आपण या लेखात बालनाट्यातील पार्श्वसंगीताचा विचार करणार आहोत. (संगीत आणि पार्श्वसंगीत या दोन वेगळ्या आणि पूर्णपणे स्वतंत्र संकल्पना आहेत. संगीत म्हणजे गाण्याच्या चालीबरोबर जे वाजत ते. आणि पार्श्वसंगीत म्हणजे नाटकातील दृश्य अधिक प्रभावी करण्यासाठी पार्श्वभागी (background) जे संगीत वाजत ते.) पार्श्वसंगीत हा बालनाट्यातील इतर घटकांप्रमाणेच एक महत्त्वपूर्व घटक आहे. नाटकात पार्श्वसंगीत प्रामुख्याने दोन प्रकारे वापरलं जातं. एक ध्वनिमुद्रित (recorded) पार्श्वसंगीत आणि दुसरं नाटक सुरु असताना वादकांकडून वाजवले जाणारे (live) पार्श्वसंगीत.

नाटकांचं पार्श्वसंगीत करताना सर्वात महत्त्वाची असते ती नाटकाची संहिता. लेखकाला संहितेतून कोणता आशय पोहोचवायचा आहे आणि तो कसा पोहोचवायचा आहे यावर पार्श्वसंगीताचे स्वरूप, प्रकार ठरतो. खरंतर नाटक लिहिताना बर्‍याचदा लेखक त्यात त्याला अपेक्षित असणारे पार्श्वभागी येणारे आवाज नमूद करत असतो. मात्र त्याशिवाय एखादे दृश्य अधिक प्रभावी होण्यासाठी पार्श्वसंगीताचा प्रभावी वापर कसा करता येईल याचा विचार करायला हवा.  तेलेजू  या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा विजेत्या नाटकात नेपाळमधील एका प्रथेचे चित्रण केलेले आहे. त्यातील वेशभूषा आणि नेपथ्यामुळे दिग्दर्शिका मिहिका शेंडगे यांनी ते वातावरण बर्‍यापैकी साकारले असले तरी त्यातील पार्श्वसंगीतात त्यांनी नेपाळमधील लोकसंगीताचा वापर ( जो मराठी प्रेक्षकाला माहित आहे. ) केला असल्यामुळे आपण नेपाळमधील एक गोष्ट पाहत आहोत हे नाटकभर जाणवत राहत. हा त्या पार्श्वसंगीताचा विजय आहे.

नाटकात बर्‍याचदा सिनेमाची गाणी वापरली जातात. मात्र ती वापरत असताना काय परिणाम साधायचा आहे याचा विचार करणे गरजेचे आहे. कारण नुसती लोकप्रिय गाणी वापरल्यामुळे नाटक पाहणार्‍या प्रेक्षकांचे नाटकातील लक्ष उडून त्याला तो सिनेमा, त्यातील नट-नटी, ते दृश्य आठवू शकते. मात्र याचा कल्पक वापर करता येऊ शकतो.  बदली  नावाच्या एका बालनाट्यात बरेच दिवस नळाला पाणी न येणार्‍या कुटुंबाच्या घरी अचानक एक दिवस पाणी येते आणि त्यामुळे त्यांना आनंद होऊन ते नाचतात असे विनोदी दृश्य होते. बर्‍याचदा अशा दृश्यात सितारीचे आनंददायी संगीत वापरले जाते. मात्र या नाटकात पाणी आल्यावर पार्श्वभागी  लगान  सिनेमातील  घनन घनन...’ हे गाणं वापरलं होतं. त्यामुळे ते दृश्य अधिक विनोदी आणि अर्थवाही झालं.

 पार्श्वसंगीत हे नाटकाला पोषक असावं. म्हणजेच हे नाटकाला पुढे घेऊन जाणारे हवे. अति पार्श्वसंगीतामुळे नाटक मरू शकतं. शिवाय प्रेक्षकांच्या समजुतीबाहेरचे संदर्भ असणार्‍या पार्श्वसंगीतामुळेही नाटकाचा आशय पूर्णपणे व्यक्त होत नाही किंवा तो होण्यात बाधा निर्माण होते.  जब तक है जान !   या बालनाट्यात  जब तक है जान !  या हिंदी सिनेमातील जवळजवळ सर्वच गाणी दिग्दर्शकाने वापरण्याची कल्पक योजना केली होती. मात्र त्या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या फार स्मरणात नसल्यामुळे दिग्दर्शकाचा हा प्रयोग प्रेक्षकांपर्यंत पोहचूच शकला नाही.

 पार्श्वसंगीताचा नाटकात अशा प्रकारे वापर असावा की त्यामुळे दृश्य अधिक परिणामकारक झालं पाहिजे. उदा. नाटकात समजा एखादा राजा किंवा मोठी व्यक्ती प्रवेश करते तर तसा माहोल तयार करणारं पार्श्वसंगीत हवं. शिवाय ते नाटकाच्या प्रकृतीप्रमाणे गंभीर असावं की विनोदी हेही ठरवावं.

नाटकात प्रत्यक्ष ज्या गोष्टी रंगमंचावर आपण वापरत नाही. त्यांचा आभास आपण पार्श्वसंगीतामुळे निर्माण करू शकतो. जसे आपण रंगमंचावर गाड्या किंवा पाऊस दाखवू शकत नाही. मात्र पार्श्वसंगीतामुळे तसा आभास निर्माण करता येतो. आणि प्रेक्षकाला त्या परिस्थितीत नेता येते. एका बालनाट्यात ( आता नाव आठवत नाही. ) एक मुलगी टीव्हीवर चॅनल सर्फींग करते असं दृश्य होतं. मात्र त्यात चॅनल बदलत असताना बदलत जाणारा आवाज काहीही दाखवलं नव्हतं. त्यामुळे त्या मुलीलाच  अरे बातम्या लागल्या,अरे गाणी लागली  असे माहितीपर संवाद म्हणावे लागत. त्यामुळे प्रेक्षक नाटकात गुंतलेच जात नव्हते.

 नाटकाच्या पार्श्वसंगीतामध्ये ध्वनिसंकेत ( music operating ) ही एक महत्त्वाची गोष्ट असते. बर्‍याचदा नाटकातील पार्श्वसंगीत ऑपरेटर बटन चालू आणि बंद अशा स्वरूपाचे ऑपरेटिंग करतात. मात्र तसे न करता दृश्याप्रमाणे पार्श्वसंगीताचे ऑपरेटिंग व्हायला हवे. पात्रांचे आवाज हा नाटकातील महत्त्वाचा भाग असल्यामुळे पार्श्वसंगीताचा आवाज पात्रांच्या आवाजापेक्षा कमी असावा. ज्याप्रमाणे पंखा सुरु होताना हळूहळू सुरु होऊन क्रमाक्रमाने त्याच्या अंतिम गतीपर्यंत जातो. तसेच संगीताचा आवाज हळूहळू वाढत जाणारा हवा. परंतु, कधीकधी वीज, एखादा अचानक होणारा आवाज येतो. तो अचानक आला आहे, हे जाणवण्यासाठी जरा मोठ्यानेच यायला हवा. कधीकधी एखाद्या दृष्यानुसार यात फेरबदलही होऊ शकतो. समजा दोन मुले टीव्हीवरील गाण्यावर नाचत आहेत असे दृश्य असेल तर आवाजाची पातळी जरा जास्तच असेल. मात्र एखादी आजी टीव्ही पाहत आहे असे दाखवायचे असल्यास आवाज जरा कमी असेल. थोडक्यात, पार्श्वसंगीत हा बालनाट्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या योग्य वापराने नाटक अधिक परिणामकारक होत.

- प्रीतिश खंडागळे