फजिती

दिंनाक: 20 Feb 2019 18:41:36


एक होता ससा

आणि एक होता मासा

ससा पडला पाण्यात

आणि मासा हरवला जंगलात

ससा गटांगळ्या खाऊ लागला

मासा घाबरा-घुबरा झाला

ससा म्हणाला अरे बापरे

हाव दुसर्‍याची नको रे

मासा घाबरला खूप

कशाला हवे दुसरे रूप

उगीच केला सशाचा हेवा

मला परत पाण्यात ठेव रे देवा

ससा म्हणाला गेले, मेलो, आता

पाण्याबाहेर काढता का कुणी जाता जाता

तिकडून आली माकडे

हातात घेऊन लाकडे

दोघांची गंमत पाहून भारी हसू लागले

मित्रांची फजिती पाहून मदतीला धावले

सशाला उचलून अलगद गवतात ठेवले

माशाला पाण्यात तरंगायला लावले

ससा-मासा झाले खूश

माकडांनी केले एकदम हुश्श!

- सुनिता वांजळे