‘क्षण क्षण शिक्षण’ आणि ‘हम चरित्र निर्माण न भुले’ ही पुस्तके वाचकांच्या भेटीस सज्ज.

लेखिका मानसी वैशंपायन लिखित 'क्षण क्षण शिक्षण' आणि 'हम चरित्र निर्माण न भुले : विवेकी पालकत्व' या दोन पुस्तकांचे प्रकाशन दिनांक १७ फेब्रुवारी २०१९ रोजी, सायंकाळी ५.०० वाजता, तथास्तु सभागृह, पनवेल येथे झाले. या वेळी अर्चना ढेकणे, डॉ. विजया वाड, शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर आणि मानसी वैशंपायन उपस्थित होत्या. ही दोनही पुस्तके हिंदुस्थान प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहेत. ‘क्षण क्षण शिक्षण’ हे पुस्तक खास शिक्षकांसाठी असून, पालकांसाठी ‘हम चरित्र निर्माण न भुले : विवेकी पालकत्व’ हे पुस्तक आहे. दोन्ही पुस्तकांची पालकांना आणि शिक्षकांना, पाल्य आणि विद्यार्थ्यांना समजून घ्यायला मदत होणार आहे.

“प्रकाशनापूर्वी प्राथमिक वाचन करताना लेख वाचून पुन्हा एकदा शिक्षक व्हावेसे वाटले होते,” असे मत ‘शिक्षणविवेक’च्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी या वेळी व्यक्त केले. पुढे त्या म्हणाल्या, “लेखांमधून  तत्त्वज्ञान तर मिळतेच, पण त्याला एक आध्यात्मिक बैठकदेखील आहे. सर्व लेखांतून पालकांना छान डोळस मार्गदर्शन केले आहे. प्रकाशक म्हणून मला या पुस्तक प्रकाशनाबाबत विशेष आनंद होत आहे. ही दोन्ही पुस्तके पालक व शिक्षक या शिक्षणक्षेत्राच्या महत्त्वाच्या घटकांमध्ये नवविचार आणतील असा विश्वास वाटतो.

मा. अर्चना ढेकणे या वेळी बोलताना म्हणाल्या, “पुस्तकांची भाषा अगदी रसाळ व ओघवती आहे. शब्दांना स्वानुभवाची बैठक आहे. प्रत्येक लेखातून मानसी भेटत जाते. तिचा अनुभव, तिचे निरीक्षण कौशल्य, तरल मनाने टिपलेले क्षण डोळ्यासमोर अगदी जसेच्या तसे उभे राहतात."
“वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आपण प्रयत्नशील असायला हवं”, असे मत  मा. विजया वाड यांनी व्यक्त केले. “तंत्रज्ञानाच्या आभासी दुनियेपेक्षा वाचन मुलांना अधिक आनंद देईल. आपण एखादी कथा अर्धवट वाचून दाखवून उत्कंठा ताणावी, म्हणजे उर्वरित गोष्ट वाचण्यासाठी मुले पुस्तक हातात घेतील. मानसी वैशंपायन यांनी आपल्या पुस्तकांमधून विवेकी पालकत्वासाठी खूप छान मार्गदर्शन केले आहे. लहान वयात चांगले विचार चटकन रूजतात", असेही त्या म्हणाल्या.

-       प्रतिनिधी, शिक्षणविवेक

[email protected]