लिहायचं असलं की सहज आपण बॉलपेन हातात घेतो आणि लिहायला लागतो. घरात उन्हाळ्याच्या दिवसात बरेचदा खरेदी केली जाते ती एअर कंडिशनरची!त्या गार हवेने शरीर मनाला बरं वाटतं!

सकाळी भूक लागली की पोहे, उपमा किंवा इडली, घावन याऐवजी हल्ली आपण बरेचदा स्ट्रॉबेरी किंवा चॉकोलेट स्वादाचे कॉर्न फ्लेक्स खातो दुधात घालून.
पण हे सगळं कुणी तयार केलं किंवा शोधलं माहिती आहे का?
हल्ली इंटरनेटच्या जगात एका क्लिकवर सर्व माहिती मिळते हे खरं पण तरीही सुंदर मुखपृष्ठ असलेलं, छान सुबक बांधणी असलेलं, सुरेख अक्षराने सजलेलं पुस्तक हातात घेऊन वाचण्यात वेगळीच गंमत आहे हं!
असं एक छान पुस्तक मी वाचलं आणि मला वाटलं की तुम्हालाही त्याची ओळख करून द्यावी! चला तर मग मुसंडी मारु या शोधांच्या जगात!
संजय पाठक यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे "शोधांच्या नवलकथा".
आपण हल्ली दररोज ज्या गोष्टी सहज वापरतो त्या तयार करताना मात्र खूप कष्ट पडले आहेत त्यांच्या निर्मात्यांना!
सेफ्टीपिन आपल्याला माहिती आहेच!
एका कर्जाची परतफेड करताना वॉल्टर हंट याने एक आव्हान स्वीकारलं आणि फक्त तीन तासात त्याने तारेच्या एका तुकड्याला वेटोळे घालून तयार झाली सेफ्टीपिन!
इन्शुलिन चा शोध १९२१साली लागला पण त्याची प्रक्रिया आणि विचार मात्र १८८९मध्ये सुरू झाला आहे!
पृथ्वीवर माणसाचं अस्तित्व आहे तेंव्हापासून स्वतः च्या जगण्यासाठी तो वेगवेगळ्या गोष्टी शोधतो आहे, आपल्याला सोयी सुविधा मिळवून आपलं जीवन सोपं आणि आनंदी करण्यासाठी प्रयत्न करतो आहे! अशा गरजा पूर्ण करताना जे शोध लागले त्यांचा इतिहासही रंजक आहे !या पुस्तकात आपल्याला अशा १६५ गोष्टी वाचायला मिळतात ज्यात एखादा शोध कसा लागला याची रंजक माहिती आहे!
जीवनावश्यक गोष्टी, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य, खाद्यपदार्थ यांच्या गमती या पुस्तकात वाचताना मजा येते!
गुप्तपणे उडणारे लढाऊ विमान असो किंवा १६७९ मध्ये डेनिस पोपिन यांनी लावलेला कुकरचा शोध असो, डॉ सॅम्युअल हर्स्ट यांचा टच स्क्रीन चा शोध असो किंवा जेस्सी रेनो यांनी तयार केलेला सरकता जिना किंवा एस्केलेटर असो यांच्या निर्मिती मागच्या प्रेरणा आणि प्रयत्न आपल्यालाही विचारात पाडतात.
आज निसर्गाला घातक ठरलेले प्लॅस्टिक योगायोगाने १९३३ साली प्रयोगशाळेत तयार झालं आणि नंतर त्याचा भस्मासुर झाला!
चित्रात रंग भरले की ते चित्र जास्त छान दिसतं हो ना? हे चित्र रंगवायला वापरले जाणारे क्रेयोन्स १९०३मध्ये स्मिथ आणि बिने यांनी तयार केले!आज त्यात प्रगती होऊन सुवासिक तेलखडू ही तयार केले जातात!
लॅपटॉप, संगणक, वाहनांचे क्लच, रबर बँड, इथपासून ते सकाळी उठल्या उठल्या भेटणारा टूथब्रश, इन्स्टंट कॉफी पर्यंतचे शोध या पुस्तकात वाचायला मिळतात.
आपण या वस्तू रोज वापरतो पण मला मात्र आता फ्रीज उघडला की विल्यम क्युलेन आठवतात आणि वृत्तपत्रात शब्दकोडे पाहिले की त्याचे जनक आर्थर वेन समोर दिसतात!
शोधकाचे छायाचित्रही या पुस्तकात दिले आहे त्याचा हा परिणाम असावा!
चला तर मग तुम्हीही शाळेच्या किंवा जवळच्या ग्रंथालयात हे पुस्तक "शोधा" आणि "वाचा" !

नाव-शोधांच्या नवलकथा
लेखक- संजय श्रीकृष्ण पाठक
प्रकाशन-सकाळ प्रकाशन
एप्रिल २०१९

एकूण पृष्ठ १७५

- डॉ. आर्या जोशी