “अगं आई, बाई शिकवत होत्या; पण मला कळलंच नाही, कारण मला खूप भूक लागली होती आणि तू डब्यात लाडू दिला होतास ना!” हे ऐकल्यावर पिंटूची आई रागावली आणि म्हणाली, “पिंटू, यापुढे असं केलंस तर मी तुला खाऊच देणार नाही आणि मी तुझ्याशी आता बोलणार नाही.” पिंटूला खूप वाईट वाटले आणि रडू यायला लागले. तो अंगणाच्या पायरीवर जाऊन रडत बसला. इतक्यात पावसाचे थेंब त्याच्या अंगावर पडायला लागले. त्याने इवल्याशा पंजाची ओंजळ केली, त्याबरोबर एक टपोरा थेंब त्याच्या ओंजळीत टपक्न येऊन बसला. पिंटू रडतच म्हणाला,

“थेंबा थेंबा मला मदत करतोस का?

तुझ्या येण्याचे कोडे मला सांगतोस का?”

त्याबरोबर आश्‍चर्य म्हणजे थेंब पिंटूला म्हणाला,

“रडू नको. काय झालं सांगतोस का मला?

काय मदत हवी आहे, करीन मी तुला.”

पिंटू म्हणाला, “माझी आई माझ्यावर रागावलीय आणि बोलत नाहीये. त्यामुळे मला खूप रडू येतंय रे.” “बरोबर मला सुद्धा आई रागावली आणि बोलत नसली की रडू येतं. पण तुला आई का रागावली?” पिंटू म्हणाला, “अरे, तू तयार कसा होतोस, कसा पडतोस हे बाई शिकवत होत्या पण माझं लक्ष नसल्याने मला कळलंच नाही, म्हणून.” थेंब म्हणाला, “रडू नको, सारं सांगतो तुला थांब नंतर जाऊन सारं तू आईला सांग.” “आम्ही जेव्हा जमिनीवर असतो, तेव्हा सूर्य बाप्पाची किरणं आमच्या अंगावर पडतात आणि आम्ही भावंडे गरम होतो आणि जादू व्हावी तशी आमची वाफ तयार होते. आमची वाफ झाल्यामुळे आम्ही वजनाला हलके होतो. मग काय, उंच उंच आकाशात वर वर चढायला लागतो. फुगा जसा पटपट वर जातो, स्पायडरमॅन जातो, तसा.” पिंटू म्हणाला, “पण वर जाताना भीती नाही वाटत?” थेंब म्हणाला, “अरे, नाही वाटत. तुम्ही कशी घसरगुंडी शिडी पटपट चढता तसे.”

मग आम्ही आकाशात जाऊन पोहोचतो. वर उंच गेल्यामुळे आम्हाला गार हवा लागते. थंडी वाजायला लागते आणि आमचे पुन्हा थेंबात रूपांतर होते. थंडीमुळे आम्ही काळेनिळे होतो, मग आम्हाला ढगदादा ओळीत उभे करतात आणि खाली जाण्यासाठी मदत करतात. मग पहिले जाण्यासाठी आमची गडबड, गोंधळ चालू होतो. तुम्ही शाळेत करता ना अगदी तसा.” पिंटू म्हणाला, “हां, म्हणजे गडगडल्याचा मोठा आवाज येतो तो तुमच्याच भांडणाचा असतो तर? आणि इतक्या उंचावरून खाली येताना भीती वाटत असेल ना!” थेंब म्हणाला, “तुम्ही जसे उंच घसरगुंडीची शिडी चढून जाता, तेव्हा तुमची आई खाली उभी असते. तिला तुमची काळजी वाटते आणि खाली घसरून येताना ती तुम्हाला धरते आणि कडेवर कुशीत घेते. तशीच माझी आई जमीनसुद्धा आम्ही वर गेल्यावर खूप काळजी करते त्यामुळे तिचा चेहरा अगदी सुकून जातो. मग आम्ही जेव्हा खाली येतो, तेव्हा ती आम्हाला अलगद झेलते. त्यामुळे आम्हाला लागत नाही. आहे की नाही आमची पण मज्जा!”

“आकाशाची शिडी चढतो पटपट सूरकन घसरत पडतो पटपट”, पिंटूला खूप आनंद झाला. त्याने थेंबाला त्याच्या आईकडे सोडलं आणि धावत आत गेला. आईला सारं सांगितलं. त्याचबरोबर पिंटूला आईने कडेवर घेतलं आणि म्हणाली, “शहाणं गं माझं बाळ.” पिंटू अंगणाकडे बघत थेंबाला म्हणाला, “थँक्यू थेंबा. आता मी उद्या शाळेत सर्वांना तुझे कोडं सोडवून दाखवतो आणि बाईंची शाबासकी मिळवतो. बाय बायऽऽऽ.”

- जयश्री एडगावकर

मुख्याध्यापिका, शि. प्र. मं. शिशुशाळा

[email protected]