संगीत

दिंनाक: 14 Feb 2019 12:35:51

 

संगीत म्हणजे सूर, ताल, लय आणि मनातील भावना यांचा सुरेख संगम. संगीतातून आपल्या मनातील भावना अधिक चांगल्याप्रकारे व्यक्त होतात. संगीत हा सर्वांना जोडणारा एक धागा आहे. संगीत म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग असतो; अगदी जन्मापासून.

जेव्हा लहान बाळ जन्माला येते, तेव्हा सगळ्यांत पहिले ते रडायला लागते. त्याला सुद्धा एक लय असते, सूर असतो आणि ते बाळाचं पहिलं रडू सर्वांना बाळ सुखरूप असल्याचा आनंद देऊन जातं. पुढे ते बाळ अंगाई गीतच ऐकून शांत झोपतं. लहान मुलांसोबत बडबडगीत गाताना अगदी मोठा माणूस देखील ‘इथे इथे बसले मोला...’ असं लहान होऊन गातो. बॉलिवूडची गाणी तर मुला-मुलींची आवडतीच! इतरवेळी शांत असणारे शिक्षकही सहलीला गेल्यावार या गाण्यावर मुलांसोबत नाचतात! एखाद्या पार्टीमध्ये सुद्धा उडत्या चालीच्या गाण्यावर नाचायला खूप मजा येते.

तरुणवयात आपण एखाद्या संध्याकाळी शांत, एकटे-एकटे असू तर आपल्या आवडीची अशी छान गाणी ऐकल्यावर तो एकटेपणा दूर होतो. एरवीही आपल्या आवडत्या गायकाची सुंदर गाणी ऐकल्यावर मन प्रसन्न होते. गाणी ऐकून अंगात उत्साह, तरतरी आणि ऊर्जा निर्माण होते.

पंढरपूरच्या वारीत वारकरी कित्येक मैल चालत प्रवास करतात. ती ऊर्जा आणि स्फूर्ती देवाचे भजन, गजर आणि अभंग यातून निर्माण होते. संगीताच्या मदतीने ते वारकरी पंढरीची, विठ्ठलाची वाट चालतात.

शाळेतल्या कविता म्हणजे खरं तर पाठ करायला अवघड तशाच कंटाळवाण्या! पण, त्या कवितेच्या अनुरागाने जर तिला एखादी मस्त चाल लावली तर ती पाठ करायला सोपी होतेच, शिवाय गातानाही छान वाटते. ‘श्रावण मासी, हर्ष मानसी’ आणि अशा अनेक कविता आजी-आजोबांच्या तोंडपाठ असतात.

निसर्गातही आपल्याला संगीत अनुभवायला मिळते. पक्ष्यांचे कुंजण, कोकिळेची मंजूळ गाणी, वाहत्या वार्‍याचा आवाज अशा स्वरबद्ध, तालबद्ध रचना आपल्याला ऐकता येतात. तसेच पावसाची टप-टप आणि झर्‍याची, नदीची खळखळही मनाला प्रसन्न करते.

असेही संगीत हे गायक आणि वादकांचे आयुष्यच असते. त्यांचा प्रत्येक श्‍वास हा संगीत असतो. हे कलाकार स्वत:चीही करमणूक करतात आणि आपल्याला संगीताचा मनसोक्त आनंद देतात. लता मंगेशकर, मोहमद रफी, पं. जितेंद्र अभिषेकी त्यासोबतच आताचे महेश काळे, श्रेया घोषाल, अरजित सिंग, राहुल देशपांडे यांसारखे कलावंत संगीताला अनमोल देणगी आहेत.

संगीतात एक वेगळीच ताकद आहे. संगीत गाऊन किंवा ऐकून मन प्रसन्न, आनंदी होते. अंगात एक उत्साह संचारतो. जसे राष्ट्रगीत गाताना आपल्यात देशाभिमानाचे स्फुरण चढते. संगीताच्या या शक्तीचा आपल्याला कायमच उपयोग होतो व म्हणूनच आपण संगीताची ध्यानधारणा केली पाहिजे.

 - श्रेया पोंक्षे

इ. ९ वी, डी.ई.एस. शाळा

[email protected]