मित्रांनो, मागील लेखात आतापर्यंत आपण, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामधील शीत युद्धाच्या दरम्यान सुरू झालेली अवकाश स्पर्धा आणि चंद्रावरील मानवाचे शेवटचे पाऊल म्हणजेच अपोलो 17 ही मोहीम इथवर अवकाश स्पर्धेचा इतिहास पहिला. हीच अवकाश स्पर्धा पुढे कशी गेली आणि 1970 ते साधारण 1985च्या काळापर्यंत या अवकाशातील मोहिमांनी कसा वेग घेतला ते पाहू.


    साधारण अपोलो 17 नंतर म्हणजेच 1972च्या सुमाराला साधारण 1970मध्ये रशियाने आपले लक्ष सूर्यमालेमधील इतर ग्रहांवर केंद्रित केले आणि त्यांनी त्यांची व्हेनेरा ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेतील व्हेनेरा 7 हे पृथ्वी सोडून इतर ग्रहावर उतरलेले पहिलेच यान ठरले. व्हेनेरा 7 हे यान रशियाने शुक्र ग्रहावर यशस्वी रीतीने उतरवून इतिहास रचला. हे यान उतरत असतानाच याचे पॅरॅश्युट अपयशी झाले आणि तरीसुद्धा हे यान एका बाजूला आपटले आणि शुक्राच्या जमिनीवर उतरले. त्याने साधारण 53 मिनिटे पृथ्वीवर संदेश पाठवले आणि नंतर ते यान शुक्रावरील प्रचंड उष्णतेमुळे नष्ट झाले. परंतु त्याने पाठवलेल्या माहितीच्या आधारे हे स्पष्ट झाले की शुक्रवार तापमान हे 425 डिग्री इतके जास्त असून वातावरणात 95 टक्के कार्बन डाय ऑक्साइड आहे आणि प्रचंड तापमान असल्याने तिथे कोणतेच द्रव आढळून आले नाही.
      त्यानंतर 1971-72 मध्ये रशियाने पहिली अवकाश स्थानक म्हणजेच स्पेस स्टेशन सॅल्युट-1 अवकाशात पाठवले आणि त्याचप्रमाणे पहिली मानवासहित प्रयोगशाळा ओरायन-1 सुद्धा अवकाशात पाठवली. याच्यामुळे 1900 च्या सुरुवातीला अनेक लेखकांनी त्यांच्या कादंबर्‍या आणि पुस्तकांच्यामधूर अवकाशातील प्रयोगशाळा आणि त्याविषयी केलेली काल्पनिक वर्णने एका अर्थी खरी ठरली. यानंतर अमेरिकेने आपले लक्ष मंगळाकडे वळवले. आधीच्या अनेक मोहिमांमध्ये असे आढळून आले होते, की मंगळ हा पृथ्वी सदृश्य असून तिथे भविष्यात मानवी वसाहत उभी करता येऊ शकेल. त्यामुळेच मंगळाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेने ‘मरिनर’ ही यानांची मोहीम मंगळावर पाठवण्याची तयारी केली. या सर्व मोहिमांपैकी ‘मरिनर 9’ हे यान प्रथमच मंगळाभोवतीच्या कक्षेत ठेवण्यात अमेरिकेने यश प्राप्त केले. त्यानंतर या यानाने मंगळाची अनेक छायाचित्रे आणि इतर माहिती पृथ्वीवर पाठवली. या मरिनर मोहिमेच्या दरम्यानच रशियासुद्धा या स्पर्धेत मागे नव्हती. त्यांनी मंगळासाठी आपली ‘मार्स’ ही यानांची शृंखला 1971-77 च्या दरम्यान पाठवली. आपण इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की अमेरिका आणि रशिया यांनी आजवर अनेक मोहिमा मंगळावर पाठवल्या आणि त्यानंतर त्यांना मंगळाच्या कक्षेत यान नेऊन ठेवण्यात यश आले. परंतु भारत हा एकमेव देश असा आहे, की त्याने आपल्या पहिल्याच प्रयत्नात ‘मंगलयान-1’ हे यश प्राप्त केलेले आहे, ज्या गोष्टीचा सर्वच भारतीयांना नक्कीच गर्व असला पाहिजे.
       याच दशकात एक अनोखी घटना घडणार आहे, असे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. ती ग्रहांना म्हणजे सूर्यमालेमधील गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे ग्रह साधारण एका रेषेत येणार होते. त्यामुळे मग एका शास्त्रज्ञांच्या बैठकीत एक निर्णय घेतला गेला की दोन याने ही या सरळ रेषेत आलेल्या ग्रहांच्या दिशेने पाठवण्यात यावीत जेणेकरून या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा गोफणीसारखा उपयोग करून, ही याने जास्तीत जास्त दूर जाऊन माहिती गोळा करू शकतील. कारण अशी ग्रहांची स्थिती साधारण 175 वर्षांनी पुन्हा येईल त्यामुळे ही संधी सोडली तर मग पुन्हा इतके वर्ष वाट पाहावी लागणार होती. त्यामुळे मग शास्त्रज्ञांनी ‘व्हॉयेजर-1 आणि 2 अशी याने तयार केली आणि 1977 च्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ही याने अवकाशात पाठवण्यात आली. या यानांची गंमत म्हणजे यावर त्या वेळी एक सोनेरी रंगाची तबकडी होती ज्यात पृथ्वीवरील अनेक आवाज, निसर्ग चित्र आणि विविध भाषांमधील गाणी रेकॉर्ड करून मुद्रित करण्यात आलेली होती आणि हे यान कोणत्या ग्रहावरून आलेले आहे त्याचा एक नकाशा देखील होता. या मागचा उद्देश हा होता की, जर हे यान भविष्यात परग्रही लोकांना सापडले तर त्यांना कळावे हे यान कुठून आलेले आहे आणि त्यांना आपल्याशी संपर्क साधता यावा. या तबकडीमधील गंमत म्हणजे आपल्या मराठीमधील एक गाणेसुद्धा आरती पंडित यांच्या आवाजात रेकॉर्ड करून आणि एक संदेश (नमस्कार. या पृथ्वीतील लोक तुम्हाला त्यांचे शुभविचार पाठवतात आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही या जन्मी धन्य व्हा.) मुद्रित केलेला आहे. या यानाचे आयुष्यमान साधारण 7-8 वर्षे इतके ठरवण्यात आले होते, परंतु आज 41 वर्षे होऊनसुद्धा हे यान अजून व्यवस्थित काम करते आहे. यातून आपण एखाद्या मोहिमेचे नियोजन आणि त्यासाठी घेतलेली मेहनत नक्कीच शिकली पाहिजे. व्हॉयेजर या यानांनी पृथ्वीवर गुरू, शनी, शनीची कडी, युरेनस, नेपच्यून, गुरू आणि शनी यांचे उपग्रह यांची अकल्पित अशी छायाचित्रे आणि माहिती पृथ्वीवर पाठवली. गेल्याच काही दिवसांमधील बातमीप्रमाणे हे यान आता आपल्या सूर्यमालेच्या पलीकडे जाऊन पोहोचलेले आहे आणि या मोहिमेच्या मुख्य असलेल्यांनी अजून 10 वर्ष म्हणजे एकूण 50 वर्ष हे यान यशस्वी रीतीने चालवण्याचा त्यांचा मानस आहे. तर मित्रांनो, या 1970च्या दशकात अनेक चमत्कारच मानवाने सत्यात उतरवून दाखवले. पुढील लेखात अशाच मोहिमांची सफर करूयात तोपर्यंत या यानांची माहिती मिळावा आणि एखादा तक्ता किंवा छोटासा माहितीपट तयार करा. भेटू पुढील लेखात!

अक्षय भिडे

[email protected]