गिरेंगी गिरेंगी!!

दिंनाक: 04 Feb 2019 19:48:06


रेश्मा माझी पहिलीवहिली मैत्रीण. आम्ही चाळीत राहायचो आणि शेजारच्याच घरात रेश्मा आपल्या आजी आजोबांबरोबर राहायची. मी पहिलीत आणि साधारणत: बालवाडीत जाण्याच्या वयाची असणारी रेश्मा अशी आमची जोडी. रेश्माला घेऊन रोज तिची आजी आमच्या चाळीच्या अंगणात यायची आणि बरोबरीने आम्ही खेळायचो. रेश्माचे आई बाबा वेगळ्या गावी राहायचे त्यामुळे आजीला रेश्मा म्हणजे आपली जबाबदारी वाटायची त्यामुळेच रेश्मा जरी थोडीशी नजरेबाहेर गेली तरी आजीचा जीव घाबराघुबरा व्हायचा तसंच ती थोडीशी धावली, तिने बारीकशी उडी मारली तरी आजी कासाविस आणि रेश्माबाबत ती सजग म्हणून माझ्याबाबतही. जरा काही झालं की आजी आम्हाला ओरडायची, “अरे रूक! रूक! गिरेंगी, गिरेंगी.” नंतर आम्ही घर बदललं, रेश्माही परत कधी भेटली नाही; पण आजही काही धाडसाचं काम करताना आजीचं वाक्य आठवतं, “अरे रूक! रूक! गिरेंगी, गिरेंगी” आणि ते वाक्य पाय मागे खेचतं. माझी ही परिस्थिती तर रेश्माची परिस्थिती कशी असेल असाही विचार येतो. कारण ती तर दिवसभर ते ऐकत असायची. हे सगळं आज सांगण्याचं कारण म्हणजे, आज अनेकदा पालक रेश्माच्या आजीसारखंच वागताना दिसतात. मुलांना कुठेही एकटं पाठवायचं, त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी सोपवायची की, आधीच यांचं सुरू होतं ‘नको नको, नाही जमणार ते तुला. वगैरे वगैरे.’ अगदी सोप्पं उदाहरण द्यायचं तर घरी आलेल्या पाहुण्यांना पाणी देण्याचं सोप्पं कामही मुलांना सांगितलं जात नाही, ते आई स्वत: करते, का तर म्हणे ग्लास पडेल. यातून काय होतं तर मुलं गमावतात तो आत्मविश्वास आणि स्वावलंबित्व. काम न करायची, दुसर्‍यावर अवलंबून राहण्याची अथवा काम उरकायची किंवा जास्तीत जास्त पुढे ढकलायची वृत्ती निर्माण होते. हे अनेकदा मुलांच्या अभ्यासाच्या बैठकीला हानीकारक ठरतं असं लक्षात येतं. कुणीतरी अभ्यास कर म्हटल्यावाचून किंवा कुणीतरी समोर बसून अभ्यास घेतल्यावाचून तो ती करायला बघत नाहीत, कारण जबाबदारीच्या जाणीवेचा अभाव आणि परावलंबित्व. हे सगळं घडू न देण्यासाठी पालकांनी एक महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे, पाल्याला जबाबदारी घेण्याची सवय लावली पाहिजे. सारखं गिरेंगी! गिरेंगी! असं न म्हणता, हे हे केल्यावर तुम्ही पडू शकता, तुम्हाला लागू शकतं तेव्हा त्या गोष्टी करताना काळजी घ्या, जबाबदारीने वागा आणि स्वत:ला जपा असं जर का आजीने सांगितलं असतं तर भीतीची जागा जबाबदारीने घेतली असती. स्वत:हून कोणतीही गोष्ट सुरू करायचा आणि पार पाडायचा हुरूप आला असता. एवढी क्षुल्लकशी गोष्टच तर करायची आहे पालक म्हणून.

- मेघना जोशी

[email protected]