एका कोळियाने

दिंनाक: 08 Feb 2019 14:22:31


इंग्रजी साहित्यातील जगप्रसिद्ध लेखक अर्नेस्ट, हेमिंग्वे यांच्या 'ओल्ड मॅन अ‍ॅन्ड द सी' या गाजलेल्या लघुकथेचा अनुवाद महाराष्ट्राचे लाडके आणि जन्मशताब्दी साजरी करीत असलेले लेखक पु.ल. देशपांडे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून झाला तो ‘एका कोळीयाने’ या नावाने.

मूळ लेखकाच्या संपन्न अनुभवविश्‍वातून आणि आवडीच्या कामातून साकारलेली ही कथा वाचकांना जिवंत अनुभव देत स्फुरण चढवते आणि सुन्न करून सोडते.

 विविध संतांनी सांगितलेले जीवनाचे अंतिम सत्य आणि श्रीकृष्णाच्या प्रयत्नवाद याचे बेमालूम मिश्रण या कथेत आपल्याला पाहावयास मिळते. समुद्रावर मासेमारी करायला जाणार्‍या या म्हातार्‍या कोळ्याची व्यक्तिरेखा इंग्रजी व मराठी साहित्यातही अजरामर ठरलेली आहे.

म्हातारा कोळी आणि मर्लिन हा अवाढव्य मासा यांच्यातील लढ्याचे हे चित्रण आहे. 84 दिवस होऊनही जाळ्यात मासा सापडलेला नसतो. हे तो आपले दुर्भाग्य समजत असतो. पहिले चाळीस दिवस त्याच्याबरोबर एक पोरगा येत असे. पण या 40 दिवसात एकही मासा गळाला लागला नाही हे पाहिल्यावर त्या पोराच्या आईवडिलांनी त्याला दुसरीकडे पाठवले, पण मासेमारीचे तंत्र तो पोरगा त्या म्हातार्‍याकडूनच शिकला होता. मग पुढे काय झाले? हे आपल्याला पुस्तक वाचल्यावर कळेलच.

मानाच्या पुलित्झर पारितोषिकाने या पुस्तकाला सन्मानित करण्यात आले आहे. तेव्हा बालमित्रांनो, मिळवा हे पुस्तक आणि ते कसे वाटले हे आपल्या शिक्षणविवेकला जरुर कळवा.

- स्वाती गराडे, सहशिक्षिका

रेणावीकर विद्या मंदिर

[email protected]