अद्वितीय प्रतिभा व शब्दप्रभुत्वाच्या साहाय्याने गीतरामायाणासारखा दर्जेदार नजराणा महाराष्ट्राला पेश करणारे व आजही मराठी रसिकांच्या मनात अढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवी! कवी, गीतकार, पटकथा लेखक, कादंबरीकार, गीतरामायणकार अशा विविध रुपात ग.दि. माडगूळकर यांची ओळख मराठी साहित्य क्षेत्रात आहे.

गजानन दिगंबर माडगूळकर यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 रोजी शेटेफळ या गावी झाला. त्यांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले. घरातील आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी सुरुवातीच्या काळात चरितार्थासाठी चित्रपटांच्या कथा-संवाद-गीतलेखानाचे काम केले. त्यातही त्यांची प्रतिभा, सहज सोजे शब्द, भावसंपन्न आणि मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ते श्रेष्ठ ठरले. मराठी गीतनिर्मितीच्या क्षेत्रात गदिमांचे स्थान केवळ अजोड आहे. प्राचीन मराठी काव्यातील गीतभांडाराला अर्वाचीन काळात माडगूळकरांनी अधिक समृद्ध केले.

संतांच्या काव्यातील आंतरिक गेयगुण, पंडितांच्या काव्यातील नादानुप्रास, शाहिरांच्या काव्यातील स्वाभाविक ठसका, लोकगीतांतील प्राथमिक पण सरळ भिडणारा लयताल, शब्दांवरील असामान्य प्रभुत्व आणि त्याचबरोबर समृद्ध आशयघनता यांच्या विलक्षण संमिश्रणातून माडगूळकरांची गीते निर्माण झाली. अध्यात्म, देशभक्ती, बालकविता, श्रृंगार हे सर्व विषय त्यांनी अतिशय सहजतेने हाताळले.

आरंभी ते वि.स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम करत होते. त्यांचे हस्ताक्षर खूप छान होते. तिथे असतानाच त्यांना वाचनाची, लेखनाची गोडी लागली व त्यांनी स्वतःच्या लेखनाला सुरुवात केली.

गदिमांनी सुमारे 145 मराठी चित्रपटांची गीते लिहिली, 80 पटकथा, 44 मराठी चित्रपटांच्या कथा व 76 चित्रपटांचे संवाद लेखन केले. तसेच 23 हिंदी पटकथा, 10 हिंदी चित्रपट कथा, 5 हिंदी चित्रपटांचे संवाद यांचेही लेखन त्यांनी केले. त्यांनी सुमारे 25 (24 मराठी व 1 हिंदी) चित्रपटांत अभिनयही केला.

चित्रपटातील पात्रांच्या भावनांनुसार कथा विषयाला खुलवणारी चित्रपट कथा लिहिण्यात ते सिद्धहस्त होते. गेयता, नादमाधुर्य, लयकारी आणि मराठी भाषेतील गोडवा ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्ये होती. ‘विठ्ठला तू वेडा कुंभार..., एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे..., बाई मी विकत घेतला शाम..., यांसारख्या अनेक गीतांमधून साध्या सोप्या भाषेत ते मोठे तत्त्वज्ञान सांगून जातात.

स्वातंत्र्यापूर्व काळात त्यांच्या लेखणीने लोकांमध्ये प्रेरणा निर्माण केली होती. 1942च्या आंदोलनात सातारा, सांगली भागात प्रतिसरकारचा प्रचार करण्यासाठी त्यांनी पोवाड्यांची निर्मिती केली होती.

‘गीतरामायण’ ही गदिमांची संपूर्ण महाराष्ट्राला दिलेली एक साहित्यिक देणगीच म्हणावी लागेल. त्यांच्या गीतरामायणाने व त्याला दिलेल्या बाबूजींच्या (ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके) संगीताने उभ्या महाराष्ट्राला वेड लावले. गीतरामायणाचे शेकडो प्रयोग झाले. मराठी रसिकांनी गदिमांना प्रेमादरपूर्वक महाराष्ट्राचे ‘आधुनिक वाल्मिकी’ अशी पदवी बहाल केली.

यातूनच त्यांच्या रसिकप्रियतेची खात्री पटते. गीतरामायणाचे पुढील काळात हिंदी, बंगाली, तेलगू व कानडी या भाषांत भाषांतरही झाले.

गदिमांना भारत सरकारने पद्मश्री (1969) हा किताब बहाल केला. ते संगीत नाटक अकादमी व विष्णुदास भावे गौरवपदक या पुरस्कारांचे मानकरी ठरले. 1962 ते 1974 अशी सुमारे 12 वर्षे ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्यही होते.

1973 साली यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. हे आणि असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले, तरी जनमानसहृदयात ते गीतकार व गीतरामायणकार म्हणूनच जास्त प्रसिद्ध झाले.

असा हा अवलिया 14 डिसेंबर 1977 रोजी आपल्या गीतरामायणातून आपणा सर्वांच्या मनामनांत जीवंत राहून देहाने मात्र अनंतात विलीन झाला.

- शहनाझ हेब्बाळकर, उपशिक्षिका

एच.ए. स्कूल, पिंपरी

[email protected]