तितक्यात तिकडून एक मगर आली. तिने माकडाला पाहिलं आणि उडत उडत झाडावर गेली... माझा मुलगा अन्वय मला उडणार्‍या मगरीची गोष्ट सांगत होता. त्याच वेळी त्याला दिसणारा शर्ट लटकवलेला हँगर, त्याच्या ताटातला पापड, जवळच पडलेली उशी, अशा गोष्टी मगरीच्या गोष्टीत जोडल्या जात होत्या. ती जगावेगळी गोष्ट ऐकताना मला परत एकदा, अन्वय मराठी माध्यमात शिकतोय याचा आनंद झाला.

आपण मुलांना का शाळेत घालतो, कुठल्या शाळेत घालतो, शाळेचे माध्यम कोणते हवे, आपल्याला आपल्या मुलाकडून नेमके काय अपेक्षित आहे....याचा गंभीरपणे विचार झाला पाहिजे. पण दुर्दैवाने आजकाल आजूबाजूला पहिले की मला प्रामुख्याने दिसते की, पालकांच्या मनातली भीती. बाकी सगळे जे करतायेत तसंच शक्यतो करायचं. आपलं मूल अजिबात कशात पण मागे राहायला नको. इंग्रजीमध्ये तर नकोच नको कारण उद्या पुढच्या शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी त्याला फक्त इंग्रजी तारणार आहे. आपल्याला नीट इंग्रजी न आल्याने आपण मागे पडलो तसंच आपल्या मुलांच्या बाबतीत घडायला नको असंही खूप जणांना वाटतं. काही पालकांची भीती अजून वेगळी असते. आजच्या काळात मराठी माध्यमात मध्यमवर्गातली मुलं पण जात नाहीत. वस्तीत राहणारी, इंग्रजी शाळेची फी न परवडल्याने मराठी शाळेत आलेली- अशा खालच्या वर्गातल्या मुलांसोबत आपला मुलगा/मुलगी बिघडले तर? त्यांची भाषा, त्यांच्या सवयी यावर वाईट संस्कार झाले तर....

आपण आता एकेका प्रश्नाकडे बघू. आपले मूल इतरांपेक्षा मागे राहायला नको. असा विचार करतानाच आपण फक्त यांच्या भविष्याकडे लक्ष देत असतो आणि मुलाचे बालपण नकळत नजरेआड करत असतो. मुलाला स्पर्धेच्या दिशेने ढकलत असतो. हे अनेक पालकांच्या लक्षात येत नाही. आत्ता जगात इंग्रजीची चलती आहे म्हणून त्याने इंग्रजी माध्यमात शिकावं. त्याचं इंग्रजी चांगलं असलं पाहिजे असं त्यांना वाटतं. पण मूल मोठं होईपर्यंत अजून वेगळीच गरज निर्माण झाली तर? म्हणूनच मागणी तसा पुरवठा हा विचार सोडून आपल्याला मुलाच्या दृष्टीने पाहायला शिकावं लागेल. आत्ता जगात काय चालत पेक्षा आपल्या मुलाला कुठल्या भाषेत शिकणं सोपं जाईल? कशात त्याला शिक्षणाचा आनंद घेता येईल? मूल कुठल्या भाषेत स्वतःहून शिकण्याचा प्रयत्न करू शकेल? हा मूलभूत विचार व्हायला हवा.

मूल जी भाषा समजू लागल्यापासून ऐकतेय. त्यात संवाद साधायला शिकतेय. त्या भाषेत मुलाला शिकू देणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. मुलं ज्यावेळी नवीन संकल्पना शिकतात तेव्हा त्यांना महिती असलेली भाषा ही त्या शिकण्याला नेहमीच पूरक ठरते. मात्र जेव्हा मूल परिसर भाषा आणि मातृभाषेतून शिक्षण न देणार्‍या शाळेत जातं तेव्हा त्याला संकल्पना आणि ती समजून घेण्याची भाषा आणि मातृभाषेतून शिक्षण न देणार्‍या शाळेत जातं तेव्हा त्याला संकल्पना आणि ती समजून घेण्याची भाषा दोन्ही नवीन असतात. एकाचवेळी दोन गोष्टी शिकण्याचं ओझं अगदी लहान वयापासूनच या मुलांवर लादलं जातं. पालक म्हणून स्वतःला असलेला इंग्रजीचा न्यूनगंड भरून काढायला मग मुलाचा अशाप्रकारे वापर केला जातो. इंग्रजी माध्यमाला विरोध म्हणजे इंग्रजीत भाषेला विरोध नाही. हा विचार समजून घेतला जात नाही. मराठी माध्यमात मुलाला घालून, त्याचं इंग्रजी चांगलं होण्यासाठी आपण विशेष प्रयत्न नक्कीच करू शकतो. आता काळ बदललाय हे इतरवेळी मान्य करणारे पालक....मुलाला शाळेत घालायची वेळ आली की मात्र आपली शाळा आणि मी कसा इंग्रजीमुळे मागे राहिलो तेच आता माझ्या मुलाचं व्हायला नको असा विचार करतात तेव्हा वाईट वाटतं. एकप्रकारे हेच पालक आपल्या मुलाची अभिव्यक्ती मर्यादित करत असतात. त्यांच्या सहज शिकण्याला कुंपण घालत असतात. मोठेपणी दिसणारे याचे सर्वसाधारण परिणाम म्हणजे - मुलांना एकही भाषा धड न बोलता येणे, वाचन करण्याबाबत निरुत्साह, स्वतःचा विचार करून तो नेमक्या शब्दात मांडायला कठीण जाणे; या माझ्या निरीक्षणाला अपवाद असणारी मुले ही नक्कीच असतील पण सर्वसाधारण काय चित्र दिसते ते मांडायचा मी प्रयत्न करत आहे.

मराठी शाळेत घातलं तर तिथे शिकणार्‍या, वस्तीत राहणार्‍या मुलांच्या संगतीत माझे मूल बिघडेल. अशुद्ध भाषा बोलेल. असं वाटणार्‍या पालकांच्या भाबडेपणाचं मला हसू येत आणि कीव ही येते. मुलाला बिघडवण्याच्या संधी प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असतात पण बोट दाखवलं जातं ते मात्र गरीब मुलांना सामावून घेणार्‍या शाळांकडे. यानिमित्ताने आपला मुलगा/मुलगी - समाजाच्या सगळ्या स्तरातल्या मुलांमध्ये मिसळायला शिकेल. त्याला समाजातील वास्तव पाहता येईल. ही सकारात्मक बाजू कोणीच विचारात घेत नाही. मुलाला सगळ्या गोष्टी लगेच देणारं, सतत जपणारं वातावरण देण्यापेक्षा, त्याला त्याचे अनुभव घेण्यास मोकळा सोडणं हे ही एक प्रकारचं शिक्षणच आहे. भाषेबद्दल ही पालकांना फार आक्षेप असतो. प्रमाण भाषा आणि बोली भाषा हे प्रकार आहेत. त्यात शुद्ध- अशुद्ध हा भेदभाव करणं, प्रमाण भाषा न बोलणार्‍या लोकांकडे तुच्छतेने पाहायची सवय अजून सुटलेली नाही. आपण मुलांच्या चांगल्या वाईट वागण्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही हेच फक्त यातून लक्षात येतं.

पालक म्हणून आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं? असं मला विचाराल तर माझं उत्तर आहे मुलांना आनंदी बालपण देण्याचं. त्यांना समजेल शिकायला मजा येईल अशा भाषेत आणि शाळेत शिकण्याचं स्वातंत्र्य त्यांना असायला. हेच टाळून जर आपण त्यांच्यावर अनोळखी भाषेच्या अभ्यासाचं ओझं लादणार असू, परक्या भाषेची कुंपण घालून त्यांची अभिव्यक्ती छाटणार असू त्यांना माणूस म्हणून जगायला न शिकवता पैसे कमावण्यासाठी तयार करणार असू तर आपण एका आनंदी बालपणाची शक्यताच खुडून काढतोय ! इतकंच मी म्हणेन.

 - सई तांबे 

[email protected]