भव्य दिव्य रंगमंचावर, दोन तीन गुरु व एक महागुरू विशेष पाहुण्यांना बोलावतात. आता निकाल जाहीर करू या का? अशी मोठ्या अदबीने त्यांची परवानगी घेतात. एक बंद लिफाफा पाहुण्यांच्या हातात सोपवला जातो.

जुन्या काळी पोस्टमन तार घेऊन आल्यावर जसे वातावरण ताणलेल्या उत्सुकतेमुळे तणावपूर्ण व्हायचे, अगदी तशाच वातावरणात, काळजाचे पाणी पाणी व्हावे, अशा पार्श्वसंगीताच्या पार्श्वभूमीवर लिफाफा उघडतो आणि...

एका महागायकाचा किंवा महाकलाकाराचा जन्म होतो. त्या कलाकाराच्या, त्याच्या फॅन्सच्या आनंदाला उधाण येते. जीव तोडून केलेली मेहनत सार्थकी लागते. बक्षिसांचा, प्रसिद्धीचा व कौतुकाचा शब्दशः वर्षाव होतो. रिऍलिटी शोचे अजून एक पर्व संपते.

हे पर्व संपले म्हणजे त्या पर्वात सादर झालेल्या कलेचा, कलाकाराचा प्रवास थांबतो का ? जवळपास प्रत्येक वाहिनीवर वेगवेळ्या रिऍलिटी शोमधून महिन्याला किमान दोन ते तीन महाकलाकार व शेकडो स्पर्धक लोकांपुढे येतात; पण त्याचा पुढे जायला किती उपयोग होतो, हे समजून घेणे खूपच महत्त्वाचे आहे.

रिऍलिटी शोमध्ये लहान मुलांनी भाग घ्यावा की न घ्यावा, याचे स्वातंत्र्य त्या स्पर्धकांना असेल, तर अशा स्पर्धा त्यांना कला सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ म्हणून नक्कीच मदत  करू शकतात. रिऍलिटी शोमध्ये मिळालेले यश हेच एकमेव व अंतिम ध्येय न ठेवता स्वत:च्या मर्जीने मुलांना सहभागी होण्याची मुभा आपल्याला देता आली पाहिजे.

खरे तर गायन, नृत्य किंवा अभिनय या कला आत्मसात करण्यासाठी प्रचंड सराव व स्वतःमध्ये असलेल्या नैसर्गिक अभिव्यक्तीची जोड देणे आवश्यक असते. शाळेत जसे दर वर्षी नवीन इयत्ता पार करण्याची सोय असते, तशी कलेच्या क्षेत्रात नसते. कलेच्या प्रांतात शिकलेल्या प्रत्येक गोष्टीचा अत्यंत कसोशीने सराव करावा लागतो. व कितीही वेळ लागला तरी ती गोष्ट शंभर टक्के आत्मसात करूनच पुढे जावे लागते.

कला हे व्यक्त होण्याचे एक साधन आहे. बहुतेक रिऍलिटी शोमध्ये आधीच कुणीतरी सादर केलेल्या कलेला हुबेहुबपणे सादर करणे म्हणजेच कलेची अत्युच्च पातळी मानली जाते. दुर्दैवाने त्यामुळे मुलांच्या कलेच्या माध्यमातून त्यांची अभिव्यक्ती, कल्पकता व्यक्त करण्याची संधीच मिळत नाही. रिअॅलिटी शोमध्ये आलेल्या स्पर्धकांना हुबेहूब नक्कल करण्याऐवजी हे गाणे तुम्ही कसे गायले असते ? हे नृत्य तुम्ही कसे केले असते ? असे पर्याय समोर ठेऊन तीच कलाकृती वेगळ्या प्रकारे सादर करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.

सतत दुसऱ्याची कला सादर करून वाहवा मिळवायची सवय झाली, तर मग स्वतःची कौशल्ये, कल्पकता कशी विकसित होणार ? कलेच्या माध्यमातून स्वतःला लोकांपुढे मांडायचे सोडून किती दिवस आपण लता मंगेशकर, अमिताभ बच्चन व गोविंदा म्हणून लोकांपुढे येणार ?

रिऍलिटी शोमध्ये सादर करण्यासाठी शिकलेली कला केवला बक्षिसातून मिळणारा आनंद व पराभवातून आलेली निराशाच देऊ शकेल, मात्र जर तुम्ही स्वतःला अजून चांगल्या प्रकारे व्यक्त होण्यासाठी कला शिकायला सुरुवात केली, तर प्रत्येक वेळी ती कला सादर करताना, तुम्ही तल्लीन होऊन स्वर्ग सुख अनुभवत प्रेक्षकांनाही स्वर्गीय आनंद देऊ शकाल.

थोडक्यात काय तर रिऍलिटी शोमध्ये बिनधास्त जा, पण ते शोज म्हणजेच तुमचे अंतिम ध्येय नसून, त्या ध्येयाच्या प्रवासातील एक स्टेशन आहे, एवढे मात्र जरूर लक्षात असू द्या!  

- चेतन एरंडे

[email protected]