कृष्णकमळ

दिंनाक: 11 Feb 2019 14:02:28


कृष्णकमळ ही पॅसिफ्लोरेसी कुळातील सदाहरित / निमसदाहरित वनस्पती वेल. याच्या ४०० जाती आहेत. पण त्या शोभेसाठी लावल्या जातात. याचे शास्त्रीय नाव पॅसिफ्लोरेसी. याच्या कुळातील २४ जाती मुळच्या दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमधील आहेत; पण आता इतर उष्णकटिबंधातील देशातून, बागांतून लावलेल्या आढळतात. आता ती इकडचीच झाली.

कृष्णकमळच्या ५-७ जातीच भारतात आहेत. या नाजूक कमळिणीला (वेलीला)वर चढायला स्प्रिंगसारखे ताणावे लागतातच. (भेंडोळीच की!). ती मांडवावर, कमानी किंवा बंगल्याच्या काही भागांवर चढवतात. गंधाचे सडे शिंपडणारे हे फूल – निळे जांभळे.

कृष्णकमळीची हिरवी, पोपटी पाने साधी एकाआड एक, हाताच्या पंजासारखी, तीन कंगोरे असलेली त्रिकोणी पाने, फुले मोठी लांब आकर्षक असतात. फुले लाल, गुलाबी, पिवळी, निळी, जांभळी अशा विविध रंगात येतात. निळी फुले सुगंधित असतात. या फुलाच्या पांढऱ्या पाकळ्या, निळा जांभळा मध्यभाग (करोना म्हणतात) तर क्वचित हिरवट फुले असतात. ही फुले द्विलिंगी, मोठी असतात. मात्र याला देठ छोटे असते. बारमाही सर्व ऋतूत फुलणारी ही वेल. फुलाला मंद मधुर वास.

फळ, साधे, पिवळ्या रंगाचे असून गरात अनेक बिया असतात. बिया चपट्या व अंडाकृती असतात. या निळ्या फुलाचे नाव पॅशन फ्लॉवर आणि त्याच्या फळाचे नाव पॅशन फ्रुट. पॅशन म्हणजे वेदना. हे फळ टोमॅटोपेक्षा किंचित मोठे, बाहेरून याचा रंग हिरवा, कधी शेंदरी असते. या शेंदरी गराचे सरबत करतात. ते स्वादिष्ट असते. या वेलीची देणगी म्हणजे हे सुरुचिर फळ. ही फुले जूनपासून फुलायला सुरुवात होते. या फुलाला व्यथित फूल म्हणतात. पण ते दयेचे प्रतीक आहे. सगळ्याच कृष्णकमळी फळतात, असे नाही. या शेंदरी साल बेलफळापेक्षा नरम पण आंब्याच्या सालीपेक्षा जाड असते.

या वनस्पतीची नवीन लागवड बी, छाट / दाब कलामांनी करतात. या वेलीला भरपूर पाणी, निचरा होणारी विशेष खत न घातलेली जमीन, भरपूर सूर्यप्रकाश लागतो. झाडांच्या सावलीत ती चांगली वाढत नाही. मधमाशा, फुलपाखरांपासून यांचे परागीकरण होते. पिवळ्या फळातील गर उत्तेजक व पौष्टिक असतो. उत्तर व दक्षिण अमेरिकेत हे फळ चहात वापरतात. ते शक्तिवर्धक आहे, असे तेथे समजतात, तर ऑस्ट्रेलियात हे फळ गुंगी आणणारे आहे, असे समजतात. पदार्थात वासासाठी वापरतात. त्यापासून जेली / जॅम बनतात. फेटिडा या लहान पांढऱ्या फुलांच्या पानांचा काढा दमा, पित्तविकारावर उपयुक्त आहे. आणि डोकेदुखी व घेरीवर याची पाने डोक्यास बांधतात.

या वेलीचे वाढणे म्हणजे सृष्टीनं रेखाटलेली रेखाचित्र जणू ! पण हे फूल उमलता उमलता मिटायला लागतं. त्यांचे जीवन अगदीच अल्पकाळाचे.

कोणी कवी / लेखक याला येशूची कहाणी सांगतो, तर कोणी कौरव – पांडव किंवा कृष्णगोपिकांची रासक्रीडा समजतो. हे त्या फुलाच्या वर्णना(रचना)वरून म्हणूनच वाटतं, कृष्णाच्या प्रीतीच्या खेळांना, सुरांना जसं वेळ, काळाचे बंधन काव्यात नसते. तसेच हे पुष्प क्रिस्तापूर्वीही अनंतयुग ऐकलेल्या वेणूच्या नादास्वरात कृष्णमय झालं असावं.

- मीनल पटवर्धन 

[email protected]