भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे अस्मिता जागृत झालेल्या एका कुटुंबाची ही कहाणी.

चार आवृत्ती आणि तब्बल एकोणतीस पुर्नमुद्रणे यातून आमचा बाप आन् आम्ही या पुस्तकाने 50,000 प्रतींचा टप्पा ओलांडलाय. अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. हे पुस्तक युवा पिढीपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावे; म्हणून ग्रंथालीने एक लाख प्रतींची महाजंबो जनआवृत्ती काढली. त्याची किंमतही सर्वसामन्यांसाठी रु.60/- ठेवली.

नरेंद्रचे आयुष्य म्हणजे एक जीवनसंघर्ष आहे; पण त्याचबरोबर त्यामध्ये प्रगतीच्या पाऊलखुणाही दृग्गोचर होतात. प्रगतीही संघर्षामधूनच साधत असते! त्यासाठी नरेंद्र व त्यांचे कुटुंबीय खंबीरपणे उभे राहिले; त्यांनी अन्याय व्यवस्थेविरूद्ध लढा दिला.

जर नरेंद्रसुद्धा भारतातील दलित व दाबल्या गेलेल्या हजारो स्त्री-पुरुषांप्रमाणे स्वतःला व्यक्त करण्यासाठी उठला नसता, स्वतःच्या संपन्न आयुष्यासाठी जी काही प्रगती केली ती ही साधली नसती.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. के.आर. नारायणन् यांच्याप्रमाणेच डॉ. नरेंद्र जाधव यांचे आयुष्यसुद्धा बदलाची असीम शौर्याची, उत्कर्षाची आणि आशेची कहाणी आहे.

आज डॉ. नरेंद्र जाधव हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ, मराठी आणि इंग्रजीतील सिद्धहस्त लेखक, सामाजिक बांधिलकीचा वसा घेतलेले नामवंत शिक्षणतज्ज्ञ, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि एक प्रसन्न व प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून सर्वदूर परिचित आहेत.

तेव्हा विद्यार्थ्यांनो, वाट कसली बघताय? मिळवा हे पुस्तक आणि वाचल्यानंतर आपली प्रतिक्रिया शिक्षणविवेकला जरूर कळवा.

- स्वाती द. गराडे, सहशिक्षिका

कै. दा.शं. रेणावीकर विद्या मंदिर