भेळ घ्या भेळ

दिंनाक: 18 Feb 2019 14:01:58


“मग मी एवढं केलं, तर तू मला संध्याकाळी घेऊन जाशील?’’ छोट्याशा ‘बंबू’ने सवाल केला. 

“अगं, पण मी घरी करते ना!”

“नाही मला तिथलीच हवी!’’ 

“बरं बाई, नेईन.” आता आणखीन वेळ घालवणं बरं नाही म्हणून शेवटी बिचाऱ्या आईला नाईलाजाने हा सौदा मान्य करावा लागला. “पण आधी हा सगळा अभ्यास पूर्ण कर.” खरं तर ही अशी सौदेबाजी चुकीची आहे, हे तिला माहित होतं, पण...

पण चूक तिचीच होती असं सारखं तिला वाटत होतं...

त्याचं असं झालं होतं की, एक दिवस ही आमची छोटीशी ‘बंबू’...हो बंबूच! जरा वेगळं वाटतंय ना! पण आमच्या या बंबूचं ‘बंबू’ हेच लाडाने ठेवलेलं नाव. जरा वेगळं नाव आहे, पण ते पडलं तिच्या लहानपणी. म्हणजे अगदी बाळ असताना ओठांच्या चंबू करण्याच्या सवयीवरून हे तिच्या आजीने ठेवलेलं खास नाव. तर ही बंबू आता चांगली ५ वर्षांची सिनिअर केजीत शिकणारी, अभ्यासात हुशार, अशी शहाणी गोड मुलगी आहे. कुरळ्या केसांची, छोट्या सुंदर डोळ्यांची आणि एखादा विषय कारणमीमांसेसकट खोलवर जाऊन विचारून विचारून समजून घेणारी आणि ऐकणारी. पण आजच्या या विषयात कोणाचेही ऐकून न घेणारी.

अरेच्चा...पण तुम्हाला कळलं की नाही आजचा विषय काय आहे तो? ती आहे तुमच्या सगळ्यांची आवडती...?

त्याचं झालं असं, एका रविवारी संध्याकाळी आई-बाबांबरोबर बंबू बागेत फिरायला गेली. खूप खेळून-बागडून झाल्यावर बाबांना लहर आली आणि आई व बंबूला हिरवळीवर बसवून बाबा कुठेतरी गेले आणि १० मिनिटांनी परत आले. तेव्हा त्यांच्या हातात दोन पुडे होते. ‘कसले बरं होते ते?’ बंबूच्या मनात विचार आला.

बाबा बसले, पुडे उघडले गेले आणि आतमध्ये जो खाऊ होता, तो दोघांनी खायला सुरुवात केली. बंबूला पण थोडीशी चाखवली आणि तिथेच गाडी फसली. कारण तिथेच बंबूची ओळख झाली, त्या ओल्या भेळेशी! आणि मग गट्टीच जमली. दर रविवारी नाही, पण बरेचदा आई-बाबांबरोबर फिरायला बाहेर पडले की बंबूला आठवण व्हायची ती ह्या भेळेची. नंतर नंतर हट्टीपणा वाढला. शेवटी घराच्या शेजारच्या एका दुकानात इमर्जन्सीला आई तिला भेळ खायला घेऊन जायला लागली. ‘इमर्जन्सी’ म्हणजे बंबूचा हट्ट टोकाशी पोहोचला की!

आणि एक दिवस आमची बंबू आजारी पडली. मग डॉक्टरांनी विचारलं, “बाहेरचं काय खाल्लं?” त्यांनी जरा खडसावूनच विचारलं. आणि आईच्या डोळ्यात पाणीच तरारलं. कारण काही झालं तरी दोष तिचाच आहे, असं सारखं तिला वाटू लागलं. डॉक्टर म्हणाले, “बाहेरच्या भेळेतलं चिंचेचं पाणी कोणत्या पाण्यात तयार केलंय, हे आपल्याला माहित नसतं आणि त्या पाण्यातले जंतू आपल्या शरीरात प्रवेश करतात.” त्यानंतर बरेच दिवस गेले.

बंबू बरी होऊन नियमित शाळेतही जाऊ लागली आणि काही दिवस ती भेळेला पूर्ण विसरली होती. म्हणजे, तिच्या मनात आलं तरी तिच्या आजारपणाची आठवण येई. पण त्याचवेळी अनेक इंजिक्शनेदेखील तिच्या डोळ्यासमोर येऊन “नको रे बाबा ती भेळ” असं ती मनालाच सांगत असे.

यालाही आता ५-६ महिने उलटून गेले. चांगल्या ठिकाणी खाल्ली, तर काय हरकत आहे? असं म्हणून एकदा बाबाच्या रस्त्यात भेटलेल्या मित्राने भेळ खाऊ घातली. मग काय बंबू आपल्या जुन्या मैत्रिणीला कडकडून भेटली. पुन्हा सगळं सुरु... 

आणि आज कुठे अभ्यासात बाईसाहेब रमल्या होत्या, तर लगेच सौदेबाजी सुरु. आईचा जीव नुसता कात्रीत अडकल्यासारखा झाला होता. रागातून गप्प बसवायला जावे, तर हाss मोठ्ठा गळा काढला असता. मग तिच्या डोळ्यातल्या पाण्याबरोबर अभ्यासावरही पाणी पडले असते, म्हणून शेवटी “होss” म्हणून आई मोकळी झाली आणि नाईलाजाने संध्याकाळी भेळवाल्याकडे घेऊन ही गेली.

तसा हा भेळवाला प्रसिद्धच होता. ठिकठिकाणी त्याच्या शाखा होत्याच; शिवाय परदेशातही अनेक ठिकाणी शाखा आहेत असं ऐकलं होतं, म्हणून कौतुकही वाटत होतं. आईने एकच भेळ मागवली, कारण बंबूला एकटीला ती संपणार नव्हती. मग मायलेकींनी चीनी मातीच्या प्लेट मधली भेळ खायला सुरुवात केली. भेळ्वाल्याने समोर बाकडे टाकले होते, ग्राहकांना बसायला. समोर पाण्याचा पिंप होता. त्यावर एक ग्लास होता. तिखट लागलं तर पाणी प्यायला! त्या पिंपाच्या तोटीखाली एक प्लास्टिकचा टब होता. पिंपाच्या तोटीतले पाणी पडले, तर ते टब मध्येच. तसंच लोकांच्या उष्ट्या प्लेटही टबमध्येच होत्या. भेळवाल्याचा नोकर त्या प्लेट्स टबमध्ये हात घालून काढत होता.

तेवढ्यात चवीने भेळ खाणाऱ्या बंबूचे लक्ष तिकडे गेले. “ई, आई बघ ना तो काय करतोय? त्याला असं करताना लाज कशी वाटत नाही!’’ आईने पाहिलं आणि तिच्या नजरेत काही चमकून गेलं. आई पटकन म्हणाली, “अगं लाज नाही, घाण वाटायला पाहिजे आणि तीसुद्धा त्याला नाही तर आपल्याला!” 

“आपल्याला का?” 

“कारण तो तर नुसता हात घालतोय पण त्यांनी काढलेल्या प्लेट्समध्येच तर आपण भेळ खातोय.” छोट्याशा बंबूचा चेहरा कसनुसा झाला. तिला पुढचा घास घ्यावासाच वाटेनासा झाला.

मग आई म्हणाली, “पाहिलंस ना! अशा प्लेट्स स्वच्छ न धुतल्याने दुसऱ्याचे जंतू आपल्या पोटात जातात आणि आपण आजारी पडतो. आणि मग बाहेर भेळ खाल्ली की डॉक्टरकाका रागावतात.’’ झालं, दोघी मायलेकी तिथून उठल्या. भेळवाल्याला पैसे देऊन थेट घरी आल्या. हो पण तिथून निघताना आईने भेळवाल्या काकांना सुनवायचं सोडलं नाही. स्वच्छतेविषयी चांगलं ऐकवलं.

आणि तेव्हापासून आमची बंबू शहाणी झाली. भेळ किंवा त्यासारखे अनेक चटक-मटक पदार्थ आपण बाहेर खातो. पण अनेक मार्गांनी ते अस्वच्छ होऊ शकतात, हे तिच्या लक्षात आलं. म्हणजे चिंचेचं पाणी काय किंवा अस्वच्छ प्लेट्स काय किंवा उघड्या भेळेवर बसणारी धूळ काय, एकूणच रस्त्यावरचे, उघड्यावरचे पदार्थ खाणं वाईटच!

एकदा बंबू, बाबांच्या ऑफिसमधल्या मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाला एका हॉटेलात गेली. अगदी नटून-थटून परीचा ड्रेस घालून. केक कापल्यावर बुफे मांडण्यात आले. सर्वजण एकामागून एक आपल्या डिशमध्ये पदार्थ घेत होते. आणि बंबूच्या लक्षात आलं, तिच्या हातातल्या डिशला खरकटं किंवा काहीतरी घाण लागली होती. तिने बाबाला सांगितलं आणि बाबाने केटरिंग मॅनेजरला सांगितलं. मॅनेजरनी योग्य त्या हालचाली त्वरित केल्या व बाबांची माफी पण मागितली. बाबा तर बंबूच्या जागरूकतेवर जाम खुश झाले.

मित्रांनो, पाहिलात ना! या बंबूचे किती बारीक लक्ष असते ते. अगदी प्लेट्स पासून अन्न वाढण्याचा डाव स्वच्छ आहे ना, वाढून घेताना लोक तो डाव आपल्या उष्ट्या प्लेट्स ना तर लावत नाहीत ना, डाव्या हाताने घेतात ना! चमचे स्वच्छ आहेत ना! पिण्याच्या पाण्याचे ग्लास स्वच्छ आहेत ना! त्या पाण्यात काही पडलेलं नाही ना! अशा अनेक गोष्टींकडे तिचे बारीक लक्ष असते. ती बाहेरचं खाण्याचं टाळतेच. आणखी आपल्या मित्र-मैत्रिणींनासुद्धा ती हे समजावून सांगते. आहे की नाही विशेष! आणि म्हणून जेवायच्या वेळेला आमच्या बंबूने सांगितलेल्या सूचना तिचे मित्र-मैत्रिणी अगदी काटेकोरपणे पाळतात. म्हणजे जेवण्याआधी हात धुणे, नंतर खळखळून चुळा भरणे वगैरे... आहे की नाही मज्जा!

चला तर मग, आजपासून तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष घालायचं. अस्वच्छ गोष्टी आपण खायचं टाळायचंच, पण मोठ्यांच्याही हे लक्षात आणून द्यायचं. हो पण एक मात्र विसरायचं नाही हं! जेवण्याआधी हात मात्र साबणाने स्वच्छ धुवायचे कारण धुळीतले जंतू आपल्या हातातून पोटात जाऊ शकतात.

मग लक्षात ठेवणार ना? 

- अंजली अत्रे

[email protected]