‘‘या घरातल्या माणसांचा मला खूप म्हणजे खूपच राग आहे.’’

‘‘का बरं?’’

‘‘अहो, हे स्वत:च्या तोंडात चॉकलेटच्या गोळ्या कोंबणार आणि त्या मिटक्या मारत खाणार; पण आमच्या घशात मात्र डांबरी गोळ्या ठोसणार आणि आम्ही गुदमरणार.’’

‘‘मऽऽऽ चांगलं आहे की, आम्हाला गोळ्या-बिळ्या काहीसुद्धा मिळत नाही. आम्हाला मिळतात फक्त थपडा! तुम्हाला मिळतात ना गोळ्या..? म.. बसा की चघळत.’’

‘‘अहो, तुमचं डोकं फिरलंय का? या डांबरी गोळ्यांच्या वासाने आमची डोकी भणभणलीएत. अंगावरची भोकं बुजलीएत. माझ्या तोंडाशी तर इतका घाणेरडा वास बुजबुजतोय की कुणी जवळसुद्धा येणार नाही. आणि म्हणे गोळ्या चघळाऽऽऽ? व्वाऽऽऽ व्वा!’’

‘‘म्हणजे, तुम्हाला काय वाटतं..? ही माणसं डांबरी गोळ्या खात नसतील?’’

‘‘अहो, ‘स्वत: गोड गोळ्या खातो; पण इतरांना डांबरी गोळ्या भरवतो तो माणूस’, असं आपल्यात म्हणतात ते उगीच का? अहो, आमच्या अख्ख्या कुटुंबाला यांनी पिडलं आहे.. आणि तेही आमच्या कुटुंबातील लहान-मोठ्यांचा विचार न करताहो...!’’

‘‘कमाल आहे! हे मला माहीत नव्हतं. ते कसं काय बुवा..?’’

‘‘अहो, आमचं तसं कुटुंब मोठं. आमच्या कुटुंबात लहान मोठे सगळे मिळून सुमारे 48 जणं आहेत. यात काही आजारी आहेत, काही वृद्ध आहेत, काहींच्या अंगाला भोकं पडली आहेत, तर काही तरुण आणि चमकोपण आहेत.’’

‘‘पण, या कुणाकुणाचा विचार न करता, त्यांनी कोंबल्या की गोळ्या आमच्या तोंडात, घशात, हातात, पोटात, बोटात आणि पायातसुद्धा!!’’

‘‘बाप रे! म्हणजे तुमच्या शरीराची अगदी चाळणीच झाली असेल. जिकडे बघावं तिकडे गोळीबार!! हॅऽऽऽ हॅ.’’

‘‘फालतू विनोद करू नका. घडी करून पडून राहणार्‍याला काय समजणार म्हणा..? अहो ‘घडी मोडते, तेव्हा अक्कल येते’ हे तरी तुम्हाला माहीत आहे ना? तुमच्यासारखं आमचं एक शरीर नाही.’’

‘‘आता हे काऽऽऽय? तुम्हाला एक शरीर नाही? म.. तुमच्या कुटुंबात आहे कोण कोण?’’

‘‘आता तुम्हाला कसं सांगावं पांघरूणराव..?’’

‘‘आम्ही लोकरीचे कपडे. म्हणजे हाफस्वेटर, फुलस्वेटर, टीशर्टस, मफलर, कानटोप्या, हातमोजे, पायमोजे, शाली असं आमचं एकत्र कुटुंब आहे. काही शाली आणि कानटोप्या आता म्हातारी झाली आहेत. काहींना भोकं पडली आहेत. अनेक वर्षं वापरून वापरून ती मऊ, पिळपिळीत झाली आहेत. आता त्यांना वयपरत्वे डांबरी गोळ्यांचा वास सहन होत नाही आणि घडी घालून कोंबून ठेवलं, तर त्यांच्या अंगावर सुरकुत्या पडतात. त्यांची काळजी घ्यायला नको का?’’

‘‘हो तर, घेतलीच पाहिजे! पण तुम्हाला माझी गंमत माहीत आहे का?’’

‘‘गंमत? पांघरूणराव तुमच्यात काय गंमत असणार?’’

‘‘तुमच्याप्रमाणे आमचंपण कुटुंब मोठं आहे म्हंटले...’’

आँऽऽऽ? ते कसं काय बुवा? तुम्ही तर शेतातून निघता, फॅक्टरीत जाता आणि पांघरूण होऊन बाहेर पडता आणि मग घरातल्या लोकांवर आडवे पडता. हो की नाही?’’

‘‘मिस्टर लोकरे, आम्ही फॅक्टरीतलं पांघरूण नाहिये बरं का..’’

‘‘तुम्ही फॅक्टरीतले नाहीऽऽ? म.. कुठले तुम्ही? आणि इथे कसे काय आलात?’’

‘‘लोकरे, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? म्हणजे रागावणार नसाल तर...’’

‘‘विचारा की बिनधास्त.’’

‘‘आम्ही मूळचे शेतातले. तसे.. तुम्ही मूळचे कुठचे हो?’’

‘‘तुम्ही जसे शेतात लहानाचे मोठे होता. मोठं होताना बोंडात जाऊन लपता. आणि तरीही मोठे-मोठे व्हायला लागलात की बोंड फोडून बाहेर येता.. तेव्हा तुम्हाला ‘कापूस’ म्हणतात. आमचं ही थोडंफार असंच आहे. आम्ही मेंढ्यांच्या अंगा-खांद्यावर लहानाचे मोठे होतो. बरेच मोठे झालो की आम्हाला हलकेच कापून फॅक्टरीत पाठवतात, तेव्हा आम्हाला ‘लोकर’ म्हणतात. कळलं का?’’

‘‘अहो पण, हे झालं विषयांतर. तुम्ही मघाशी सांगत होतात की तुम्ही फॅक्टरीतले पांघरूणराव नाही. मग कुठले तुम्ही? ते तर सांगा.’’

‘‘हो, हो. ते सांगायचं राहिलंच. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मी काही मशीनमधून पिळून निघालेली भुक्कड चादर नव्हे आणि पांघरूणराव तर नव्हेच नव्हे!!’’

‘‘मी आहे खानदानी गोधडी.’’

‘‘खानदानी..? खानदानी म्हणजे काय? आणि खानदानी गोधडी म्हणजे काय? आम्ही हे शब्द पहिल्यांदाच ऐकतोय.’’

‘‘अहो, आपण ज्या घरात राहतोय ना, ते सुद्धा तुमच्यासारखंच मोठं कुटुंब आहे. या घरात दोन काका-काकू, एक मामा-मामी, दोन आजी, एक आजोबा, एक पणजी, सहा नातवंडं, चार सुना, दोन भावजया आणि एक आत्या एकत्र राहत आहेत..’’

‘‘अहो गोधडीबाई, मी तुम्हाला विचारलं, वाजले किती? तर तुम्ही म्हणालात आज मी जिलब्या खाल्या. हे काय? मी तुम्हाला विचारलं काय आणि तुम्ही सांगता काय? मला सांगा, ‘तुम्ही खानदानी आहात’ म्हणजे काय? तर तुम्ही जनगणनाच सुरू केली.’’

‘‘अहो लोकरे, जरा शांत राहा. त्या मेंढरांचे काही जीन्स तुमच्यात आलेत असं वाटतंय मला.’’

‘‘बरं..बरं. बोला आता..’’

‘‘तर या घरातल्या आजी, पणजी, काकू, मावशी, आत्या, सुना आणि भावजया यांच्या वापरलेल्या जुन्या साड्या एकत्र करून मला निगुतीने शिवलं आहे. शिवताना या साड्यांवरील डिझाइन्सचा, त्यांच्या काठांचा अत्यंत कलात्मक रीतीने वापर केला आहे. मला पाच बहिणी आहेत. सध्या चार बहिणी घरातच आहेत. मला इथे घडी करून ठेवलंय. घरातल्या प्रत्येकाला गोधडीच हवी असते, कारण माझ्यामध्ये कुणा ना कुणाची साडी असते, कुणाचा काठ असतो; पण या सगळ्याला या घराची किनार असते आणि मायेची ऊब असते. म्हणून तर बारा महिने तेरा काळ आम्ही घरातच इथेतिथे लोळत पडलेल्या असतो.’’

‘‘व्वा! तुमचं काम लई भारी हां.’’

‘‘पण, मला एक नाही कळलं की, तुमच्या सगळ्या बहिणी बाहेर असताना तुम्हाला इथे आत का ठेवलंय?’’

‘‘सांगा बरं, तुम्हाला काय वाटतंय.. का ठेवलं असेल?’’

‘‘कानटोपी म्हणाली, ‘मला वाटतं, बाहेर लोळून लोळून तुमचं डोकं फिरलं असेल’ म्हणून तुम्हाला इथे गुंडाळून ठेवलं असेल.’’

हातमोजे म्हणाले, ‘‘सगळ्यांनी थपडा देऊन देऊन तुमचा पापडा झाला असेल आणि इथे ठेवलं असेल.’’

सगळ्यात जुनी मऊ मऊ शाल म्हणाली,‘‘सध्या एक आजीबाई गेल्या आहेत तीर्थयात्रेला. त्या आल्यावर या गोधडीताई माझ्याबरोबरच जातील बघा त्यांच्याकडे..

अख्खी लोकर फॅमिली ओरडली, ‘‘का..का बरं?’’

‘‘अहो, माझ्यात फक्त साड्याच नाहीत, तर आजोबांचं धोतरपण आहे. याच आजोबांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला ही शाल भेट दिली आहे. आम्हा दोघींना जवळ घेतल्याशिवाय आजीबाई कधीच झोपत नाहीत.’’

सगळे आनंदाने म्हणाले, ‘‘आजीच्या लाडक्या मुली, गोधू आणि शाली!!’’