मित्र मैत्रिणिनों, आज मी तुम्हाला दिल्लीतल्या काही धार्मिक स्थळांबद्दल सांगणार आहे. तुम्ही ७वी, ८वीत असाल, तर तुम्ही दिल्ली सल्तनत आणि मुघलांचा इतिहास कदाचित शिकत असाल, जे मित्र अजून छोटे आहेत त्यांना हा इतिहास शिकायचा आहेच पुढे. मी हे तुम्हाला अशासाठी सांगते आहे की, ह्या इतिहासाच्या पाऊलखुणा असणारा अवलिया निजामुद्दिनचा दर्गा दिल्लीत आहे. लाल किल्याजवळ प्रसिद्ध जामा मशीद आहे. बंगला साहिब हा मोठा गुरुद्वारा आहे. अलीकडच्या काळात बांधलेलं लोटस टेम्पल आहे. मी दिल्लीला राहायला लागल्यावर इकडून तिकडे जाताना मला बंगला साहिब गुरुद्वारा खूप वेळा दिसायचा. हा गुरुद्वारा चांगलाच मोठा आहे.

मी आणि माझी फॅमिली एक दिवस वेळ काढून या गुरुद्वारात गेलो. तुमच्यापैकी कोणी गुरुद्वारात गेलं असेल, तर तुम्हाला माहीत असेल की गुरुद्वारामध्ये कुठच्या देवाची मूर्ती नसते. इथे गुरु ग्रंथसाहिब ग्रंथ असतो आणि त्या ग्रंथाची पूजा केली जाते. गुरुद्वारांमध्ये सतत ग्रंथसाहिबमधल्या श्लोकांचं पठण होत असतं. या एवढ्या मोठ्या गुरुद्वारामध्ये प्रत्येक दिवशी हजारो भक्त येत असतात, दर्शन घेत असतात. इथली स्वच्छता पाहून आपल्याला आश्चर्य तर वाटतच पण कौतुकही वाटतं. या गुरुद्वारात गेल्यावर चपला ठेवण्याच्या ठिकाणी मी गेले, तर तिथल्या काउंटरवर ५-६ वर्षांचा छोटा हसरा मुलगा होता, तो चपला ताब्यात घेऊन हसतहसत टोकन देत होता. गुरुद्वारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सेवा करण्यासाठी लोक येत असतात. हा मुलगासुद्धा तशीच सेवा करायला आला होता. या अशा सेवा करण्याच्या वृत्तीमुळेच हा गुरुद्वारा एवढा स्वच्छ राहू शकतो. इथे एक लंगर नावाची पद्धत असते. लंगर म्हणजे एका अर्थाने प्रसादाचं जेवण. प्रत्येक गुरुद्वारामध्ये लंगर असतो. इथे साधंसं जेवण मिळतं. या लंगरमध्ये सुद्धा ताटं, वाट्या देण्यासाठी, जेवण वाढण्यासाठी, जेवण झाल्यावर पुढच्या लोकांच्या जेवणापूर्वी साफसफाई करण्यासाठी स्वयंसेवक असतात. अगदी छोटी छोटी मुलंसुद्धा पटापट इथली जमतील ती कामं करत असतात. गोरगरिबांपासून अत्यंत श्रीमंत माणसांपर्यंत सगळेजण इथे एकाच पंगतीत जेवतात. या गुरुद्वारामधला लंगर हा काही गरिबांसाठी एक मोठाच आधार आहे. असंच अन्नदान अवलिया निझामुद्दीनच्या दर्ग्यात होत असतं. दर्गा म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? दर्गा म्हणजे एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचं स्मारक. त्या व्यक्तीचं थडगं जिथे असतं त्यावर हे स्मारक बांधलं जातं. ह्या कबरीवर चादर चढवण्याची पद्धत असते. चादर चढवणं म्हणजे एखादं जरीचं कापड त्यावर पसरून ठेवणं.

निजामुद्दीन नावाचा एक सुफी संत होता ज्याचा हा दर्गा आहे. ह्या दर्ग्याचा परिसर रणबीर कपूरच्या रॉकस्टार या चित्रपटातल्या ‘कून फाया कून’ ह्या गाण्यात दिसतो. बजरंगी भाईजान ह्या सलमान खानच्या चित्रपटातही हा दर्गा दिसतो. ह्या दर्ग्याच्या परिसरात अनेक गोरगरीब आसऱ्याला असतात. त्यांची खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्था ह्या दर्ग्यात फुकट होते. दिल्लीसारख्या ठिकाणी हवामान अतिशय टोकाचं असतं. कडाक्याच्या थंडीत केवळ थंडीने नाही तर उपासमारीनेही माणसं मरतात, त्यामुळे अन्नदान हे खूपच उपयोगी ठरतं. ह्या दर्ग्याच्या बाहेर बरीच फुलांची, खाण्यापिण्याची दुकानं आहेत. मी इथे एक शिरा पुरीचा स्टॉल पाहिला. इथल्या पुऱ्या अगदी मोठ्या पोळीच्या आकाराच्या होत्या आणि शिराही टूटी फ्रुटीने सजवून रंगीबेरंगी केलेला होता. दिल्लीवर मुघलांनी बराच काळ राज्य केलं. त्यामुळे दिल्लीत अनेक प्रसिद्ध मशिदी आहेत. त्यातली सर्वात प्रसिद्ध मशीद म्हणजे जामा मशीद. ही शाहजहान या मुघल बादशहाने बांधली. आपल्या देशातल्या मोठ्या मशीदींपैकी ही एक मशीद आहे. ही मशीद लाल किल्ल्याच्या बरोबर समोर आहे. दिल्लीतल्या इतर स्मारकांमध्ये किंवा लाल किल्यामध्ये दिसणारा लाल दगड ह्याही मशिदीच्या बांधकामात वापरलेला आहे. संगमरवराचाही वापर ह्या मशिदीच्या बांधकामात आहे. वेगवेगळ्या धर्माची अशी धर्मस्थळं किंवा प्रार्थनास्थळं ही काही फक्त धार्मिदृष्ट्या महत्त्वाची असतात असं नाही. ह्या स्थळांमुळे आपल्याला इतिहास कळतो, वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरा समजतात. म्हणूनच दिल्लीत याल तेव्हा ही ठिकाणं सुद्धा जरूर पाहा.

 - सुप्रिया देवस्थळी

[email protected]