काही पक्षी जोडीने तर काही पक्षी समूहाने राहणे पसंत करतात. उदा., चिमण्या, बदके, सुगरण, मैना, पोपट आणि मुनिया हा पक्षी आकाराने लहान असल्यामुळे समूहाने वावरताना दिसून येतो. या लेखात आपण ठिपकेवाली मुनियाची सविस्तर माहिती घेऊ. सर्वसाधारणपणे चिमणीपेक्षा लहान आकाराचा हा पक्षी आज मानव वस्तीजवळ आढळू लागला आहे. त्यामुळे तो मुलांना चिमणीचा प्रकार वाटू लागला आहे, तो गैरसमज दूर व्हावा म्हणून याची माहिती देत आहोत.

या पक्षाला ठिपकेवाली मुनिया, खवलेवाली मुनिया तसेच इंग्रजीत Scaly-creasted munia असे म्हणतात. चिमणी एवढ्या आकाराचा पक्षी. त्यांची शेपटी टोकदार असून त्याचा रंग तपकिरी असतो. नर आणि मादी विणीचा हंगाम सोडून इतर वेळी दिसायला सारखेच असतात.

मुनियांचे जवळजवळ पाच प्रकार आपल्या महाराष्ट्रात आढळून येतात. लाल ठिपकेवाली मुनिया, तीन रंगी मुनिया, पांढऱ्या पोटाची मुनिया, चंदेरी मुनिया आणि ठिपकेवाली मुनिया, सर्वच प्रकारच्या मुनिया अतिशय नाजूक व दिसायला असे सुंदर पक्षी आहेत. मुनियांची चोच बुडाशी जाड आणि टोकाशी निमुळती असते. यामुळे तिला गवताच्या बिया किंवा धान्याचे दाणे टिपण्यासाठी आणि भरडण्यासाठी त्याच्या उपयोग होतो.

मुनिया प्रामुख्याने जून ते सप्टेंबर महिन्यात विण करताना दिसतो. घरट्याचे ठिकाण माळरानावरील खैर, हिवर, बाभूळ अशी झाडे निवडतो, तर बागेतील किंवा मनुष्य वस्तीजवळ बोगनवेल, अशोकाची झाडे, फायकस यांची झाडे निवडतो. अगदी गॅलरीतील अडचणीची जागा निवडतो. श्रावणात भरपूर गवत मोठे झाल्यामुळे तो गवताची पाने तोडून रिबनसारखा लांब भाग गवताचा आपल्या घरट्यासाठी आणताना दिसतो. माझ्या निरीक्षणात तो कधीकधी सुगरणच्या घरट्याचीही गवताची पाने आणताना दिसतो. तर चिमणी मुनियाचे घरटे बळजबरीने ताब्यात घेताना दिसते.

मुनियाचे घरटे म्हणजे गवताचा चेंडूसारखा आकाराचा पुंजका आणि त्याला गोल आकाराचे भोक. या घरट्यात मादी 7 ते 8 अंडी घालते. खाण्याच्या उपलब्धेवर संख्या कमी अधिक होते. नर आणि मादी दोन्हीही एकाच वेळी घरट्यात बसून उबवतात व पिल्लांचे संगोपन देखील करतात. विणीचा हंगाम संपल्यावर पिल्ले याच घरट्यात रात्री झोपतात. विणीचा हंगामाशिवाय तो इतर काळातही ज्या भागात गवत किंवा पाण्याजवळ आढळतो. पाणवठ्यावर इतर शिकारी पक्षी आले तर तो के-के-के-के असा धोक्याची सूचना देणारा भसाडा आवाज काढतो.

- भूषण भोये, सहशिक्षक

कै. ग.भि.देशपांडे विद्यालय

[email protected]