देशाच्या रक्षणाची भिस्त असणार्‍या संरक्षणादलाविषयी सामान्य लोकांना कायम आर्कषण असते. त्यामुळे संरक्षण दलात करिअर करणे अनेक तरुण-तरुणींचे स्वप्न असते. पण योग्य वयात या करिअर संधींची माहिती न मिळाल्याने कित्येकांचे ते फक्त स्वप्नच राहते. योग्य वयातच करिअरचा विचार केला तर संरक्षण दलात करिअर करणे सहज शक्य होते. आठवी-नववीत असतानाच विद्यार्थ्यांनी या क्षेत्रांतील करिअरचा विचार जरूर करावा. म्हणजे त्याप्रमाणे योग्यवेळी पाऊल उचलता येते. इयत्ता दहावी व बारावीत असताना  संरक्षणदलातील संधीविषयी माहिती देणारा लेख.

एन.डी.ए.मध्ये जावायचे मनात असल्यास सर्वांत पहिले नाव समोर येते ते म्हणजे एस.पी.आय.-औरंगाबाद सर्विसेसे प्रिपेरेटरी इंस्टीट्यूट म्हणजेच सेवापूर्व शिक्षण संस्था

एस.पी.आय. - औरंगाबाद  : दहावीत शिकत असलेली तरुण मुले अर्ज करण्यास पात्र असतात. मुली अर्ज करण्यास पात्र नाहीत. प्रवेश अकरावीसाठी असतो. अर्ज सर्वसाधरणपणे  फेब्रुवारी 15 तारखेच्या आत करावा. ऑनलाईन अर्ज करता येतो. त्यांच्या संकेतस्थाळावर प्रवेशाविषयी पूर्ण माहिती उपलब्ध आहे. साधारण एप्रिल महिन्यात प्रवेश परीक्षा घेण्यात येते आणि या परीक्षेत क्वालीफाय झालेल्या मुलांना एका मुलाखतीस सामोरे जावे लागते. संपूर्ण महाराष्ट्रातून अकरावीसाठी फक्त 60 मुलांची निवड करण्यात येते. येथे अकरावी, बारावीच्या शिक्षणाबरोबर यू.पी.एस.सी. (एन.डी.ए.) परीक्षेची तयारी करून घेतली जाते. तसेच शारीरिक, मानसिकदृष्ट्या सदृढ केले जाते. एस.एस.बी. मुलाखतीची तयारीदेखील घेतली जाते. एन.डी.ए.मध्ये प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने हा एक उत्तम पर्याय आहे.

बारावीनंतर संरक्षण दलांत करिअर करण्यासाठी चार एन्ट्रीज आहेत. 1) एन.डी.ए. अँन्ड एन.ए. एक्जाम, 2) 10+2 टी.ई.एस. (एन्ट्री सी.एफ), 3) 10+2 कॅडेट बी.टेक एन्ट्री आणि 4) ए.एफ.एम.सी.

एन.डी.ए अँन्ड एन.ए. परीक्षा : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यू.पी.एस.सी) घेण्यात येणारी ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यात येते. ही परीक्षा एप्रिल आणि नोव्हेंबर या महिन्यात घेतली जाते. बारावीत शिकत असलेले तरूण अथवा बारावी पास झालेले तरुण ही परीक्षा देऊ शकतात. एन.डी.ए. किंवा नेव्हल अ‍ॅकडमीमध्ये प्रवेश घेतेवेळी तरुण बारावी पास असणे गरजेचे असते व त्याचे वय साडे एकोणीस वर्षाच्या आत असणे जरुरी आहे. ही परीक्षा फक्त मुले देऊ शकतात. मुली ही परीक्षा देऊ शकत नाहीत. बारावीतील कोणत्याही शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थी एन.डी.ए.च्या आर्मी विंग प्रवेशाकरिता पात्र असतो. मात्र एन.डी.एच्या नेव्ही आणि एअरफोर्स विंगच्या प्रवेशाकरीता मात्र बारावी शास्त्र शाखा आणि त्यात भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय असणे आवश्यक आहे. यू.पी.एस.सी.च्या वेबसाईटवर अधिक माहिती मिळू शकते.

आर्मी टेक्निकल एन्ट्री स्कीम : आर्मीमध्ये अभियांत्रिकी प्रशिक्षण घेऊन अधिकारी होण्याचा हा मार्ग आहे. अर्ज करण्यासाठी वय वर्षे साडे एकोणीसच्या आत असावे. तसेच इयत्ता बारावीला पी.सी.एम ग्रुपमध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) 70% हून अधिक गुण असणे आवश्यक आहे. वर्षातून दोन वेळा अर्ज करण्याची संधी असते.ुुु.क्षेळपळपवळरपरीाू.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर अर्ज करण्याविषयी अधिक माहिती मिळू शकेल. या प्रवेशाद्वारे फक्त मुले अर्ज करू शकतात. या प्रवेशाअंतर्गत निवड झालेले तरुणांना गया (बिहार) येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी येथे एक वर्ष सैनिकी प्रशिक्षण देण्यात देते व त्यानंतर आर्मीच्या पुणे, सिकंदराबाद किंवा महू (इंदोर) येथे असलेल्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे चार वर्षे प्रशिक्षण देण्यात येते.

नेव्ही बी.टेक एन्ट्री : भारतीय नौदलात (इंडीयन नेव्ही) अभियांत्रिकी प्रशिक्षण घेऊन अधिकारी बनण्याचा हा एक उत्तम मार्ग यासाठी बारावी परीक्षेत पी.सी.एम. ग्रुपमध्ये 70% हून आधिक गुण असणे आवश्यक आहे.  प्रवेशाकरिता जे.ई.ई. ही परीक्षा घेतली जाते. जे.ई.ई.मेन्स परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर प्रवेश दिले जातात. ुुु.क्षेळपळपवळरपपर्रीूं.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर अधिक माहिती मिळू शकते. या एन्ट्रीद्वारे निवड झालेल्या अभियांत्रिकीचे शिक्षण देण्यात येते.

आर्म्ड फोर्सेस मेडीकल कॉलेज (ए.एफ.एम.सी) : ए.एफ.एम.सी हे संरक्षण दलांतील मेडीकल कॉलेज येथे प्रवेशाकरिता नीट (एन.ई.ई.टी.) ही परीक्षा देणे गरजेचे असून मुले व मुली प्रवेशाकरिता अर्ज करू शकतात. नीट परीक्षेचा अर्ज भरताना येणार्‍या प्रश्‍नावलीमध्ये ए.एफ.एम.सी प्रवेशाविषयी देखील विचारणा होते. तेथे आपण ‘होय’ पर्याय निवडावा. ए.एफ.एम.सी.चा स्वतंत्र अर्ज भरणे आवश्यक आहे. या प्रवेशाअंतर्गत निवड झालेल्या तरुण-तरुणींना वैद्यकीय शिक्षण पुण्यातील आर्म्ड फोर्सस मेडिकल कॉलेजमध्ये देण्यात येते. ते यशस्वीपणे संपवल्यानंतर ते अधिकारी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये मेडीकल ऑफिसर म्हणून कार्यरत होतात. या प्रवेशाकरिता बारावीमध्ये पी.सी.बी. ग्रुप आवश्यक आहे, बारावीमध्ये असतानाच प्रवेशासाठी अर्ज करता येतो.

इतर संधी : वरील मार्ग स्वीकारल्यानंतर यश न आल्यास हार मानू नका. कारण पदवी परीक्षा देताना किंवा पदवी मिळाल्यानंतर देखील भारतीय सशस्त्र दलांत करिअर करण्यासाठी मार्ग खुले आहेत. आर्मीमध्ये प्रवेश करण्यासाठी पुरुष व महिला अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच या परीक्षेद्वारे पुरुष नेव्ही आणि एअरफोर्समध्ये देखील प्रवेश करू शकतात. या व्यतिरिक्त एअरफोर्स प्रवेश करण्यासाठी ए.एफ.सी.ए.टी (अ‍ॅफकॅट) एअरफोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट, जी पुरुष आणि महिलांना एअरफोर्सच्या तीनही ब्रॅचेसमध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने खुले आहेत. भारतीय नौदलांत देखील पदवी परीक्षेनंतर प्रवेश करण्याचे अनेक मार्ग आहेत. भारतीय नौदलांच्या संकेतस्थळावर नियमितपणे वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांसदर्भात येणार्‍या सूचना पाहून अर्ज करणे महत्त्वाचे ठरते.

भारतीय सशस्त्र दलांत करिअर करावयाचे असेल, तर तयारी ही तेवढीच महत्त्वाची बाब आहे. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इंग्रजी व्याकरण, वाक्यरचना आणि संभाषण कौशल्य हे व्यवस्थित येण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्न  करण्याची गरज आहे. तसेच वृत्तपत्र वाचन ही एक महत्त्वाची बाब आहे. जेणेकरून देशातील तसेच परदेशातील घडामोडी विषयी ज्ञान होत राहील. सशस्त्र दलांविषयी माहिती जाणून घेणे आणि त्याचे ज्ञान असणे देखील महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच व्यक्तिमत्व विकास करणे गरजेचे आहे. हा विकास आयुष्यभर चालूच असतो; पण त्यासाठी थोडा प्रयत्न करायला पाहिजे. व्यक्तिमत्व विकासचा एक-दोन महिन्यांच्या कोर्सचा उपयोग होऊ शकतो. त्याकरिता दहावी-बारावीच्या परीक्षेनंतर सुटीचा वापर करण्यास हरकत नाही.

- ले. कर्नल प्रदीप ब्राम्हणकर (निवृत्त)

[email protected]