वेडे साहसवीर...

दिंनाक: 09 Nov 2019 17:36:57


जगात जेवढे शोध लागले आहेत ते शोध काही वेडाने झपाटलेल्या साहसी लोकांनीच लावले आहेत. आपल्याकडे कोणी जंगलवाटा धुंडाळताना कुठे फसला, तर त्याला वेडा ठरवले जाते. स्वत:चे साहस आजमावण्यासाठी पुरात उडी मारणारे तर ठार वेडे ठरतात. कडेकपारीत वावरणारे, सागरावर स्वार होणारेदेखील वेड्यांच्या यादीतच येतात.

आपण त्यांच्या साहस कथा कधी समजावून घेतल्या आहेत का? त्यातून आपली साहसाची आवड जोपासली जाते. अंगी धाडस येते. काहीतरी करून दाखवण्याची उर्मी जागी होते. आपल्यातही धमक आहे. ही भावना वाढीस लागते. महत्त्वकांक्षा उरी बाळगली जाते. अशा साहसी कथांमुळेच तरुणांमध्ये विधायक अग्नी चेतवण्याचे काम केले जाते.

महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पोतडीत असे अनेक साहसवीर लपले आहेत. शिवाजी महाराजांच्या साहसकथांची आपण पारायणे करतो. शिवरायांना एवढ्या मोठ्या उंचीवर नेण्यासाठी ज्या-ज्या साहसवीरांनी आपला खारीचा वाटा उचलला आहे, त्यातील काहीच नावे आपण जाणतो. पण शिवकालीन इतिहासात असे अनंत-अज्ञात साहसवीर आहेत की, ज्यांची आपल्याला नावे माहीत नाहीत. त्यांचा पराक्रम साहस आपण अव्हेरू शकत नाही. असेच एक तरुण जोडपे स्वराज्यासाठी जिवाची बाजी लावतात. त्यांचे म्हातारे कुटुंबीय जिवाचे रान करतात. मग काय भला-थोरला पराक्रम करून ठेवतात की, खुद्द शिवाजी महाराजांनासुद्धा या कोवळ्या पोरांसमोर नतमस्तक व्हावेसे वाटते. या झपाटलेल्या वेडाच्या भरात असे काही साहस करून दाखवतात की, त्यांचे त्यांनाही कळत नाही की आपण या स्वराज्य उभारणीच्या कामात एक चिरा झालो आहोत.

त्यांचे ते वेड, झपाटलेपण, जिद्द जिवाला जीव देणे, एकमेकांना साथ देणे, आपल्याला पदोपदी त्यांच्या साहसकथेत भेटत राहते. मग अशा खिळवून ठेवणार्‍या भन्नाट, थक्क करून सोडणार्‍या जीवंत साहसकथा वाचण्यात आपण मागे का? अशा साहसी कथांची श्रीमंती उरी बाळगण्यातच खरा अभिमान! त्यातून मिळणारी प्रेरणा हीच आमच्या विजयाची मुहुर्तमेढ! मग लगेच वाचा, पुण्याच्या जवळपास घडलेली सामान्य राजाराणीची असामान्य साहस कथा, ‘शेलारखिंड’.

पुस्तक - शेलारखिंड

लेखक - बाबासाहेब पुरंदरे

प्रकाशन - पुरंदरे प्रकाशन

पृष्ठसंख्या - 220 पृष्ठे

- सुनिता वांजळे

शिशुविहार प्राथमिक शाळा, एंरडवणे