नाटक मनातलं...

दिंनाक: 07 Dec 2019 19:26:42


‘युवा नाट्यकर्मी, प्रसिद्ध अभिनेता नचिकेत वेलणकर... स्नेहसंमेलनाच्या मुख्य कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कृपया प्रशालेमध्ये आम्ही आपल्याला निमंत्रित करीत आहोत. आपल्या शुभहस्ते शाळेतील गुणी व यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जातील.’

निमंत्रण पत्रिकेतील आपल्या नावाकडे पाहत नचिकेत भूतकाळात गेला. त्याला आठवलं, सुमारे 30 वर्षांपूर्वीचं स्नेहसंमेलन. तो नुकताच इ.5वीत आला होता. नवीन शाळा, शिक्षक, मित्र, सगळं वातावरण नवं नवं. मुळात नचिकेत एका छोट्या खेडेगावातून शहरातल्या मोठ्या शाळेत आला होता. वर्गात ऑफ तासाला तो नकला करून दाखवायचा. दिसायला थोडा बुटका, सावळा चेहरा; पण त्याच्या डोळ्यांत एक बुद्धीची चमक होती. नाटकांच्या अनेक स्पर्धांत तो भाग घेत असे. नचिकेतचं पाठांतर विलक्षण होतं. बाईंनी काव्यवाचन स्पर्धेसाठी दिलेली कविता तो हावभावांसह अशी काही पेश करायचा की, नंबर मिळालाच पाहिजे.

अभ्यासाबरोबरच बॅडमिंटन, तबला यातही नचिकेत पुढे असायचा. त्याचा स्पर्धक होता विश्‍वेश. विश्‍वेश लहानपणापासून लाडात वाढलेला, श्रीमंत घरातला. नचिकेतला नाटकांमध्ये मिळणारी बक्षिसं, खेळातलं प्रावीण्य हे विश्‍वेशला खुपत असे. विश्‍वेशची आई सतत विश्‍वेशबरोबर असायची. शाळेत आणणे-सोडणे, विविध स्पर्धांना घेऊन जाणे, त्याचे वेगवेगळे डब्बे आणणे, सारं काही करायची.

वर्गात विश्‍वेश अभ्यासात पुढे आणि नचिकेत इतर उपक्रमांत अग्रेसर. नचिकेत सदैव विश्‍वेशला मैत्रीचा हात पुढे करायचा; पण विश्‍वेश त्याला कमी लेखायचा. अभ्यासातली कितीही बक्षिसं पटकावली, तरी विश्‍वेशला ती अपुरी वाटायची. तोही नाटकांमध्ये, स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा; पण अभिनयात मागे पडायचा.

उभ्याउभ्याच नचिकेतने ती निमंत्रण पत्रिका अलगद जपून टेबलवर ठेवली आणि पुन्हा त्याला आठवीत असताना केलेलं ते नाटक आठवलं. बाईंनी स्वत:च ते नाटक लिहिलं होेतं - ‘आजोबा देवो भव:।’ त्यात आजोबांच्या नातवाची संदेशची भूमिका नचिकेत करत होता. खूप तालमी चालल्या होत्या. विश्‍वेशलाही नचिकेतच्या मित्राची भूमिका दिली होती. वृद्धाश्रमातला प्रसंग होता. वर्गातली मुलं तिथल्या आजोबांना भेटतात. त्यातल्या एका आजोबांशी जमलेली मैत्री. नचिकेतने ‘संदेश’ या मुख्य मुलाचं काम केलं होतं. ती शहारातली मानाची स्पर्धा होती. नचिकेतचं ‘संदेश’ हे पात्र खूप भावूक, हळवं असं होतं. पुढे संदेशचे बाबा आजोबांना दत्तक घेतात. ते घरीच राहायला येतात. संदेश आणि आजोबांचे सुखद संवाद, एकाकी वृद्धांच्या समस्या असा एकंदर नाटकाचा विषय होता.

नचिकेत अगदी मन लावून काम करत होता. आधी दोन दिवस रंगीत तालीम होती. बाई नचिकेतचं कौतुक करत होत्या. सगळा सेट लागला. नचिकेत धावत स्टेजवर जातो आणि आजोबांना बिलगतो, असा एक प्रसंग होता. काय झालं काही कळलं नाही; पण नचिकेत विंगेतून जाता-जाता पायात काहीतरी अडकलं आणि तो जोरात आपटला! नाका-तोंडातून रक्त येऊ लागल, पायातून एक कळ सणकन अशी काही गेली की, नचिकेतच्या नजरेसमोर अंधारी आली. रंगीत तालीम असल्यामुळे बाकी काही प्रश्‍न नव्हता. आतले दिवे लावल्यावर लक्षात आलं की, नचिकेतच्या पायात आजोबांची काठी अडकली. काहीच लक्षात येईना की ही  काठी इथे कशी? ती तर आजोबांच्या हातात असायची.

बाईंनी आधी निचिकेतसाठी डॉक्टर बोलावले. मलमपट्टी केली. फार नाही; पण तोंडाला थोडं खरचटलं होतं. पाय मुरगळला होता. नंतर बाईंनी सगळ्या कलाकारांना एकत्र केलं आणि चौकशी केली. आजोबा झालेला हृषिकेश म्हणाला, ‘बाई, मला आयत्या वेळी ही काठी सापडत नव्हती; म्हणून मी तसाच स्टेजवर गेलो होतो.’ बाई म्हणाल्या, ‘काय प्रकार आहे? कुणी घेतली होती ती काठी?’ बाईंना वाईट वाटत होतं की, बिचार्‍या नचिकेतला उगाच दुखापत झाली याचं. त्यांनी सर्वांना समजावून सांगायला सुरुवात केली. ‘जाऊ दे, आपण या वेळी भाग नको घ्यायला. नचिकेतला त्रास नको व्हायला’, बाई म्हणाल्या. नचिकेत म्हणाला, ‘नाही नाही. अजून दोन दिवस आहेत, वाटेल बरं. आपण नाटक करायचंच!’ सगळे घरी जायला निघाले आणि हुंदके देत विश्‍वेश पुढे आला. बाईंच्या पायावर डोकं ठेवून तो म्हणाला, ‘बाई, मी खूप वाईट आहे. मला शिक्षा करा.’ बाई आणि सगळी मुलं आश्‍चर्याने बघू लागली. विश्‍वेश बोलत होता, ‘बाई, या नचिकेतबद्दल वाटणारा द्वेष, मत्सर यांमुळे मीच ती काठी नचिकेतच्या पायात अडकवली. त्याला तुम्ही सगळे चांगले म्हणालात, ते मला बघवत नव्हतं. त्याचं हसं व्हावं, नाटक बंद पडाव;ं म्हणून मीच हे सगळं घडवून आणलं. बाई मला क्षमा करू नका, उलटे चांगली शिक्षा द्या. मी वाईट आहे.’, म्हणून विश्‍वेश ओक्साबोक्शी रडू लागला.

नचिकेत हळूच त्याच्याजवळ गेला. तो म्हणाला, ‘अरे, तू हे कबूल करून तुझा चांगुलपणा सिद्ध केलास, विश्‍वेश! हे बघ, तू हुशार आहेसच! आपण मित्र आहोत ना, मग कशाला वाईट वाटून घेतोस? चल थोड्या वेळाने मस्त रिहर्सल करू. बाई, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आपलं नाटक होणारच!’

बाईंनी दोघांच्याही डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, ‘नचिकेत, विश्‍वेश आज तुम्ही दोघांनीही सर्वांना खूप काही शिकवलंय. विश्‍वेशचा प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा, कबुली आणि नचिकेतची क्षमाशीलता, दयाबुद्धी आणि मित्रप्रेम यांमुळे मी भारावून गेलेय. विश्‍वेश आयुष्यात पुन्हा कधीही, कोणाचाही मत्सर करू नको आणि नचिकेत हे मित्रप्रेम असंच कायम ठेव. चला रे, पुन्हा एकदा रिहर्सल होईल!’

बाईंच्या डोळ्यांत समाधानाचं पाणी तरळत होतं आणि नचिकेत आणि विश्‍वेश एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून स्टेजकडे चालले होते.

फोनच्या रिंगने नचिकेत भानावर आला. इतका वेळ सगळं आठवत तो तिथेच उभा होता. फोन विश्‍वेशचा होता तो म्हणत होता, ‘नच्या, वा गड्या! शाळेत स्नेहसंमेलनाचा प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलंय ना? मी फोटो काढणार लेका तुझे!’ नचिकेत फोनवर बोलता बोलता डोळ्यातलं पाणी पुसत होता.

- चारुता शरद प्रभुदेसाई