एकदा एक शिक्षक एका परिवारात राहणार्‍या युवकाबरोबर फिरायला गेला. त्यांनी रस्त्यात पाहिलं तर एक जोडी बूट काढून कोणीतरी ठेवले होते. बाजूलाच एक शेत होते.

साधारणपणे ते बूट त्या शेतात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍याचे असावेत. तो शेतकरी आपले दिवसभराचे काम संपवून घरी जायच्या तयारीत होता. युवकाला वाटले आपण या शेतकर्‍याची गंमत करू. तो म्हणाला, ‘गुरुजी आपण हे बूट कुठे तरी लपवू या आणि बाजूच्या झाडीत लपून बसू या. शेतकरी आपले बूट नाहीत हे पाहून घाबरेल तेव्हा खूप मजा येईल.

शिक्षक गंभीर होऊन बोलले, ‘एखाद्या गरीब माणसाची अशी गंमत करू नये. त्यापेक्षा आपण या बुटामध्ये काही सिक्के ठेवू आणि लपून बघू या की शेतकरी काय करतो.

शेतकरी लवकरच आपले काम संपवून आपल्या बूटाजवळ आला. त्याने पाय बुटात टाकताच त्याच्या पायाला कठीण असा भास झाला. त्याने बूट हातात घेतला आणि पाहिले तर बुटात काही सिक्के होते. त्याला खूप आश्‍चर्य वाटले. त्याने ते सिक्के हातात घेऊन आलटून-पालटून पाहिले. शेतकरी इकडे-तिकडे पाहू लागला. दूर दूरपर्यंत कोणी दिसत नव्हते. मग त्याने ते सिक्के आपल्या खिशात घातले. आता त्याने दुसरा बूट उचलला, त्यामध्ये पण सिक्के होते... शेतकरी भावूक झाला. त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू जमा झाले, त्याने आपले हात जोडले आणि वर नभाकडे पाहून म्हणाला, ‘हे भगवंता माझ्या वेळेवर मला मदत करणार्‍या त्या अनोळखी व्यक्तीला माझा लाख-लाख धन्यवाद, त्याची मदत आणि त्याचा तो दयाळूपणा यामुळेच आज माझ्या आजारी बायकोला औषधे आणि माझ्या भुकेल्या मुलाला जेवण मिळू शकेल.’

शेतकर्‍याचे ते बोलणे ऐकून युवकाचे डोळे भरून आले. यावर शिक्षक युवकाला म्हणाला, ‘तू शेतकर्‍याची गंमत करण्यापेक्षा आपण त्याच्या बुटात सिक्के ठेऊन त्याला जी मदत केली याचा तुला आनंद नाही झाला का?’ यावर युवक म्हणाला, ‘आज तुम्ही मला जो धडा शिकवला, तो मी माझ्या जीवनात कधीच विसरणार नाही.

मित्रांनो, खरंच एखाद्याला काहीतरी देणे यामध्ये जे सुख आहे ते इतर कोणत्याच गोष्टीत नाही! या गोष्टीतून बोध घेतला पाहिजे की, आपल्या-आपल्या क्षमतेनुसार काहीतरी दान केले पाहिजे आणि ज्याला मदतीची गरज आहे, अशा गरजवंतासाठी जीवनामध्ये सतत मदतीचा हात पुढे केला पाहिजे.

- मनीषा भिसे, शिक्षिका

एच.ए. स्कूल, पिंपरी

[email protected]