थंडीचे दिवस होते. शेकोटी पेटवायची असं ठरलं होतं. आजी, आबा, रिया, आर्यन आणि शेजारची सायंटिस्ट ताई असे सगळे जमले होते. ताईचं खरं नाव होतं सोनाली; पण तिला सगळे ‘सायंटिस्ट ताई’च म्हणायचे. ती कॉलेजमध्ये विज्ञान शाखेला होती, शिवाय तिचं वाचनही चांगलं होतं. इंटरनेटवरून दररोज नवीन माहिती वाचून ती सगळ्यांना सांगत असे.

अंगत-पंगत झाली आणि आबांनी अंगणात गाद्या घातल्या. रिया आणि आर्यन लगेच आडवे झाले. असं आडवं पडून आकाश बघायला आणि मोठ्या माणसांच्या गप्पा ऐकायला दोघांनाही खूप आवडायचं. आकाश अगदी स्वच्छ होतं, एकही ढग नव्हता.

“ए, आकाश बघ कसं दिसतंय!”, आर्यन रियाला म्हणाला.

“हो ना रे!  पण आकाश निळं का रे दिसतं?”

“हम्म... मला वाटतं आपण जसा चित्राला रंग देतो, तसा आकाशाला पण कोणीतरी रंग दिला असेल!”, आर्यन उद्गारला.

“हो, असेल... पण कोणी...?”, रियाला प्रश्‍न पडला.

“मला नाही माहीत, आपण सायंटिस्ट ताईला विचारूया का? ए तायडे, आकाशाला कोण रंग देतं गं?”

ताईला खूप हसू आलं. ती म्हणाली,“ अरे, असं नसतं. आकाशाला वेगवेगळे रंग हे सूर्याच्या प्रकाशामुळे मिळतात आपल्याला जो पांढरा प्रकाश दिसतो, तो सात वेगवेगळ्या रंगांचा बनलेला असतो. त्याला प्रकाशाचा ‘वर्णपट’ (Spectrum) म्हणतात. वर्ण म्हणजे रंग.”

“हो माहितीय! ता ना पि हि नि पां जा (Vibgyor)!” दोघे एका सुरात ओरडले.

“म्हणजे इंद्रधनुष्य असतं तसंच ना?”, रियानं विचारलं.

“हो तसंच.”, ताई म्हणाली. “मग तुम्हाला हेही माहीत असेल की पृथ्वीभोवती वातावरण आहे. या वातावरणात धुळीचे खूप कण असतात. सूर्याकडून जेव्हा पृथ्वीकडे प्रकाशाचे किरण येतात. तेव्हा ते या कणांवर आपटतात आणि विचलित (Distract) होतात; म्हणजे त्यांची दिशा बदलते. यामुळे किरणांमधला निळा रंग, सभोवती सगळ्यात जास्त पसरतो (Scatter) आणि तोच आपल्या डोळ्यांपर्यंत येतो.”

“अच्छा! म्हणून आकाश निळं दिसतं!”, आर्यनने निष्कर्ष काढला. “पण मग सूर्य उगवताना किंवा मावळताना आकाश लाल का दिसतं?”

“मी सांगते!”, आजी म्हणाली. “कारण, त्यावेळेस किरणांना, आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, धुळीच्या कणांशी जास्त वेळ आपटा-आपटी (collision) करावी लागते. त्यामुळे निळा रंग आपल्यापासून लांब जातो आणि आपल्यापर्यंत पोहोचतात ते फक्त लाल आणि केशरी रंग.”

“मला कळलं! म्हणजे आकाश एरव्ही वर्ण-पटाच्या उजव्या बाजूच्या रंगांमध्ये (निळा व जांभळा) दिसतं आणि सूर्य मावळताना व उगवताना, ते वर्ण-पटाच्या डाव्या बाजूच्या रंगांमध्ये (तांबडा व नारिंगी) दिसतं.”, रिया म्हणाली.

“अगदी बरोबर!”, आबा म्हणाले. “प्रकाशाच्या या खेळाला रामण इफेक्ट (Raman Effect) असं नाव आहे. भारतीय वैज्ञानिक सर सी.व्ही. रमण यांनी याचा शोध लावला. त्यासाठी त्यांना 1930 साली नोबेल पारितोषिक मिळालं. त्यांच्या कार्याची गौरव म्हणून दरवर्षी 28 फेब्रुवारीला ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा केला जातो.”

रिया,आर्यनला ही माहिती ऐकून खूप भारी वाटलं.

“ए ताई, पण मग आकाशात या चांदण्या का चमचम करतात बरं?”, दोघांना अजून एक प्रश्‍न पडला.

“त्याबद्दल नंतर सांगेन. आता सगळे झोपू या. गुड नाईट!”

- सायली कुलकर्णी

[email protected]