मराठीचा तास

दिंनाक: 16 Feb 2019 14:24:12


पाखरांची शाळा भरे पिंपळा वरती

चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती

उतरते उन जाते टाळुनी दुपार

पारावर जसा यांचा भरला बाजार

बारखड्या काय ग आई घोकती अंगणी

उजळणी म्हणती काय जमुनी रंगणी

वर्गातील मुले वरील कविता बाईंनी दरडावून सांगितल्यामुळे घोकीत बसली होती. खरं तर किती सुंदर आणि विलक्षण कल्पना आहे. पाखरांची शाळा मुलांचं भावविश्‍व फुलवणारी, पण सिमेंट-काँक्रिटच्या बंदिस्त इमारतीत आणि कडक इस्त्रीच्या युनिफॉर्म आणि शूजच्या झगमगाटात निसर्गाशी ओळखच होत नाही. त्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मराठीला स्थान दुय्यमच. पण तरीही मराठीच्या बाई येनकेन प्रकाराने मराठीचा तास फुलवण्याचा, रंगवण्याचा प्रयत्न करीत होत्या, पण कुठेतरी काहीतरी अपूर्ण असल्यासारखे त्यांना सतत वाटत असे. काही केल्या मुलांना मराठीची गोडी काही लागत नव्हती. त्याला कारणही तसेच होते. मराठी या विषयाचे गुण इतर विषयांप्रमाणे ग्राह्य धरले जात नव्हते. श्रेणीबद्ध विषय म्हणून पालकही ‘ठेव ते मराठीचं पुस्तक बाजूला आणि गणितं सोडवायला बस’ असं सर्रास फर्मान सोडायचे.

बाईंना या सर्व गोष्टींची कल्पना होती म्हणून त्याही मुलांना कधी दटावून, कधी प्रेमाने मराठी पुस्तकं वाचायला देत असतं.

बाई याच विचारांच्या तंद्रीत असताना त्यांच्या कानावर कर्कश्शऽऽ आवाजात म्हटलेल्या ‘पाखरांची शाळा’ कवितेचे शब्द पडले. बाई भानावर आल्या. त्यांनी एक क्षण विचार केला आणि मुलांना म्हणाल्या चला आपण आज मराठीचा तास बाहेर घेऊयात. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती. सगळीकडे चिखल झाला होता, पण तरीही बाई मुलांना घेऊन गेल्या. पावसाची सरसर, पक्ष्यांचा किलबिलाट, पानांची सळसळ या सगळ्यांचा मनमुराद आनंद मुलांना घेऊ दिला आणि स्वतःही घेतला. या निसर्गरम्य वातावरणात मुलांनी अक्षरशः पाखरांची शाळा अनुभवली. पक्ष्यांच्या आणि मुलांच्या किलबिलाटाची सरमिसळ झालेली पाहून बाईंना अत्यानंद झाला.

मुलांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून बाईही आपला सायन्सचा त्रास विसरून नाक फुरफुरत का होईना, पण समाधानाने तास संपवून बाहेर पडल्या.

आज शाळेत चित्र काही वेगळेच होते. मुले मराठीचा तास कधी होईल याची वाट बघत होती.

बाई वर्गात आल्या आणि त्यांनी नवीन कविता शिकवायला घेतली -

अशी असावी माझी शाळा

यावा न मजला कंटाळा

समुद्र तळाशी वर्ग भरावेत

मधली सुट्टी आभाळा

 

- योगिता अंबिके (शिक्षिका)

एस.पी.एम. पब्लिक स्कूल