'स्नेहलताई, ही प्रज्ञा. माझी कझिन. लहानपणापासून अमेरिकेतच वाढली. तिकडे पंधरा वर्षं राहून, हिची फॅमिली आता भारतातच सेट्ल व्हायचं म्हणत आहे. ताई, हिला पण आपल्या ग्रुपमध्ये घेऊया?', केतकीनं विचारलं.

'अरे वा! कां नाही! प्रज्ञा, आमच्या या ग्रुपमध्ये तुझं स्वागत आहे, काय मित्रांनो!', स्नेहलताईनं हसून प्रज्ञाचं स्वागत केलं.

'ओह् व्हाय नॉट, वेल कम प्रज्ञा. निखिल हिअर', निखिल पुढे झाला.

'अरे पण हिला मराठी समजतं ना? नाही, लहानपणापासून अमेरिकेत राहिली आहे ना. म्हणून...', सारंग.

'हो ना. पु. लं. म्हणतात तसं, “हिला मराठी वर्ड्स रिमेंबर करायला जरा डिफिकल्ट जातं असेल नाही?, शमिका.

त्यावर हसण्याची एकच लाट उसळली. 

'नाही हं! प्रज्ञा एकदम छान मराठी बोलते. एवढंच नाही, तर ती मराठीतून नियमितपणे तिच्या ब्लॉगवर लिहितेसुद्धा.', केतकीनं माहिती पुरवली.

'पण तुम्हाला त्यांत एवढं आश्चर्य कां वाटतं? मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही राहिला, तरी त्याला मराठी यायलाच हवं. मातृभाषा आहे ना ती आपली?', प्रज्ञा म्हणाली.

सगळे तिच्याकडे आ वासून पाहू लागले.

'बाहेर व्यवहाराची भाषा कोणतीही असली, तरी घरात मी-आई-बाबा, सगळे एकमेकांशी मराठीच बोलत होतो.', प्रज्ञा.

'काय सांगतेस? तिकडे तर मम्मी, पप्पा नाहीतर डॅडी असं म्हणतात ना?', छोट्या वेदानं विचारलं.

'मी पण घरी मम्मा आणि डॅड असंच म्हणते.' हा ज्याचा त्याचा आवडीचा प्रश्न आहे. पण आम्ही तिकडेही मराठीत बोलत होतो, यांत आम्हांला काही फार खास गोष्ट करतो असं मुळीच वाटत नाही. किती सहज प्रवृत्ती आहे ही. वाघ सिंहाने डरकाळी फोडणं आणि मनिमाऊनं म्याव म्याव करणं, ते जितकं सहज, तितकंच हेही.', प्रज्ञा.

'बापरे, खरंच हिचं मराठी तर खूप भारी आहे नाही?', शमिका.

'वा प्रज्ञा, मला आवडले तुझे विचार आणि व्यक्त होण्याची पद्धतही.', स्नेहलताईनं प्रज्ञाला शाबासकी दिली.

'आपणच आपल्या मातृभाषेचा मान नाही राखला, तर इतर कसे राखणार. मराठीतून बोलणं म्हणजे कमीपणाची गोष्ट थोडीच आहे? जगात कुठेही जा, शिकायला किंवा नोकरीसाठी. त्या त्या ठिकाणची स्थानिक भाषा शिकावीच लागते. विद्यापीठातही तिथली स्थानिक भाषा ही अभ्यासासाठी एक विषय म्हणून असतेच. बाहेर व्यवहारासाठी त्याचा उपयोग होतो. माझी आई तर तिथल्या मुलांसाठी मराठी भाषेचे वर्ग घेत होती. आणि गंमत म्हणजे, तिथली काही अमेरिकन मुलं सुद्धा मराठीच्या वर्गात यायची.'

'व्वा! हे तर खूपच छान. मित्रांनो, आता मराठीचा विषय निघालाच आहे, तर आज आपण मराठी भाषेतील काही प्रसिद्ध कविता, त्यांचे कवी, लेखक यांच्यावर एक खेळ खेळूया कां? त्यानिमित्तानं तुम्हालाही काही नांवं आठवतील, काही नव्यानं कळतील.', स्नेहलताईनं विचारलं. सगळ्यांनी मोठ्या उत्साहानं होकार दिला.

सगळेजण गोल करून बसले. मुलं विरुद्ध मुली असे दोन गट केले. ताईनं सांगितलं, एका गटानं कविता सुरू करायची, दुस-या गटानं कवीचं नांव सांगायचं. चालेल? मग करा सुरू.'

'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला...'

'स्वातंत्र्यवीर सावरकर.'

 

'श्रावणमासी हर्ष मानसी ।

हिरवळ दाटे चोहिकडे ।

क्षणांत येते सरसर शिरवे ।

क्षणांत फिरूनी ऊन पडे ।।'

'बालकवी.'

 

'मोगरा फुलला, मोगरा फुलला ।

फुले वेचिता बहरू कळियांसी आला'

'हे मराठी काही वेगळंच दिसतंय. कुणा संतांचं वाटतंय'

'बरोब्बर! संत ज्ञानेश्वर.'

 

'सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी ।

कर कटावरी ठेवोनिया'

'संत तुकाराम.'

 

'एका तळ्यात होती बदके पिले सुरेख ।

होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक'

'ग. दि. माडगूळकर.'

 

'देणा-याने देत जावे, घेणा-याने घेत जावे ।

घेता घेता एके दिवशी, देणा-याचे हात घ्यावे.'

'वि. दा. करंदीकर.'

 

'अजून त्या झुडपाच्या मागे, सदाफुली दोघांना हसते ।

अजून अपुल्या आठवणींनी, शेवंती लजवंती होते'

'वसंत बापट.'

 

'काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी ।

मज फूलही रुतावे, हा दैवयोग आहे'

'शांता शेळके.'

 

'तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे रे'

'मंगेश पाडगांवकर.'

 

'हे सुरांनो चंद्र व्हा, चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोचवा'

'कुसुमाग्रज.'

 

'लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी ।

जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी ।

 धर्म, पंथ, जात एक, जाणतो मराठी ।

एवढ्या जगात माय, मानतो मराठी ।।'

'सुरेश भट.'

'हे कविलोक तर अगदी आपल्या मनातलंच बोलतात नाही कां? जे सुरेश भटांना वाटलं तसं प्रत्येक मराठी माणसाला वाटलं पाहिजे. जगाच्या व्यवहाराची भाषा तर शिकलीच पाहिजे, पण आपल्या मातृभाषेचा मान आपणच ठेवला पाहिजे. मराठी भाषा आपली आई, तर बाकीच्यांची भाषा मावश्या!

- मधुवंती पेठे

 [email protected]