शहाणी स्नेहा

दिंनाक: 08 Feb 2019 14:05:03


 

एक छोटीशी मुलगी होती. तिचे नाव होते स्नेहा. खूप लाघवी होती. तिसरीत शिकत होती. वर्गाची मॉनिटर होती.

एकदा ती खूप उदास झाली.

तिला भाऊ बहीण नसल्याने तिच्याशी खेळायला कुणीच नव्हते. मामाला टॉयफाईड झाला म्हणून आई त्याला पाहायला हॉस्पिटलमध्ये गेली होती.

बाबा ड्युटीवर गेले होते. ते पोलीस खात्यात असल्याने त्यांची ड्युटी केव्हाही लागायची.

आज तिला घरात अगदी एकटं वाटत होतं.

खरं तर तिला आईने सांगितलं होतं की, ‘आम्ही कोणी घरात नसताना दार उघडून बाहेर जायचं नाही.’ तरी ती दार उघडून घरासमोरील बागेत गेली. त्याच्या स्वतंत्र घराला बागेमुळे शोभा आली होती.

बागेतल्या एका झाडाकडे बराच वेळ पाहात राहिली.

आणि काय गम्मत! तिची उदासीनता दूरच पळाली.

तिच्या लक्षात आलं की, आपण उगीच नाराज झालो आहोत आपल्याशी कुणी खेळायला नाही म्हणून...

खरं तर एकटं जर कुणी या जगात असेल तर ते म्हणजे ‘झाड’.

झाडाला आपली जागा सोडून कुठे जाता येत नाही. कुणाशी बोलता येत नाही. गाणी गाता येत नाहीत. मैत्री करता येत नाही, की गरज पडली तर भांडताही येत नाही. खेळता खेळता मोठं होणं म्हणजे काय ते त्याला ठाऊक नाही. आवडीची डिशही खाता येत नाही, की तिन्ही सांजेला आईने सांजवात लावताच शुभंकरोतीही म्हणता येत नाही. वेगवेगळ्या कलाही जोपासता येत नाहीत झाडाला.

अरे! या सर्व गोष्टी मला मात्र करता येतात, तरीही मी उदास व्हावं?

मुळीच नाही. ती मनाशीच म्हणाली, ‘देवा, मी यापुढे स्वतःला एकटी कधीच समजणार नाही आणि मन दुःखी कधीच करणार नाही. कारण...कारण देवा तू मला माणूस बनवलंस हीच सर्वात मोठी आनंदाची ठेव आहे. माणूस म्हणून मी कला जोपासू शकते, देवाची प्रार्थना करू शकते आणि अजून खूप खूप काही जगासाठी करू शकते.. जे झाड करू शकत नाही.’

तिने मनोमन ठरवलं की, आता आईला यायला थोडा उशीर झाला आणि घरात मी एकटी असले तरी मी कधीच उदास होणार नाही.

- शैलजा दीक्षित, सहशिक्षिका

प्राथमिक विद्यामंदिर, मांडा.