शाळेतून आलो की, कधी एकदा खेळायला जातो असे सर्वच मुलांना नेहमीच वाटते. पण आता खेळ बदलले आहेत. फार मागे  नाही, पण 15-20 वर्षांपूर्वीपर्यंत  मुले लपंडाव, डब्बा ऐसपैस, टिपिटीपी टीप टॉप, दगड का माती, विषामृत, बारा टप्पे, बिस्किट, खो- खो, शिवणा-पाणी, चोर पोलीस, मधला कावळा, रुमाल-पाणी, कब्बड्डी, आट्यपाट्या, लंगडी, मी शिवाजी, अप्पारप्पी इतरही अनेक खेळ खेळत असत. आता टि.व्ही., कॉम्प्युटर गेम, मोबाईलच्या दुनियेमुळे मैदानात जाऊन खेळणेच बंद होत चालले आहे.

डार्विनच्या सिद्धांतानुसार उपयोग न केलेले अवयव पुढच्या पिढीत नष्ट होत जाता, तर एक हजार किंवा दहा हजार वर्षांनी जर मनुष्यप्राणी जगला तर काय होईल?

मुलांनी दिलेल्या निबंधातलं उत्तर - त्या वेळी मनुष्याला दोनच अवयव असतील. एक मेंदू आणि दुसरा एक बोट, माउस वापरायला! हा जरी आज विनोदाचा भाग वाटत असला तरी बदललेली परिस्थिती लक्षात येते. आजही  रस्त्यावर जाउन भित भित मुले खेळत असतात, पण अनेकदा त्यांत अडचणीच खूप असतात. त्यातूनही मैदानात जाणे झालेच तर क्रिकेट शिवाय इतर खेळ खेळणे पापच. दुसरा मुद्दा म्हणजे क्रिकेटशिवाय खेळ झालेच तर त्यात समरसून खेळणे नाही. कपडे खराब न करता व अंग बचावून खेळणे दिसते. खेळ खेळताना तर लागेल ही भीतीच जर अधिक असेल तर तो खेळ कसला?

हे खेळातले अंग बचावणे पुढे जीवनातही परावर्तित होते. हे बदलणे अत्यंत गरजेचे आहे. खरंच थोडावेळ मुलांना देऊन आपल्या लहानपणीचे खेळ शिकवले तर तीही रस घेतात. त्यांना कॉम्प्युटरवर तेच तेच खेळून कंटाळा येणारच आहे. मग ती भुणभुण करत बसतात नव्या खेळासाठी. आपण मात्र वेळ देण्यापेक्षा आपल्यालाही नव्या गेमची सीडी देणं सोपं असतं बरेचदा. मग ते दुष्टचक्र चालूच होतं. खेळताना लागलं तर, ही भीती पण पालकांच्या भीतीचाच एक प्रकार आहे. बरेचदा जेव्हा संध्याकाळी मुलांनी खेळणं अपेक्षित असतं, तेव्हा पालक कार्यालयात असतात. आजी-आजोबा बरेचदा सोबत राहत नसतात. शेजारच्या सगळ्या घरांतही थोड्याफार फरकाने तीच कथा असते. मग खेळताना मूल पडलं त्याला लागलं तर कोण बघणार? पुन्हा जास्त लागलं तर त्याची शाळा बुडणार, मग ते मागे पडणार, त्याची काळजी घेण्यासाठी आपल्याला रजा घेऊन राहायचं म्हटलं तर ते शक्य कसं होणार? हा विचार पालक करत करतात. मग ती भीती मुलांना वाटली तर त्यात नवल ते काय? पण सवंगड्यांबरोबर खेळण्याची मजा काही औरच.

खेळताना मनसोक्त, अगदी जीव ओतून खेळतात मुलं. मार लागू द्यावा. त्याशिवाय वेदना कशा कळणार? त्याशिवाय सहवेदना सहसंवेदना कशी उपजणार?

जरा लागलं की, उगाच मुलांच्या मदतीला न धावता त्यांना स्वतःच त्यातून सकारात्मकरीत्या बाहेर काढण्याचे आईबाबांचे जुने उपाय अगदी मस्त होते. गुडघा/डोकं आपटलं जरासं की आमचे बाबा म्हणायचे, जाऊ दे उंदीर पळाला. त्यामुळे न गुडघा फुटल्याची कधी भीती वाटली न उंदराची! आजी म्हणायची, जा काऊला सांग त्या आमच्या टेबलाला घेऊन पळ. किंवा हे पण ऐकलंय, आपण त्याचं घर उन्हात बांधू बरं. हे खोटं असतं सगळं पण मुलांचं लक्ष त्या छोट्याशा दुखापतीपासून दूर वळतं मात्र हमखास!

एरव्हीचं जाऊ द्या. पण निदान आपल्या सुट्टीच्या दिवशी तरी मुलांना घेऊन खेळावं स्वतःही वेगवेगळे खेळ शिकवावे. मुलांना प्रथमोपचार घ्यायला शिकवावे. म्हणजे छोटं मोठं लागलं, तर मुलं घाबरून जाणार नाहीत आणि खेळतील. मित्र मिळवतील. सोपं तर काही नाहीये, पण हा प्रयत्न करायला काय हरकत आहे? सहजप्रवृत्तीने मुलांनी खेळलेच पाहिजे.

खेळ आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ते आम्हाला निरोगी आणि सुदृढ ठेवतात. ते मनोरंजन आणि शारीरिक हालचालींचा एक उपयुक्त साधन आहे. खेळ म्हणजे मानसिक आणि शारीरिक वाढ. खेळ आशा आणि निराशेमध्ये मानसिक संतुलन राखण्यासाठी, कठीण परिस्थितीत कशी हाताळायची हे शिकवतात. खेळ मित्रत्वाची भावना विकसित करतात. ते आपल्यात संघाची भावना विकसित करतात. ते मानसिक आणि शारीरिक कडकपणा विकसित करण्यात मदत करतात. ते आपल्या शरीराला आकार देऊन मजबूत आणि सक्रिय करतात. खेळ आपल्याला ऊर्जा आणि सामर्थ्य देतात. थकवा आणि सुस्ती काढून टाकतात. खेळ आपल्या क्षमतेत सुधारणा करतात. खेळ हे शिक्षणाचा अविभाज्य भाग व्हायला हवेत. खेळांशिवाय शिक्षण अपूर्ण आहे.

आजचे युग हे आधुनिक युग आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे मनुष्य शारीरिक कष्ट व शुद्ध मोकळी हवा यापासून कोसो दूर झालेला आहे. आज सर्व वयोगटातील व्यक्तिवरील तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. परिणामी प्रत्येक मनुष्यात मानसिक, शारीरिक व भावनिक असंतुलन वाढत आहे आणि यामुळे समाजामध्ये अनेक आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. म्हणूनच व्यक्तीच्या विकासात शारीरिक क्षमता वाढवण्याकरता खेळाला महत्त्व दिले पाहिजे, आणि त्याकडे गंभीरतेने बघितले पाहिजे. आत्मविश्वास वाढीसाठी देखील खेळाचे स्थान आपल्या जीवनात आवश्यक आहे. विविध शारीरिक हालचालींमुळे, खेळांमुळे मुलांवरील ताण कमी होतो. खेळामुळे व्यक्तीतील इतर सुप्त गुणसुद्धा विकसित होत असतात. म्हणूनच व्यक्तिमत्व विकासात शारीरिक क्षमता वाढवताना खेळाला महत्त्व दिले पाहिजे. खेळामुळे खिलाडू वृत्ती, सांघिक वृत्ती, सहकार्य करण्याची वृत्ती, नेतृत्व, स्पर्धात्मक वृत्ती, एकाग्रता, सहनशीलता, आत्मविश्वास इत्यादी गुणांची वाढ होते. अनेक कारणांमुळे बाहेर मुलांना खेळता येत नाही. अभ्यास झाल्यावर ते मग घरातच  उड्या मारतात नाहीतर टी.व्ही. पाहतात. कोणीच खेळत नाहीत.

खेळ ही मुलांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे आणि आनंदी व तणावरहित मुले जास्त कार्यक्षम असतात. म्हणूनच शालेय जीवनात खेळाचे महत्त्व अनन्यसधारण आहे.

परीक्षेतील गुण म्हणजे पुढील आयुष्यात यश आणि समाधान मिळविण्याचा एकमेव मार्ग मुळीच नाही. जीवनात यश प्राप्त करायचे असेल तर वेळेचे नियोजन, समुहात काम करण्याची क्षमता, स्वत:च्या व इतरांच्या भावना समजणे, इतरांशी संवाद साधता येणे, नेतृत्वगुण असणे, ताणतणाव हाताळता येणे यांसारखी अनेक जीवनकौशल्य अंगी असावी लागतात. ही सर्व कौशल्य मैदानावर, समुहात खेळताना नकळतपणे अंगी बाणवली जातात. याबरोबरच व्यक्तिमत्व विकसित करणारे अनेक इतर सामाजिक गुण देखील विद्यार्थी नकळत आत्मसात करतात. म्हणून शालेय जीवनात खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

नियमितपणे दीर्घकाळ येणारी मानसिक व शारीरिक कणखरता ही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर व्यक्तीची हक्काची संपत्ती असते. यावरून शालेय जीवनात प्राथमिक टप्प्यावरच शारीरिक शिक्षण दररोज असणे ही विद्यमान व भविष्यकाळाची गरज आहे. बालवयापासूनच नियमितपणे खेळ खेळण्याची गोडी लावल्यास त्यातूनच उत्कृष्ट क्रिडापटू तयार होतील. म्हणून शालेय वेळापत्रकातील खेळाच्या तासिका खेळ घेऊन आपण उत्कृष्ट क्रिडापटू घडवूयात! 

नियमितपणे खेळ घेऊयात!

- दादासाहेब शिंदे

क्रीडाशिक्षक, कै. ग.भि.देशपांडे विद्यालय