'शिक्षणविवेक' आणि 'शिल्पकार चरित्रकोश' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'सकस शैक्षणिक पर्यावरणासाठी' हा शिक्षकांसाठीचा परिसंवाद उत्तमरीत्या संपन्न झाला. परिसंवादाचे उदघाटक म्हणून मा. अनिल माणकीकर उपस्थित होते. ग्राममंगल संस्थेच्या सचिव अदिती नातू या पहिल्या सत्राच्या अध्यक्ष होत्या. तर डॉ. शरद कुंटे आणि मा. रवींद्र वंजारवाडकर हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या सत्राचे अध्यक्ष होते.

या परिसंवादात डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, कर्वे स्त्री शिक्षण संस्था अशा विविध संस्थांच्या शाळांतील ७० हून अधिक शिक्षकांनी उपस्थिती लावली; तर पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक अशा प्रत्येक गटातून ३ तीन शिक्षक असे ९ शिक्षकांनी अभ्यासपूर्ण निबंध सादर केले. 'विद्यार्थी वर्तन समस्या', 'शिक्षण व्यवस्थेतील गाभा-शिक्षक' आणि 'व्यवस्थेच्या शिक्षकांकडून अपेक्षा' हे मुख्य तीन विषय परिसंवादाच्या केंद्रस्थानी होते. निबंध सादर झाल्यानंतर त्यावर सर्व बाजूंनी चर्चा झाली. निबंध सादर कर्त्यांमध्ये उमा घोळे, अर्चना देव, उमेश सेलूकर, लीना सुमंत, प्रीती धोपाटे, धनंजय भांडारी, अजित शेडगे, ज्योती पोकळे आणि श्रद्धा खोले आदींनी वरील विषयावर निबंध सादर केले.

पहिल्या सत्राचे अध्यक्षीय भाषण करताना अदिती नातू म्हणाल्या, “बालवाडीत मुलांचा प्रवेश होणे म्हणजे त्याच्या सामाजीकीकरणाची ती सुरुवात असते. चंचलता, उत्साह हा त्यांच्या वयाचा दोष नसून तो त्यांचा गुण असतो. प्रत्येक मुलाची सामाजिक, आर्थिक परिस्थिती वेगळी असते, त्या घटकांचा परिणाम त्यांच्या वागण्यात दिसतो. मुलांना आपण संवेदनशील करायला पाहिजे, नाहीतर विकृतीची समस्या उद्भवू शकते. याच वयात मुलांच्या मेंदूचे डाऊनशिफ्टिंग होत असतं. आताची मुले गॅझेट्स खूप वापरतात याकडे आपण समस्या म्हणून न बघता ती आताच्या मुलांची आणि शिक्षणपद्धतीची गरज म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. फक्त त्याचा वापर कसा आणि कुठे करायचा हे लक्षात घेतल पाहिजे. प्रत्येक गटातील वयाची वैशिष्ट्ये ही वेगळी असून त्या वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास केला तर मुलांची वागणूक समजायला आपल्याला नक्कीच मदत होईल.” 

दुसऱ्या सत्राचे अध्यक्षीय भाषण करताना डॉ. शरद कुंटे म्हणाले, “आपण पूर्ण व्यवस्था बदलू शकत नाही हा विचार शिक्षकांनी काही काळ बाजूला ठेवावा. आणि आपण काय करू शकतो आणि किती प्रमाणात करू शकतो, हा विचार आधी करावा.”

विद्यार्थ्याचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि नैतिक विकास झाला पाहिजे. पण तो आज होताना दिसत नाही. याचे कारण म्हणजे शिक्षक पाठ्यपुस्तकातच गुंतून पडले आहेत.

यामुळे शिक्षक पूर्ण जबाबदाऱ्या पार पाडू शकत नाही. त्यामुळे फक्त बेरोजगारांच्या फौजा महाविद्यालयातून बाहेर पडत आहेत. शालेय शिक्षण चांगल्याप्रकारे मिळाले नसल्याने महाविद्यालात विद्यार्थी जास्त मानसिक तणावात दिसतात. ही अतिशय गंभीर समस्या आहे.

परिसंवादातील ‘व्यवस्थेच्या शिक्षकांकडून अपेक्षा’ या तिसऱ्या सत्रातील विषयावर सत्र अध्यक्ष मा. रवींद्र वंजारवाडकर यांनी आपले मत व्यक्त केले. या वेळी बोलताना ते म्हणाले, “संपूर्ण समाज शिक्षकांकडे पाहत असतो. त्यात पालक असतात, शासन असते आणि माध्यमे देखील असतात. सर्व शिक्षकांनी या ठिकाणी मांडलेले मुद्दे फक्त इथेच मांडून न थांबता सर्व प्रकारच्या समाज माध्यमांवर आपले मत मांडावेत. जेणेकरून ते सर्वांपर्यंत पोहोचतील.

आणि शिक्षणविवेक या मासिकामुळे शाळेतील सध्याच्या विश्वाबद्दल माहिती होते. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक काय विचार करतात, ते समजते. हेच समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षणविवेकचा जन्म झाला असून शिक्षणविवेक आपले काम अतिशय उत्तम प्रकारे करत आहे.”

परिसंवादाच्या समारोप सत्रामध्ये मानसी वैशंपायन लिखित 'क्षण क्षण शिक्षण' आणि हम चरित्र निर्माण ना भुले - विवेक पालकत्व' या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर श्री. वा. कुलकर्णी, मा. राजीव सहस्त्रबुद्धे, मा. प्रार्थना सदावर्ते, मा. मानसी वैशंपायन आणि 'शिक्षणविवेक'च्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

- प्रतिनिधी, शिक्षणविवेक

[email protected]