योगसिद्धी

दिंनाक: 15 Feb 2019 02:12:20


योग हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज’ या मूल शब्दापासून बनलेला असून युज याचा अर्थ जोडणे, एकत्र आणणे, मीलन होणे असा आहे. शास्त्राच्या दृष्टीने योग म्हणजे, जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य. मीलन घडवून आणणे. युज याचा अर्थ लक्ष केंद्रित करणे एकाग्र करणे असा पण होतो.

योगशास्त्र भारतात निर्माण झालेले एक अतुलनीय मौल्यवान ठेवा आहे व आज सर्व जगच योगाकडे आकृष्ट झालेले आहे. संपूर्ण जगासाठी योगशास्त्र हे कुतूहल ठरत असून त्यावर फार मोठे संशोधन चालू आहे. आजच्या विज्ञान युगात जरी सर्व सुखे सर्वांच्या दारी उभी टाकली असली तरी त्याबरोबर अनेक दुःखे, ताणतणावही तेवढ्याच आवेशाने समोर उभी आहेत व त्यावर यशस्वीरित्या कशी मात करावी याची चिंता विज्ञानालाही सतावित आहे. मात्र या स्थितीत एकच आशा समोर आहे आणि ती म्हणजे योगशास्त्राची दिशा. मागील शतकांत अनेक योगप्रेमी व्यक्तींनी योग जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. योगाविषयीचे अनेक गैरसमज दूर केले. योगग्रंथातील सर्व प्रक्रियांचे सुनियोजन केलेच; पण आजच्या विज्ञानाच्या कुशीत बसवून त्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक पुरावे, उपयुक्तता समोर मांडली. त्यामुळेच आता सर्वचजण योगाकडे वळत आहेत.

योग हे मानवाच्या उन्नतीचे शास्त्र असून मनुष्य प्राण्याने समाधी अवस्थेपर्यंत जाऊन मोक्ष मिळविणे हे ध्येय आहे. मानवी जीवनात जे चार पुरुषार्थ सांगितले आहेत ते करून दाखविण्याचे मार्गदर्शन योगशास्त्र करते. धर्म, अर्थ, काम व मोक्ष असे चार पुरुषार्थ असून ते प्रत्येकाने पार पाडून स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे कल्याण करावे असे भारतीय अध्यात्म सांगते. म्हणजेच संसारात राहूनही मोक्षमार्ग साधता येतो. त्यासाठी संन्यास घेण्याची जरुरी नाही. असेच चार प्रकारच्या पुरुषार्थातून सिद्ध होते. प्रचलित व्यवहाराच्या दृष्टिकोनातून म्हणायचे तर योग म्हणजे व्यक्तिमत्त्वाची परिपूर्ण जडणघडण होय. अर्थात हे साधण्यासाठी शरीर, मन, भावना, आत्मा याचा संतुलित मेळ बसणे आवश्यक आहे. शरीराच्या माध्यमातूनच या सर्वाचा विकास साधायचा आहे. यासाठी सर्वसामान्य पावलेला मार्ग म्हणजे राजयोग होय. दुसरेही योगाचे अनेक मार्ग आहेत जसे भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग, लययोग इत्यादी इथे योगशिक्षिका होण्याच्या दृष्टीने राजयोगाचा आपण विचार करणार आहोत. आज अनेक संस्था योगाचे कार्य करत आहेत. योगाची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रत्येक संस्था आपापले अभ्यासक्रम राबवीत आहे. प्रत्येक संस्थेचा अभ्यासक्रम वेगवेगळा आहे. विचारधारा वेगळी आहे. यात एकसूत्रीपणा यावा योगशिक्षणांत एकवाक्यता यावी यासाठी आंतरराष्ट्रीय योगादिनाचा 56 मि. अभ्यास ठेवलेला आहे. सर्व जगभर हा अभ्यास घेण्यात यावा. योग हा सर्वांच्याच फायद्याचा आहे. योगातून शरीर, मन, आत्मा, भावना यांचा विकास होतो.

योग शिक्षणाच्या दृष्टीने आसने, प्राणायाम, शुद्धीक्रिया, बंध-मुद्रा, ध्यानधारणा, नीतीमूल्यशिक्षण हे प्रकार आहेत.

आसने : आसन म्हणजे अशी शारीरिक स्थिती की ज्यातून साधे स्नायू ताणले-दाबले जातात. स्नायू-सांधे लवचिक होऊन त्यातील मलाचा निचरा होतो. शरीर लवचिक राहते. सर्व अवयवांचे कार्य नीट चालावे याकरिता अनेक प्रकारच्या योगासनांची रचना केलेली आहे. उदा. मंडूकासन, गोमुखासन, वक्रासन, भुजंगासन इ. असे अनेक आसने आहेत.

काही आसने शयनस्थितीतील आसने, बैठकस्थितीतील आसने, विपरीत शयनस्थितीतील आसने, दंडस्थितीतील आसने. उपयुक्ततेच्या परिणामाच्या दृष्टीने 1) ध्यानात्मक आसन 2) आरोग्यात्मक आसने 3) विश्रांतीकारक आसने.

ध्यानात्मक आसने- पाठीचा कणा ताठ राहण्यासाठी 1) पद्यासन, 2) सिद्धासन, 3) स्वस्तिकासन, 4) वज्रासन इ. आसने आहेत.

प्राणायाम : प्राणायाम ही श्वसनाशी संबंधित प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमधून श्वसन प्रणाली सुधारते प्राणशक्तीवर नियंत्रण आणले जाते व हळूहळू मज्जासंस्था आणि मनावर नियंत्रण आणले जाते. प्राणायामांची प्रक्रिया अशी आहे की जिचा शरीरावर व मनावर लागलीच परिणाम होतो. आसनांचे परिणाम जाणवायला काही कालावधी लागतो; पण प्राणायामाचे परिणाम लगेचच दिसून येतात. मनाची चंचलता अस्थिरता पुढे जाऊन ते ध्यानासारखी प्रगत साधना करण्यासाठी उपयोगात आणली जाते. प्राथमिक शाळेतील विद्यार्थी त्यांची एकाग्रता वाढविण्यासाठी त्यांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी योग प्राणायाम आवश्यक आहे. तो योग दिनआसने प्राणायाम प्रत्येक कुलात घेतले जातात. ही फार मोलाची व आनंदाची गोष्ट आहे.

 

- संजीवनी प्रभाकर चाटेरिकर, सहशिक्षिका                                        स्वा. सावरकर प्रा. विद्यालय बीड

[email protected]