अहि नकुल

दिंनाक: 23 Feb 2019 13:22:26

 

मला भावलेली कुसुमाग्रजांची ‘अहि नकुल’ ही अजरामर कविता, विविध कल्पना वापरल्याने नेमकेपणाने प्रकट झालेले चलतचित्र म्हणावे कळत नाही. कुसुमाग्रजांच्या कल्पनाविलासांचा अखंड खजिना, त्यांचे शब्दप्रभुत्व लढाईचे वर्णनही एका ठराविक उंचीवरून करून बटबटीतपणा टाळण्यात कुसुमाग्रजांनी मिळवलेले यश नाग व मुंगुस या जन्मजात वैर्‍यांची योजना त्यांचे बाह्य वर्णन आणि या शत्रूंचा स्वभाव हे सारे अत्यंत सुबकपणे समोर येतं आणि या महाकवीच्या प्रतिभेपुढे आपण अचंबित, विस्मित होतो.

आजकाल डिस्कवरी किंवा अन्य वाईल्ड लाईफ दाखवणार्‍या चॅनेल्सवर जी जंगलदृश्ये थ्रिलींग म्हणून आपण सारे पाहतो, त्यांची वारजक्ता आणि एका कवितेतून प्रतीत होणारे हे लढाई दृश्य हा संग्राम यांची अटळपणे तुलना होते. ‘प्रतिकात्मता’ हा प्रमुख गुण दिसून येणारी ‘अहि नकुल’ राजकीय सामाजिक संदर्भही देणारी कविता आहे. साप आणि मुंगूस या दोन सनातन विरोधी प्रवृत्ती आहेत. त्यांच्या शक्तींचा हा संघर्ष आहे. 

ओतीत विखारी वातावरणी आग

हा वळसे घालीत आला मंथर नाग

मधुनीच उभारी फणा, करी फुत्कारा

ये ज्वालामुखीला काय अचानक जाग!

फक्त चार ओळी! पण त्यात एक अख्खं चित्र, पुरा स्वभाव किती सहजपणे प्रतीत होतो! नाग हा सामर्थ्यवान आहे. प्रक्षोभक आहे. त्याचा फूत्कार फणा वळसे घालणं आणि त्याच्या अस्तित्वानेच वातावरण तप्त होणं विखारी होणं! काय शब्दलालित्य! या कडव्यातला मंथर हा एकच शब्द सापाचं चापल्य, सळसळ, तेज, प्रभाव सारे सारे दर्शवितो.

कुसुमाग्रजांच्या काव्यकल्पनेला या कवितेत बहरच आला आहे. सापाला दिलेल्या उपमांमध्ये ‘खडकाचे लवचिक पाते’, ‘वज्र’, ‘गर्भरेशमी पोत’, ‘मादक वस्त्र’, ‘अग्नीचा ओघळ’, ‘कनकाची कट्यार’, ‘मल्हारतान’ अशा एकापेक्षा एक सकस, चपलख कल्पना योजून कुसुमाग्रजांनी बहार उडवून दिली आहे. साप पुढे जाताना आजूबाजूची झाडे, गवत इ. कसे घाबरतात हे सांगताना

मार्गावर याच्या लवत तृणाची पाती

पर्णावर सुमने मोडूनी माना पाडती

थरथरती झुडुपे हादरती नववेली

जग गुलाम सारे या सम्राटापुढती!

अशा वर्णणातून ते या सम्राटाचे दर्शन घडवितात.

हा असा साप त्याच्यासमोर जेव्हा अचानक मुंगुस येते तेव्हा कसा थबकतो, मरणाचा कानोसा कसा घेतो, काही वेळापूर्वी स्वामित्व दाखवणारा हा नाग आता घाबरतो; तेव्हा काही क्षण वाचकालाही त्याची करूणा येते. एखाद्याची सददी काही काळ असते पण शेरास सव्वाशेरही कुणीतरी असतोच! हेच कवीने सूचित केले आहे.

मुंगुस सापावर उडी मारून त्याला घायाळ करते हे वीज, उल्का, पिसे (वेड) अशा प्रतिमांनी हुबेहूब वर्णिले आहे.

पडलीच उडी! की तडितेचा आघात!

उल्केपरी तळपत करण्यात घुसले दात

किंवा

रण काय भयानक - लोळे आग जळत!

आदळती, वळती, आवळती क्रोधात,

आषाढ घनाशी झुंजे वादळवाट!

अशा शब्दांनी सापाची निष्प्रभता मुंगुसाची धिटाई, बळ केवढे समर्पकपणे समोर येते!

वादळात टिकण्यासाठी झुंजणारी वात किती शर्थीने प्रयत्न करत असते तोच प्रयत्न आता सापाला करावा लागतोय, यासारखी उपमा केवळ या ‘ज्ञानपीठ’ कारालाच सुचू जाणे.

संग्राम संपल्यावर तिथे काय उरले असेल, मुंगूस त्वरेने गेले असेल, नंतर त्या जागेकडे कोण आले असतील एवढा मोठा संग्राम झाल्यावर त्या युद्धक्षेत्राची स्थिती काय असेल हे कल्पनेने जाणून घेणे हीच कवीची प्रतिभा!

विच्छिन्न तनूतुनी उपसुनि काढुनि दात

वार्‍यापरी गेला नकुल वनातुनि दुर

असे सांगून नकुलाचा स्वभाव, जेन्याचा उन्मलपणा, रग हे स्पष्टपणे दृश्य होते. शेवटी

संग्राम सरे रक्ताचे ओघळ जाती,

आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती;

पिंजुन कापसापरी पडे तो नाग,

ते खंड गिळाया जमले किटक भोती !

थोड्यावेळापूर्वी सम्राट असलेल्या नागाचे शरीर अक्षरश: कापसासारखे पडले आहे. आणि आजूबाजूच्या आसमंताला चळचळ कापायला लावणारा तो नाग आत्ता शतखंडित झाला व त्याचे लोळागोळा शरीर खायला किडे, कीटक जमले, इतका र्‍हास होऊ शकतो हे वास्तव आपल्या डोळ्यात अंजन घालते!

सत्ता सत्ताधीश, बळी तो कान पिळी या सर्व संकल्पना पत्त्याच्या बंगल्यासारख्या मोडून पडतात आणि कुणी ना कुणी अशांचा हिशेब चुकता करायला असतोच हा आशावादही आपण इथे पाहतो.

संघर्ष, विरोध आणि त्यातून नाट्य अशा पद्धतीने कुसुमाग्रजांच्या प्रतिकात्मक कविता दिसतात. नागाच्या फुत्कारात त्यांना ज्वालामुखीचा उद्रेक जाणवला. त्यांची विशेषणेही खास त्यांची असतात. शतखंडित ऊर, मंथन नाग, कनकाची कट्यार, उल्केपरी तळपणारे दात ही त्यांचीच उदाहरणे आहेत.

- चारूता प्रभुदेसाई, सहशिक्षिका

न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग

[email protected]